बॉलिवूडमध्ये अशी अनेक कुटुंब आहेत ज्यांच्या पिढ्यांपिढ्या हिंदी सिनेमाशी जोडलेल्या आहेत. यात देओल कुटूंबाचंही नाव आहे, या कुटुंबातील जवळजवळ सर्वच सदस्यांनी बॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे. ६० च्या दशकापासून कारकीर्दीची सुरुवात करणारे धर्मेंद्र सध्या वयपरत्वे चित्रपटांमध्ये फार कमी दिसतात. तर त्यांची दोन्ही मुलं बॉबी आणि सनी यांनीही बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव कमावलं आहे. आता सनी देओलचा मुलगा करण यानेदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या कुटुंबाबद्दल चाहत्यांना नेहमीच काही ना काही जाणून घ्यायचं असतंच. चला तर मग आज या देओल कुटुंबाच्या शिक्षणाबद्दल आपण जाणून घेऊयात.
धर्मेंद्र
धर्मेंद्र यांना बॉलीवूडचा हि मॅन म्हटलं जातं. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आणि आजही त्यांच्या चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे. गंभीर भूमिका असो वा विनोदी, धर्मेंद्र यांचा प्रतिस्पर्धी ना त्यावेळी कोणी होता आणि ना आज कोणी आहे. धर्मेंद्र यांनी रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली आहेत. परंतु दुसरीकडे, जर त्यांच्या शिक्षणाबाबत चर्चा केली तर आपण अचंबित व्हाल. त्यांनी पंजाबच्या फगवाडा येथील आर्या हायस्कूल व रामगढिया स्कूलमधून दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
सनी देओल
बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने धमाल उडविणारा सनी देओल शिक्षणाच्या बाबतीतही अव्वल राहिला होता. त्याची कडक संवादफेक आणि जबरदस्त ऍक्शन यामुळे त्याचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला होता. सनीच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने हार्ट बॉईज हायस्कूल महाराष्ट्र मधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्याने रामनिरंजन आनंदीलाल पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली. पदवीधर झाल्यानंतरच सनी चित्रपटात आला होता आणि त्याने ‘बेताब’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
बॉबी देओल
देओल कुटुंबातील धाकटा मुलगा बॉबीनेही ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने एकापेक्षा एक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. बॉबीने आपले शालेय शिक्षण मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल आणि अजमेरमधील मायो कॉलेजमधून पूर्ण केलं. यानंतर बॉबीने मुंबईतील प्रसिद्ध मिठीबाई कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. बॉबीने पदवी पूर्ण केल्यावर ‘बरसात’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
करण देओल
धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओलने २०१९ मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. करणने मुंबईतील जुहू येथील इकोले मॉन्डियल वर्ल्ड स्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. परंतु, त्याच्या महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. करणला आपल्या वडिलांप्रमाणे आणि आजोबांप्रमाणे बॉलिवूडमध्ये स्वतःच एक यशस्वी करिअर घडवायचं आहे.
आर्यमान देओल
बॉबी देओलचा लाडका आर्यमान देओल बॉलिवूडपासून तसा दूरच आहे परंतु स्टार किड असल्यामुळे सोशल मीडियावर त्याचे फोटोज हे व्हायरल होतच असतात. तो या चित्रपटविश्वापासून दूर न्यूयॉर्कमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास करत आहे. आर्यमान आपल्यासारखा अभिनेता व्हावा अशी बॉबीची इच्छा असली तरी आर्यमान अजूनही फक्त अभ्यासातच लक्ष केंद्रित करत आहे.










