नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या मराठी चित्रपटाद्वारे रिंकू राजगुरूने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने ‘आर्ची’ची भूमिका साकारून, प्रचंड प्रसिद्धी मिळवली. ‘सैराट’ चित्रपट येऊन आता ४ वर्ष लोटली आहेत, तरीही रिंकूच्या लोकप्रियतेत काडीचाही फरक पडलेला नाही. मराठीनंतर तिने हिंदी चित्रपटांतही हात आजमावला आहे. अलीकडेच रिंकू मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आलेल्या अनुभवाबद्दल बोलली आहे. यात ती असेही म्हटली की, मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना तिला आपलेपणा वाटतो.
रिंकूने मराठी व हिंदी या दोन्ही सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. जेव्हा तिला दोन्हीकडे काम करताना काय फरक जाणवला, याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ती म्हणाली, “वेगळ्या भाषेत आणि वेगवेगळ्या लोकांसोबत काम करायला मजा येते. त्यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी असते. सेटवरील वातावरण देखील खूप वेगळे असते. हिंदी भाषा आपली नसल्यामुळे, मला तितका आपलेपणा वाटत नाही. मात्र, जेव्हा मी मराठी चित्रपटसृष्टीत काम करते, तेव्हा मला आपलेपणा जाणवतो.”
जेव्हा रिंकुला विचारले गेले की, हिंदी चित्रपटात काम करताना भाषेची अडचण आली का? यावर ती म्हणाली की, “माझी हिंदी भाषा इतकी चांगली नाही. मी जेव्हा हंड्रेड वेब सीरिजमध्ये काम केले, तेव्हा मी नेत्रा पाटील ही महाराष्ट्रीयन मुलीची भूमिका साकारली होती. हे हिंदी- मराठी बोलणारे पात्र होते. त्यामुळे मला तिथे भाषेची अडचण आली नाही.” विशेष म्हणजे यातील रिंकूच्या कामाचे खूप कौतुक झाले. तसेच सीरिजमधील रिंकूचा लूक प्रेक्षकांना खूप आवडला होता.
रिंकूच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘झुंड’ या चित्रपटात, पुन्हा एकदा आकाश ठोसरसोबत दिसणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. तसेच, चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहेत. याशिवाय तिचा ‘छूमंतर’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…