गायक आणि संगीतकार ए.आर. रहमानने त्याच्या बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट ‘९९ सॉंग’ साठी एक खास कॉन्सर्ट रिलीझ केला आहे. हा एक डिजिटल शो होता, जो त्याच्या आगामी ‘९९ सॉंग’ या चित्रपटाच्या संगीताविषयी प्रेक्षकांना माहिती देत होता. हा हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रवाहित झाला. चित्रपटाचा अभिनेता इहान भट्ट आणि दिग्दर्शक विश्वेश कृष्णमूर्ती यांनीही रहमानसोबत या चित्रपटात आवाज सादर केला आहे.
‘९९ सॉंग’च्या या खास कॉन्सर्टबद्दल ए.आर. रहमान म्हणतो की, “प्रत्येक शहरात, प्रत्येक महाविद्यालयात जाऊन तुमच्यासाठी हे सादर करावे अशी माझी इच्छा होती. परंतु वेळेकडे पाहता आणि सध्याची परिस्थिती बघता कमीत कमी आपण हे तरी करू शकतो. अविश्वसनीय गायक आणि संगीतकारांसह एक कार्यक्रम सादर करत आहोत, जो साउंडट्रॅकचा भाग आहे. मला आशा आहे की, आपण चित्रपटगृहांमध्ये जाणार आणि मास्कसह चित्रपटाला प्रेम देणार.”
हा चित्रपट ९९ गाण्यांचा एक म्युजिक रोमॅन्स आहे, ज्याचे दिग्दर्शन विश्वेश कृष्णमूर्ती यांनी केले आहे. या चित्रपटात इहान भट, एडिल्सी वर्गीस, तिब्बसी आणि तेनजिन दलहा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात लिसा रे, मनीषा कोईराला, आदित्य सील, संगीतकार रणजित बारोट यासारखे कलाकार सहकारी पात्र साकारताना दिसतील. ट्विटरवर हे पोस्टर शेअर करत ए.आर. रहमानने लिहिले की, “हे शेअर करुन खूप आनंद होत आहे, की ९९ सॉंग १६ एप्रिल, २०२१ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वेश यांनी केले आहे, या चित्रपटात इहान भट आणि एडिल्सी वर्गीस यांच्यासारखे कलाकार दिसणार आहेत.
१९ फेब्रुवारी २०२० रोजी ’99 सॉंग’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला होता. ट्रेलरची सुरुवात पियानोमधून पाहणाऱ्या एका मुलाच्या सीनपासून होते आणि अभिनेता इहान भट्ट म्हणतो की “मला विश्वास आहे की हे एक गाणे संपूर्ण जग बदलू शकते.” ट्रेलरमध्ये लिसा रे म्हणते की, “संगीत जगातील शेवटची जादू आहे, जादूवर तुमचा विश्वास आहे का?” कोविड – १९ मुळे हा चित्रपट रिलीझ करण्यात उशीर झाला आहे.