Monday, July 1, 2024

‘या’ कारणामुळे नाराज होऊन, ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानने पुरस्कार सोहळ्यात सहभागी न होण्याची घेतली होती शपथ

‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खान हा त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचा चाहता वर्ग देखील भरपूर आहे. या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट आहे, जी जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. सर्वांनाच माहित आहे की, आमिर खान कोणत्याही पुरस्कार सोहळ्याचा भाग होत नाही. हे वर्षानुवर्षे चालू आहे. तो वर्षामध्ये केवळ एक चित्रपट करतो आणि तो चित्रपट आश्चर्यकारक यश देखील मिळवतो. चित्रपट हिट झाल्यानंतरही आमिर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत नाही आणि आपल्या या निर्णयावर तो आजतागायत ठाम आहे. चला जाणून घेऊया या मागचे कारण काय आहे.

वास्तविक, ही गोष्ट 1992 या वर्षीची आहे. यादरम्यान बॉलिवूडचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते. अनिल कपूरचा ‘बेटा’, दुसरा अमिताभ बच्चनचा ‘शहेनशाह’ आणि तिसरा म्हणजे आमिर खानचा ‘जो जीता वही सिकंदर.’ तिन्ही चित्रपट एकमेकांना टक्कर देत सुपरहिट झाले. आता यावेळी पुरस्कार कोणाला मिळणार, हे समजणे प्रेक्षकांसाठी कठीण होते.

पण कुठेतरी, आमिरला अशी आशा होती की, त्याच्या चित्रपटाला ज्याप्रकारे प्रेम मिळाले आहे, त्यानुसार त्यालाच हा पुरस्कार मिळेल. पण फिल्मफेअरने त्यावेळी अनिल कपूरला ‘बेटा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिला. हे प्रकरण इथेच संपत नाही, तर त्यानंतर पुढील दोन वर्षे, आमिरचे चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी नाकारले गेले.

यानंतरही त्याचे ‘हम हैं राही प्यार के’ आणि ‘रंगीला’ चित्रपट प्रदर्शित झाले आणि दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली. प्रेक्षकांकडूनही त्याला खूप प्रेम मिळाले. पण आमिरला फिल्मफेअरपासून ते आयफापर्यंत कोणताही पुरस्कार मिळाला नाही. त्याचवेळी शाहरुखला ‘बाजीगर’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

त्यानंतरच आमिर खानने पुरस्कार सोहळ्याचा भाग होणे बंद केले. आमिरने सांगितले की त्याचा पुरस्कारांवर विश्वास नाही. तथापि, यानंतर 1996 मध्ये त्याला ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याला आतापर्यंत फक्त फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारच नाही, तर पद्मश्री आणि पद्मभूषण यांसारख्या राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र, आमिर फक्त राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी जातो, पण कोणत्याही खासगी कार्यक्रमात तो भाग घेत नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा