प्रसिद्ध तबला वादक ‘झाकीर हुसेन’ यांनी आपल्या तबला वादनाची भुरळ भारतीय प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. एखादा कार्यक्रम असो वा जुगलबंदी त्यांचे तबला वादन ऐकणे हे अनेक रसिकांसाठी एक पर्वणीच असते. त्यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी मुंबईत झाला होता. त्यांनी आपल्या तबला वादनासोबतच अभिनयातही आपले नशीब आजमावले आहे. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या या कारकिर्दीबद्दल…
असे अनेक तबलावादक होऊन गेले ते प्रसिद्धीच्या झोतात आले, परंतु झाकीर यांनी आपल्या तबला वादनात आणलेल्या नाविण्यामुळे त्यांची अनेक गाणी हिंदी चित्रपटसृष्टीत अजरामर झाली आहेत. भारतीय व पाश्चात्त्य संगीत यांचे मिलाप असलेल्या कार्यक्रमात, आपले भारतीय संगीत जगात पोहोचविण्यात व पाश्चात्त्य संगीताची भारतीयांना ओळख करून देणाऱ्या नावांमध्ये झाकीर हुसेन यांचे नाव आजतागायत घेतले जाते.
संगीताचा वारसा त्यांना लहानपणापासून आपल्या घरातूनच मिळाला. त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा हे सुप्रसिद्ध तबला वादक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी चित्रपटातही काम केले आहे. ते प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबत ‘साज’ या चित्रपटात झळकले आहेत. झाकीर हुसेन यांनी आपल्या लहान वयातच वाद्य वाजवायला सुरुवात केली होती. वयाच्या तिसऱ्या वर्षी ते ‘पखवाज’ हे वाद्य वाजवायला शिकले. मुंबईच्या सेंट झेवीयर्स या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी अमेरिकेमध्ये पहिला कॉन्सर्ट केला होता.
ते बारा वर्षाचे असताना आपल्या वडिलांसोबत एका संगीत कार्यक्रमाला गेले होते. त्या कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी संयोजकांनी झाकीर हुसेन यांना व्यासपीठावर तबला सादरीकरणासाठी बोलवले होते, तेव्हा त्यांना पाच रुपये म्हणून पहिले बक्षीस मिळाले होते.
सन १९७३ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘लिविंग इन द मटेरियल वर्ल्ड’ प्रकाशित झाला. याच माध्यमातून त्यांना आपली कला जगापुढे दाखवण्यात यश आले. १९८३ साली प्रदर्शित झालेला ‘हिट अँड डस्ट’ या चित्रपटाला झाकीर हुसेन यांनी संगीत दिले होते व या चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका देखील होती.
सन १९८८ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’, सन २००२ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. १९९० मध्ये त्यांना “संगीत नाटक कला अकादमीच्या” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९२ साली ‘द प्लॅनेट ड्रम’ आणि २००९ सालच्या ‘ग्लोबल ड्रम’ प्रोजेक्ट साठी दोन ग्रॅमी पुरस्कार मिळाले.
अमेरिकेतील सीएटल येथे असलेल्या वॉशिंग्टन विद्यापीठात संगीत शिक्षक म्हणून हुसेन यांच्या नावाची शिफारस सतारवादक पंडित रविशंकर यांनी केली होती.
सन १९९९ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल हेरिटेज फेलोशिपने झाकिर हुसेन यांचा सन्मान केला होता. अमेरिकेतील पारंपारिक कलाकार म्हणून अनेक संगीतकारांना दिलेला हा सर्वोत्तम पुरस्कार मानला जातो.
त्यांची पत्नी ही नृत्यांगणा व शिक्षिका आहे. त्यांना दोन मुली असून एक मुलगी चित्रपटात आहे, तर दुसरी नृत्यात आपले नशीब आजमावत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विरुष्काच्या पहिल्या भेटीचा ‘तो’ किस्सा होता विराटला अस्वस्थ करणारा; वाचा काय घडले होते त्यावेळी?