आपल्या आयुष्यात अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांच्याबद्दल आपण ‘बस नाम ही काफी हैं’ असे म्हणू शकतो. अशाच निवडक व्यक्तींमधील एक व्यक्ती म्हणजे ‘उस्ताद झाकीर हुसेन.’ झाकीर हुसेन यांचे नाव घेतले की, डोळ्यासमोर येतात दाट कुरळे केस, चेहऱ्यावर सतत हास्य आणि हाताची बोटं तबल्यावर नाचवणारे दिलखुलास व्यक्तिमत्व. त्यांना जर तबल्याचे जादूगार जरी म्हटले, तरी अतिशयोक्ती वाटणार नाही. आज याच दिलखुलास आणि तबल्याचे राजा असणाऱ्या झाकीर यांच्याबद्दल काही खास.
९ मार्च १९५१ ला मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. झाकीर यांचे वडील उस्ताद अल्लारखा प्रसिद्ध तबला वादक होते. त्यांनी वयाच्या तिसऱ्याच वर्षी झाकीर यांना तबला शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर झाकीर यांनी वयाच्या ११ व्या वर्षी अमेरिकेत त्यांचा पहिला कॉन्सर्ट देखील केला. या कॉन्सर्टमूळे त्यांना आणि त्यांच्या करियरला एक मार्ग मिळाला. १९७३ साली झाकीर यांनी ‘लिविंग इन द मटेरियल वर्ल्ड’ नावाचा पहिला वहिला अल्बम लाँच केला. हा अल्बम तुफान लोकप्रिय झाला. याच अल्बमने झाकीर यांना एक नवीन ओळख आणि प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
झाकीर यांच्याबाबत अनेक किस्से प्रसिद्ध असले, तरी त्यांच्या कायम आठवणीत राहणार आणि अतिशय सुंदर किस्सा एकदा त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता. १२ वर्षांचे असताना ते त्यांच्या वडिलांसोबत उस्ताद अल्लारखांसोबत एका संगीत कार्यक्रमाला गेले होते. त्या कार्यक्रमात पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, बिस्मिल्लाह खान, पंडित शांता प्रसाद, पंडित किशन महाराज यांसारखे भारतीय शास्रीय संगीतातील महान मंडळी त्यांची कला सादर करत होते, तेव्हा त्या कार्यक्रमाच्या संयोजकांनी उस्ताद अल्लारखांचा मुलगा आलेला पाहून झाकीर यांना व्यासपीठावर तबल्याच्या सादरीकरणासाठी बोलावले. त्या सादरीकरणानंतर झाकीर यांना सर्व दिग्गज मंडळींकडून शाबासकीची थाप तर मिळाली सोबतच ५ रुपयांचे बक्षीस देखील मिळाले. ते पाच रुपये आजही त्यांच्यासाठी अनमोल आहेत, असे त्यांनी सांगितलं होते.
संपूर्ण जगामध्ये आपल्या तबला वादनाने प्रसिद्ध असणाऱ्या झाकीर हुसेन यांनी अभिनय देखील केला आहे. हो, झाकीर यांनी काही सिनेमांमध्ये त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यांनी १९८३ मध्ये आलेल्या ‘हीट अँड डस्ट’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. या चित्रपटात शशी कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. या सिनेमानंतर त्यानी ‘द परफेक्ट मर्डर’ आणि ‘मिस बॅट्स चिल्ड्रन’ या चित्रपटांमध्ये काम केले होते.
सन १९९८ साली त्यांच्या शबाना आझमी यांच्यासोबत ‘साज’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला त्यांनीच संगीत दिले होते. मात्र, हा सिनेमा वादग्रस्त ठरला. झाकीर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, तरीही एक वादग्रस्त सिनेमा म्हणून या चित्रपटाने ओळख कमावली. या चित्रपटात झाकीर हुसेन यांनी शबाना आझमी यांच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. एवढे मोठे तबला वादक असणाऱ्या झाकीर यांनी मोठ्या पडद्यावर शबाना आझमी यांना प्रपोज केले होते. तो सीन पाहून सर्वच रसिकांना एक सुखद धक्काच बसला.
मात्र, तरीही एक अभिनेता म्हणून त्यांना अपेक्षित असे यश कधीच मिळाले नाही. त्यांनी काही जाहिरातींमध्ये देखील काम केले. काही वर्षांपूर्वी झाकीर यांची ताज चहाची जाहिरात खूपच प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीतले ‘वाह उस्ताद वाह!’ हे वाक्य सुद्धा खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाले होते.
झाकीर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर त्यांनी कथ्थक डान्सर, टीचर आणि त्यांच्या मॅनेजर असणाऱ्या ऍन्टोनिया मानिकोला यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना अनिश कुरेशी आणि इसाबेल कुरेशी या दोन मुली आहेत.
झाकीर यांना त्यांच्या कलेसाठी अगणित अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जगातील संगीत क्षेत्रासाठी मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘ग्रॅमी’ पुरस्काराने त्यांना दोनदा गौरविण्यात आले. शिवाय १९८८ साली त्यांना पद्मश्री, तर २००० साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले. १९९० साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार देखील दिला गेला.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
– सिद्धार्थला पूर्णतः विसरलीये शहनाझ गील; होळीच्या रंगात रंगली आणि अशी काय नाचली, तुम्हीच पाहा हा व्हिडिओ
– मसाबा गुप्ताने वडील व्हिव्हियन रिचर्ड्स यांना वाढदिवसानिमित दिल्या खास शुभेच्छा; म्हणाली पप्पा ‘तुम्ही चांगलं केलं…’