Monday, July 1, 2024

रितेशसोबत लग्नाच्या ८ वर्षांनंतर जेनेलियाचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, “काहींनी अगोदरच ‘या’ धोक्याची जाणीव करून दिलेली, पण…”

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे महाराष्ट्राचं लाडकं कपल म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातली तरुण मंडळी या दोघांकडे एक आदर्श जोडपं म्हणून पाहतात. याच जेनेलिया वहिनींनी काही दिवसांपूर्वी एक मोठा खुलासा केला. जेनेलियाला इंडस्ट्रीतील अनेक लोकांनी लग्नापूर्वी ताकीद दिली होती. २९ नोव्हेंबर रोजी जेनेलियाचा नवा सिनेमा प्रदर्शित झाला त्यानिमीत्ताने ती माध्यमांशी बोलत होती.

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे २०१२ मध्ये विवाहबद्ध झाले आणि सबंध महाराष्ट्राचे लाडके होऊन बसले. आपली तरुण मंडळी जेनेलियाला वाहिनीशिवाय संबोधतच नाहीत. जेनेलियाने दहा वर्षांपूर्वी “It’s my life” नावाचा एक सिनेमा केला होता. काही कारणास्तव त्याचं प्रदर्शन बारगळलं आणि २९ नोव्हेंबरला हा सिनेमा झी सिनेमा या वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आला. याच्या पत्रकार परिषदेत जेनेलिया बोलत होती.

तिने सांगितलं की रितेशसोबत लग्न ठरल्यावर इंडस्ट्रीमधील अनेकांनी तिला लग्न केल्यास तुझं करियर संपून जाईल असं बजावलं होतं. परंतु जेनेलियाचं रितेश देशमुख वर इतकं प्रेम होतं की तिने या सगळ्याकडे दुर्लक्ष करून त्याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर खरंच जेनेलियाने स्वतःला सिनेसृष्टीपासून दूर केलं. यानंतर या महाराष्ट्राच्या लाडक्या दाम्पत्याला लागोपाठ दोन मुलं झाली. मग काय जेनेलियाने तीच सारं लक्ष मुलांच्या संगोपनाकडे वळवलं.

लग्नापूर्वी जेनेलियाने हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड अशा विविध भाषांमधील सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने २००३ साली रितेश सोबतच ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने रितेश सोबत ‘तेरे नाल लव्ह हो गया’ नावाचा आणखीन एक सिनेमा केला. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये तिने धनुष, थलपती विजय, तसेच राम चरण या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत अनेक हिट सिनेमे दिले. लग्नानंतर मराठीत देखील जेनेलियाने ‘माऊली’ आणि ‘लई भारी’ या दोन सिनेमांमध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका निभावली. तसेच माऊली, लय भारी, फास्टर फेणे या सिनेमाची निर्मिती देखील केली.

हे देखील वाचा