येत्या ११ ऑगस्टला अमिर खानची भूमिका असलेला लाल सिंग चढ्ढा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून चांगलाच गाजतोय. नेहमीप्रमाणे अमिर खानच्या वेगळ्या पठडीतील भूमिकेने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीणच वाढवलीये. पण तुम्हाला हे माहित आहे का की हा चित्रपट एका हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. होय, त्या हॉलिवूड चित्रपटाचे नाव आहे फॉरेस्ट गम्प. हॉलिवूडमध्ये सर्वोत्तम चित्रपटांमध्ये या फॉरेस्ट गम्पची गणना होते. आता त्याच चित्रपटाचा रिमेक आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण हॉलिवूडमध्ये फॉरेस्ट गम्पप्रमाणेच ५ असे चित्रपट आहेत, ज्यांना सर्वोत्तम चित्रपट असल्याचे म्हटले जाते. जेव्हाही हॉलिवूडमधील क्लासिक चित्रपटांची चर्चा होते, तेव्हा या चित्रपटांचे नाव येतेच, त्यामुळे भविष्यात या हॉलिवूड चित्रपटांचाही रिमेक भारतीय सिनेमांमध्ये झाल्यास आश्चर्य वाटायला नको, कोणते आहेत ते ५ चित्रपट चला जाणून घेऊया
जेव्हाही बेस्ट चित्रपटांबद्दल बोलले जाते, त्यात द शॉशँक रिडम्पशन या चित्रपटाचे नाव येतेच. 1994 साली आलेल्या हा चित्रपट त्यावेळी फार चालला नाही, मात्र तरीही तो चित्रपट नंतर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. स्टिफन किंग यांच्या रिता हेवर्थ अँड शॉशँक रिडम्पशन या पुस्तकावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या स्टोरीबाबत हेच सांगता येईल की जेव्हा सर्व संपलंय असं वाटत असताना विश्वास ठेवणं कठीण असतं. पण हार मानायची नसते. हाच संदेश हा चित्रपट देऊन जातो. या चित्रपटात दाखवलेले जेलमधील सीन, भावनिक क्षण आणि रहस्यमय कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
या यादीतील दुसरे नाव म्हणजे कास्ट अवे. २००० साली रिलीज झालेल्या या चित्रपटात फेडेक्स एक्झिक्युटिव्ह असलेल्या चक नोलँड याचा एका निर्जन बेटावरील प्रवास दाखवण्यात आला आहे. यात तो ज्याप्रकारे त्याचे रिसोर्सेस वापरतो, तो एकप्रकारे संदेश देऊन जातो. ही कथा प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवते. त्याचमुळे हा चित्रपट सर्वोत्तम चित्रपटांमध्येही गणला जातो. या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबर्ट झेमेकिसने केले असून टॉम हॅन्क, हेलेन हंट आणि निक सेअर्सी हे प्रमुख भुमिकेत आहेत.
साल १९८६ मध्ये प्रदर्शित झालेला टॉप गन हा चित्रपटही अनेकांसाठी कौतुकास पात्र ठरला. टॉनी स्कॉट दिग्दर्शित या चित्रपटात टॉम क्रुज, केली मॅगिल्स, टीम रॉबिन्स हे प्रमुख भुमिकेत आहे. या चित्रपटात युनायटेड स्टेट्स नेव्हीची एलिट फायटर वेपन्स स्कूलमधील विद्यार्थांमध्ये सर्वोत्तम ठरण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याचे दाखवले आहे. यात एक युवा पायलेट एका सिव्हिलियन इस्ट्रक्टरकडून काही गोष्टी शिकतो, ज्या त्याला त्याच्या वर्गात शिकवलेल्या नसतात. याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. हा चित्रपट ऍडव्हेंचर असून अनेक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
लिओनार्डो दी कॅप्रिओची प्रमुख भूमिका असलेला द वॉल्फ ऑफ वॉल स्ट्रीट हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटात अमेरिकेतील बिझीनेसमन, लेखक आणि वक्ता जॉर्डन बेलफॉर्ट यांच्या जीवनातील सत्य घटना दाखवण्यात आल्यात. स्टॉक ब्रोकर बनत ते कशाप्रकारे यश मिळवतात हे दाखवण्यात आलंय. पण एकदा यश डोक्यात गेले आणि पाय जमीनीवर नसतील तर तुमचे नुकसान नक्की असते. जॉर्डन बेलफॉर्ट यांची कथाही हेच सांगते. घोटाळे, भ्रष्टाचार यामुळे त्यांच्या यशानेही उताराची वाट धरली. चित्रपटात यश आणि अपयशाच्या या दोन्ही बाजू दाखवण्यात आल्या आहेत. आज या सर्व गोष्टींनंतर जॉर्डन बेलफॉर्ट अमेरिकेत एक वक्ता आणि लेखक म्हणून आपले आयुष्य व्यतित करत आहेत. पण त्याच्या जीवनकथेतून अनेकांना बोध मात्र मिळालाय.
या यादीतील अखेरचे नाव म्हणजे ग्लॅडिएटर्स. २००० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे करोडो चाहते सापडतील. ऍक्शन चित्रपट असलेल्या ग्लॅडिएटर्समध्ये एका भ्रष्ट राजाचा एक ग्लॅडिएटर कशाप्रकारे बदला घेतो हे दाखवले आहे. राजाने त्या ग्लॅडिएटरच्या कुटुंबाची हत्या केलेली असते आणि त्यालाही गुलाम बनवलेलं असतं. पण तो ग्लॅडिएटर त्या राजाचा बदला घेतो. याच कथेभोवती हा चित्रपट फिरतो. ग्लॅडिएटर ही रोमन साम्राज्यात दिली जाणारी पदवी होती. या चित्रपटात रसेल क्रो, जोक्विन फिनिक्स मुख्य भुमिकेत आहेत.
तर, मंडळी हे आहेत हॉलिवूडमधील सर्वोत्तम म्हणून गणले जाणारे ५ चित्रपट. या चित्रपटांवरही जर त्याच दर्जाचा रिमेक भारतातही झाला, तर नक्कीच ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकतात.
इथे पाहा व्हिडिओ: लालसिंग चढ्ढाच नाही, तर या हॉलिवूड चित्रपटांवरही बनू शकतात बेस्ट रिमेक | 5 best Hollywood Movies