बॉलिवूडमध्ये कलाकार त्यांच्या सिनेमांसोबतच इतर वेगवेगळ्या कारणांसाठी देखील ते चर्चेत येत असतात. याच यादीतील मुख्य कारण म्हणजे कलाकारांचे चित्रपटांसाठीचे मानधन. जितका मोठा आणि लोकप्रिय कलाकार तितकेच त्याचे मानधन जास्त असते. शिवाय जस जसे कलाकारांचे सिनेमे होत होतात तसतसे ते त्यांच्या फीमध्ये वाढ देखील करतात. बॉलिवूडमध्ये आणि मीडियामध्ये नेहमीच कलाकारांची फी हा चर्चेचा विषय असतो.
जॉन अब्राहम (John Abraham) हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक मोठ्या ऍक्शन आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा दमदार अंदाज आणि त्याचे भारदस्त व्यक्तिमत्व नेहमीच फॅन्समध्ये आकर्षणाचा विषय असतो. एकापेक्षा एक सरस सिनेमांमध्ये काम करणाऱ्या जॉनने देखील त्याच्या फीमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आहे. सत्यमेव जयते (Satyamev Jayate) आणि बाटला हाउस (Batla House) चित्रपटांच्या यशानंतर जॉनने त्याच्या फीमध्ये वाढ करण्याचा सपाटा लावला आहे. एका रिपोर्टनुसार जॉनने त्याच्या आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (Ek Villain Returns) सिनेमासाठी भारी भरक्कम रक्कम मागितली असून, निर्मात्यांनी त्याची ही मागणी मान्य देखील केली आहे. जॉनला दिग्दर्शक मोहित सुरीने तब्बल २१ कोटी रुपये देऊन साइन केल्याची माहिती मिळत आहे.
दिवसेंदिवस जॉनच्या फीमध्ये वाढतच होत चालली आहे. ‘बाटला हाऊस’ सिनेमासाठी जॉनला देण्यात आलेल्या फीपेक्षा अधिक फी त्याला ‘सत्यमेव जयते २’ साठी मिळाली. प्राप्त माहितीनुसार जॉनला ‘पठाण’साठी तब्बल २० कोटी देऊन साईन करण्यात आले. तर आता त्याने ‘एक व्हिलन रिटर्न्स’साठी २१ कोटी घेतली आहे. मागील तीन वर्षांमध्ये जॉनची फी ७ कोटींपासून २१ कोटी रुपये इतकी झाली आहे. तब्बल तीनपट फी त्याने फक्त तीन वर्षात वाढवली आहे.
‘एक व्हिलन रिटर्न्स’ सिनेमामध्ये जॉनसोबतच रितेश देशमुख, अर्जुन कपूर, दिशा पाटनी, तारा सुतारिया मुख्य भूमिकेत असून, चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी करत आहे. याआधी मोहितने ‘एक व्हिलन’ सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. ज्यात सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख, श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. ‘एक व्हिलन रिटर्न’ सिनेमाचे शूटिंग संपले असून, त्याच्या पोस्ट प्रोडक्शनवर काम सुरु आहे. मीडियामधील माहितीनुसार हा सिनेमा याचवर्षी जुलैमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.
हेही वाचा :