बड्या बड्या बाता अन्….! बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी भोगलाय तुरुंगवास, नावं वाचून धक्का बसेल


बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपण अनेक अभिनेत्यांना कारागृहात जाताना पाहत असतो. चित्रपटातल्या न्यायालयांमध्ये त्यांचा न्यायनिवाडा होताना आपल्याला पाहायला मिळतो. चित्रपटात न्याय देणारे न्यायमूर्ती साकारणारेही अभिनेतेच असतात आणि वकील म्हणून आरोपीच्या बाजूने बोलणारे अथवा फिर्यादीच्या बाजूने आरोपीवर आरोप करणारे वकील, इतकंच काय फिर्यादीच्या भूमिकेत देखील हे कलाकारच असतात.

परंतु आपल्याला ठाऊक आहे का की याच कलाकारांना, जे चित्रपटातून नीती अनितीचं ज्ञान पाजळत असतात, खऱ्या आयुष्यात अशाच अनैतिक कार्यांमुळे कारागृहाची हवा खावी लागली आहे. खऱ्या खुऱ्या न्यायालयात खऱ्या न्यायाधीशांकडून यांना शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. चला तर मग पाहुयात कोण कोण कलाकार आहेत ज्यांना आतापर्यंत एकदातरी कारागृहात जावं लागलं आहे.

रिया चक्रवर्ती
यावर्षी म्हणजे २०२० ला गाजलेलं सर्वात मोठं प्रकरण म्हणजे सुशांत सिंह राजपुतची आत्महत्या आणि त्यानंतर बाहेर आलेलं ड्रग्ज प्रकरण! या प्रकरणात अनेक बड्या अभिनेत्यांची आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली होती पण तत्पूर्वी सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्जप्रकरणामध्ये एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. परंतु चौकशीनंतर पुराव्याअभावी तिची मुक्तता करण्यात आली.

भारती सिंह – हर्ष लिंबाचिया
ड्रग्जची घटना वाढल्यानंतर कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्या घरी आणि प्रॉडक्शन हाऊसवर एनसीबीने (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) छापा टाकला. यावेळी, एनसीबीला त्यांच्या घरातून ८६.५ ग्रॅम गांजा मिळाला होता. त्यानंतर या दांपत्याला अटक करण्यात आली होती. या दोघांनी चौकशी दरम्यान ड्रग्ज सेवन केल्याची कबुली दिली होती. काही दिवसांनी या जोडप्याला जामिनावर सोडण्यात आलं. भारती ही सुप्रसिद्ध कॉमेडीयन आहे तर हर्ष हा लेखक आहे.

Photo Courtesy: Instagram/BhartiSingh

अपूर्व आणि शिल्पा अग्निहोत्री
साल २०१२ मध्ये मालिका क्षेत्रातील सुप्रसिद्ध जोडपं अपूर्व आणि शिल्पा अग्निहोत्री हे मुंबईतच होत असलेल्या एका रेव पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये पकडलं गेलं होतं. मेडिकल रिपोर्टमध्ये दोघेही ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी पॉझिटिव्ह आले होते. अपूर्वने शिल्पा आणि स्वत: निर्दोष असल्याचं सांगत म्हटलं होतं की तिथे रेव्ह पार्टी चालू आहे याची त्यांना काडीमात्रही कल्पना नव्हती. याउलट शिल्पाचं म्हणणं होतं कि, सेलिब्रिटी असल्यामुळे त्यांना हा त्रास सहन करावं लागत आहे. काही दिवस रिमांडमध्ये ठेवल्यानंतर दोघांनाही सोडून देण्यात आलं.

संजय दत्त
बॉलीवुड एक्टर संजय दत्त हा नेहमीच ड्रग ऍडिक्शन आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी चर्चेत राहिला आहे. १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर संजय दत्त जवळ एके ५६ रायफल सापडली होती. त्यानंतर त्याला जवळपास २० महिन्यांच्या कालावधीसाठी कारागृहात राहावं लागलं होतं. संजयला २०१३ मध्ये ५ वर्षांची कारावासाची शिक्षा झाली. परंतु त्याच्या चांगल्या व्यवहाराखातर २५ फेब्रुवारी २०१६ लाच पुण्याच्या येरवडा कारागृहातून सुटका करण्यात आली होती.

सलमान खान
हम साथ-साथ हैं चित्रपटाच्या चित्रिकरणानंतर सलमान खानवर काळवीट शिकार केल्या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणी जोधपूर न्यायालयाने २०१८ मध्ये सलमानला ५ वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा सुनावली गेली होती परंतु एक दिवस कारागृहात व्यतीत केल्यानंतर तो सध्या जामिनावर बाहेर आहे. याशिवाय सलमानवर हिट अँड रन तसेच आर्म्स ऍक्टचे गुन्हे देखील दाखल झाले होते परंतु त्यातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

अक्षय कुमार
साल २००९ मध्ये लॅकमे फॅशन विकमध्ये अक्षय कुमार शो-स्टॉपर बनला होता. अक्षयने रॅम्पवॉक दरम्यान स्टेजच्या जवळ बसलेल्या आपल्या पत्नीच्या ट्विंकल खन्नाच्या हातून जीन्सचं बटण आणि चैन खोलायला लावली होती. अनेकांनी त्याच्या या स्टंटवर आक्षेप घेतला होता. इतकच नाही तर एका सामाजिक कार्यकर्त्याने अक्षय और ट्विंकल यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली. ज्यामुळे अक्षयला एका दिवसाचा तुरुंगवास भोगावा लागला होता.

फरदिन खान
जानशीन चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारा फरदीन खान २००१ मध्ये कोकेन खरेदी करताना पकडला गेला. यानंतर त्याच्या घरात छापा टाकून अतिरिक्त कोकेनही त्याच्या घरातून जप्त करण्यात आलं. फरदिनला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. फरदीन त्यावेळी पूर्णतः ड्रग्जच्या अधीन झाला होता. फरदीनला सुमारे १२ वर्षानंतर २०१२ मध्ये या प्रकरणातून मुक्त करण्यात आलं.

जॉन अब्राहम
बाईक चालवताना निष्काळजीपणामुळे दोन जणांचा अपघात झाला, त्यानंतर तो स्वत: दोघांनाही दवाखान्यात घेऊन गेला. २००६ मध्ये निष्काळजीपणाने वाहन चालविल्याप्रकरणी जॉनला १५ दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु नंतर त्याला जामीनदेखील मंजूर झाला होता.

सैफ अली खान
सैफ अली खान हा करीना कपूर आणि मैत्रीण मलायका अरोरासमवेत मुंबईच्या ताज हॉटेल डिनरमध्ये गेला होता. यावेळी त्याचे एक व्यक्तीसोबत वाद झाले. इतके की हाणामारीत सैफने त्या व्यक्तीचं नाक तोडत त्या व्यक्तीला ठोकर मारली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सैफला त्वरित अटक केली आणि तुरूंगात डांबलं. यानंतर त्याला लगेच जामीनदेखील मिळाला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.