Monday, July 1, 2024

कॅरी मिनाटी ते भुवन बाम, बॉलिवूडमध्ये गाजत आहेत ‘हे’ युट्यूबर्स

भारतात सिनेमात काम केल्यानंतरच प्रसिद्धी मिळते, असं म्हणलं जातं. त्यामुळे लाखो तरुण स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपडत असतात. पण ज्यांना ही संधी मिळत नाही, तेव्हा ते प्रसिद्धी आणि पैसा कमावण्यासाठी वेगळा मार्ग शोधतात. त्यासाठी आटापिटा करून धडपडत असतात. त्यातूनच काहींनी युट्यूबर्स चॅनेल सुरू केलीत आणि भन्नाट कंटेंट बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आज त्यांचा कंटेंट जगभरात प्रसिद्ध झालाय. त्यामुळे त्यांचा स्टेटस कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटिपेक्षा कमी नाहीये. असेच काही युट्यूबर्स आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये काम केलंय आणि येत्या काळातही करणार आहेत, तर काहींना प्रसिद्धी मिळूनही त्यांच्या कंटेंटमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकलेत. आपण त्या युट्यूबर्सबद्दल जाणून घेऊया.

कॅरी मिनाटी – 
कॅरी मिनाटी हा कॉमेडी कंटेंट बनवतो. अनेकांना त्याचा हा कंटेंट घाणेरडा आणि अपमानास्पदही वाटतो. पण कॅरी मिनाटीला त्याची खरी ओळख ही, त्याच्या रोस्ट व्हिडिओंमुळे मिळालीये. त्याच्या युट्यूब चॅनेलचं नाव कॅरी मिनाटी असून त्याचे युट्यूबवर ३४.६ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. मागील वर्षीच कॅरीने आपल्या डेब्यूची घोषणा केली होती. तो अजय देवगणच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘मेडे’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं नाव बदलून ‘रनवे-३४’ ठेवण्यात आलंय. नोव्हेंबर २०२१ मध्ये डिझनी+हॉटस्टारवर त्याची ‘मी, बॉस अँड लॉकडाऊन’ ही सीरिजही आली होती. विशेष म्हणजे, त्याच्याविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आली होती. त्याच्यावर वादग्रस्त शब्दांचा वापर करण्याचा आरोप लावण्यात आला होता.

भुवन बाम –
भुवन बाम हे नाव माहिती नाही, असा कदाचित एकही व्यक्ती सापडणार नाही. भुवनदेखील कॉमेडी कंटेंट बनवतो. विशेष म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये तो स्वत:च पात्रांच्या भूमिका साकारतो. त्याचा हटके कंटेंट चाहत्यांना भलताच आवडतो. २०२१ मध्ये त्याने तयार केलेल्या व्हिडिओंची एक वेबसीरिजच आली होती. तिचं नाव होतं ‘ढिंढोरा.’ या वेबसीरिजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भारी गोष्ट म्हणजे, त्याच्या या वेबसीरिजच्या थीम साँगमध्ये त्याच्याव्यतिरिक्त कॅरी मिनाटी, आशिष चंचलानी, यांसारखे अनेक युट्यूबर्स झळकले होते. तसेच तो अनेक रियॅलिटी शोमध्येही झळकला होता. त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्येही हजेरी लावली होती. भुवनच्या युट्यूब चॅनेलचं नाव ‘बीबी की वाईन्स’ आहे, त्याच्या या युट्यूब चॅनेलला २५.१ मिलियन लोकांनी सबस्क्राईब केलंय.

आशिष चंचलानी –
कॉमेडीसोबतच रोस्ट कंटेंट बनवण्यासाठी आशिष चंचलानी प्रसिद्ध आहे. त्याच्या ‘आशिष चंचलानी वाईन्स’ या युट्यूब चॅनेलला २७.४ मिलियन सबस्क्राईब आहेत. भुवनप्रमाणे आशिषही आपल्या व्हिडिओत स्वत:च अनेक पात्र साकारत असतो. त्याच्यासोबतच त्याचे काही मित्रही व्हिडिओत दिसतात. इतर युट्यूबर्सप्रमाणे आशिषही चांगलाच प्रसिद्ध झालाय. २०२१ मध्ये आशिषचा एक कॉमेडी शो ऍमेझॉन मिनी टीव्हीवर आला होता. त्याच्या शोचं नाव होतं ‘द लोन स्कॅम.’ त्याचबरोबर त्याचा एक व्हिडिओ तर थेट एमआयबी या हॉलिवूडपटात झळकला होता.

हर्ष बेनिवाल –
हर्ष बेनिवालचा तर नादच नाही. त्याने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या ‘स्टुडंट ऑफ द ईयर २’ या सिनेमातही काम केलंय, पण यावेळी तो ७ जानेवारी, २०२२ रोजी रिलीझ झालेल्या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. एमएक्स प्लेअरवरील ‘कॅम्पस डायरीज’ या वेबसीरिजमध्ये कॉलेज आणि कॉलेजमधली लाईफ दाखवण्यात आलीये. यामध्ये ‘दंगल’ फेम अभिनेता ऋत्विक शौरीही दिसणार आहे. त्याच्या युट्यूब चॅनेलबद्दल बोलायचं झालं, तर त्याच्या ‘हर्ष बेनिवाल’ या युट्यूब चॅनेलला १४.१ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.

प्राजक्ता कोळी –
प्राजक्ता तिच्या कॉमेडी कंटेंटसाठी ओळखली जाते. ती २०२१ या वर्षात दोन मोठ्या कारणांमुळे चर्चेत होती. पहिली म्हणजे तिची वेबसीरिज ‘मिस- मॅच्ड.’ तिची ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर रिलीझ झाली होती. या वेबसीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुसरे कारण म्हणजे, प्राजक्ता वरुण धवन आणि कियारा आडवाणी यांच्या ‘जुग जुग जियो’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूकही रिलीझ करण्यात आलाय. प्राजक्ताच्या युट्यूब चॅनेलविषयी बोलायचं झालं, तर तिच्या ‘मोस्टलीसेन’ या युट्यूब चॅनेलला ६.५५ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा