जिवंत अभिनय, कपड्यांची हटके स्टाईल, विनोदाचे अचूक टाईमिंग, अनोखा डान्स या आणि अशा अनेक गोष्टींनी गोविंदाने आपली ओळख तयार केली. ९०च्या दशकात बॉलिवूडमध्ये चीची नावाचा वारा वाहायला लागला होता. या वाऱ्याने अनेक वेगवेगळ्या गोष्टी आणल्या आणि त्या संपूर्ण बॉलिवूड बदलून गेलं. ९० च्या दशकात फक्त गोविंदा या नावावर चित्रपट चालू लागले. संपूर्ण जग गोविंदा नावाच्या रंगात रंगून गेलं. विनोदी भूमिकांपासून ते गंभीर, ऍक्शन भूमिका देखील गोविंदाने अगदी लीलया केल्या. मात्र काय झाले अचानक की हा रंग फिका पडू लागला. जाणून घेऊया या लेखात.
गोविंदाने एकदा एका मुलाखतीमध्ये त्याच्या करियरच्या या वळणाबद्दल सांगितले होते. अगदी थेट गोविंदाने बॉलिवूडमधला नेपोटीजमचा मुद्दा मान्य नव्हता केला, मात्र तो म्हणाला होता, “बॉलिवूडमध्ये नेपोटीजम नाहीये, परंतु बॉलिवूडमध्ये अनेक मोठे पॉवर सेंटर आहेत. मोठे ग्रुप्स देखील आहेत. दुर्दैवाने मी कोणत्याही पॉवर सेंटर आणि ग्रुप्स सोबत जोडलेला नव्हतो. कदाचित याचमुळे का विशिष्ट्य काळानंतर मला चित्रपट मिळण्याचे प्रमाण कमी झाले. बॉलिवूड हा एक मोठा परिवार आहे. सर्वानी एकमेकांना मदत करत सोबत चालायचे असते. मात्र मी यात मागे पडलो. एवढेच नाही माझ्या कठीण काळात मला माझ्या जवळच्या लोकांनी मदत करण्यापेक्षा जास्त दलदलमध्ये ढकलले. ती वेळ अशी होती मी जेवढा हात पाय मारत होतो, तेवढा जास्त त्यात अडकत होतो.”
गोविंदा आणि डेव्हिड धवन यांचे नाते तर जगजाहीर होते. पण मधेच त्यांच्यात काहीतरी बिनसले आणि आणि ही हिट जोडी तुटली. डेव्हिड धवनच्या जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये गोविंदाने काम केले. अगदी ‘शोला और शबनम’ पासून ते ‘पार्टनर’ पर्यंत या जोडीने १७ चित्रपट एकत्र केले. गोविंदाने काही वर्षांपासून सहकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली असली तरी त्याने त्याचा जुना रुबाब गमावला तो गमवलाच.