Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

धर्मेेंद्रसोबत अधुरे प्रेम, प्रसिद्ध डाकूच्या हातावर चाकूने ऑटोग्राफ, लग्नानंतर अशाप्रकारे बदलले ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीना कुमारीचे जीवन

‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून हिंदी सिनेमात कायमच मीना कुमारी (meena kumari) ओळखल्या जातात. मीना कुमारी यांनी त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या सौंदर्याने चित्रपटसृष्टीसोबतच संपूर्ण प्रेक्षकांवर मोहिनी घातली होती. मीनाकुमारी म्हणजे हिंदी सिनेसृष्टीला पडलेले एक असे स्वप्न होते जे कधीच संपू नये आणि तुटू नये असे सर्वांना वाटायचे. मात्र, ३१ मार्च १९७२ ला अखेर हे स्वप्न तुटले आणि मीना कुमारी यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी त्यांच्या ३२ वर्षाच्या करियरमध्ये जवळपास ९० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त त्यांचे वैयक्तिक जीवन सर्वांच्या चर्चेचा विषय होता.

मेहजबीन बानो उर्फ मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट, १९३३ रोजी मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मुस्लिम परिवारात झाला. त्यांचे वडील अली बख्श एका पारसी थिएटरमध्ये काम करायचे, तर आई इकबाल बेगम ह्या नृत्यांगना होत्या. त्यांच्या परिवाराची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने मीना कुमारी यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना त्यांचे शालेय शिक्षण सोडावे लागले. १९३९ साली आलेल्या विजय भट्ट यांच्या ‘लेदरफेस’ सिनेमात त्यांना बालकलाकार म्हणून काम करायची संधी मिळाली. त्यांनी बहुतकरून विजय भट्ट यांच्या सिनेमांमध्येच काम केले. १९४० साली आलेल्या ‘एक ही भूल’ सिनेमाच्या दरम्यान विजय भट्ट यांनी त्यांना ‘बेबी मीना’ हे नाव दिले. बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुख्य अभिनेत्री म्हणून काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

Meena-Kumari
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/Shemaroo Filmi Gaane

विजय भट्ट यांनी त्यांना त्यांच्या ‘बैजू बावरा’ या सिनेमासाठी पहिल्यांदा नायिका म्हणून काम करण्याची संधी दिली. हा सिनेमा सुपरहिट झाला आणि मीना कुमारी यांच्या करियरला वळण मिळाले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांना मिळणाऱ्या यशामुळे त्यांनी त्यांच्या घराची आर्थिक चणचण संपुष्टात आणली. मीना कुमारी यांनी वयाच्या १९ व्या वर्षी १९ वर्ष मोठ्या कमाल अमरोही यांच्याशी लग्न केले. मुख्य म्हणजे कमाल आधीपासूनच विवाहित होते. मात्र, मीना कुमारी आणि कमाल यांचे लग्न टिकले नाही.

मात्र, मीना कुमारी यांचे करियर चालू होते. त्या मोठ्या, प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार झाल्या. त्यांनी बैजू बावरा, परिणिता, दो बीघा जमीन, चांदनी चौक, आजाद, यहूदी, दिल अपना और प्रीत पराई, कोहिनूर, साहेब बीवी और गुलाम, दिल एक मंदिर, फूल और पत्थर, चित्रलेखा, काजल, मंझली दीदी, पाकीजा, मेरे अपने आदी अनेक चित्रपटात काम करून त्या स्टार झाल्या. त्यांच्याबद्दल असे सांगितले जाते की, त्या मोठमोठे संवाद केवळ ऐकूनच लक्षात ठेवायच्या. त्यांना पाहून राज कपूर देखील त्यांचे संवाद विसरून जायचे. मधुबाला यांनी म्हटले होते की, ‘मीना कुमारी यांच्या सारखा आवाज कोणालाच मिळाला नाही आणि कधी मिळणार देखील नाही.’

meena kumari
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/

मीना कुमारी यांच्या करियरमधील माइलस्टोन सिनेमा ठरलेला ‘पाकिजा’ त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. हा सिनेमा पूर्ण करायला तब्बल १४ वर्ष इतका मोठा काळ लागला. १९५८ साली सिनेमाचे शूटिंग सुरु झाले. कमाल अमरोही दिग्दर्शक आणि मीना कुमारी या सिनेमात ‘साहिबजान’ या मुख्य भूमिकेत होत्या. या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले आणि १९६४ साली कमाल आणि मीना कुमारी विभक्त झाले. त्यांच्या वेगळे होण्याचा या सिनेमाच्या चित्रीकरणावर मोठा परिणाम झाला आणि सिनेमाचे शूटिंग बंद झाले. यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण टिमसोबतच इतर तंत्रज्ञानावर खूप मोठा परिणाम झाला. त्यांनी सर्वानी मिळून कमाल अमरोही यांना हा सिनेमा पुन्हा सुरु करण्याची विनंती केली.

कमाल यांनी सर्वांची ही इच्छा मीना कुमारी यांना बोलून दाखवली. त्या देखील या सिनेमासाठी पुन्हा तयार झाल्या. मात्र, त्यांनी एक अट ठेवली. यात त्यांनी कमाल यांना सांगितले की, त्या या चित्रपटासाठी मानधन घेणार नाही. अखेर या सिनेमाचे पुन्हा शूटिंग चालू झाले आणि ४ फेब्रुवारी, १९७२ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला. अतिशय सुंदर आणि श्रवणीय गाणी, मीना कुमारी यांचा प्रभावशाली अभिनय असूनही हा सिनेमा सुरुवातीला फ्लॉप झाला. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानच मीना कुमारी दारूच्या आहारी गेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्या तब्बेतीवर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात झाली होती.

सिनेमा फ्लॉप होत आहे असे समजल्यावर त्यांनी अतिशय आजारी असूनही एक मुलाखत करण्याचे ठरवले. त्यांनी या मुलाखतीमधून प्रेक्षकांना सिनेमा बघण्यासाठी आवाहन केले. प्रेक्षकांनी देखील ते ऐकले आणि हा सिनेमा पाहण्याचे ठरवले. हळूहळू रसिकांनाही हा सिनेमा आवडला आणि माऊथ पब्लिसिटीने या सिनेमाला खूप फायदा झाला. चित्रपटाला जबरदस्त यश मिळाले. त्यांची आगाज़ तो होता है, अंजाम नहीं होता, जब मेरी कहानी में वो नाम नहीं होता ही शायरी आजही अनेक प्रेक्षकांच्या मुखात असते.
जेव्हा मीना कुमारी यांनी दिला होता डाकूच्या हातावर चाकूने ऑटोग्राफ
प्रसिद्ध पत्रकार विनोद मेहता यांनी त्यांच्या मीना कुमारी यांच्या बायोग्राफीमध्ये सांगितले आहे की, एकदा आऊटडोर शूटिंगदरम्यान कमाल अमरोही यांच्या गाडीतील पेट्रोल संपले होते. त्यावेळी मीना कुमारीही त्यांच्यासोबत दुसऱ्या कारमध्ये होत्या. ही घटना मध्य प्रदेशच्या डाकू असणाऱ्या भागात झाली होती. रात्रीच्या वेळी गुंडांनी त्यांना घेरले, परंतु जेव्हा त्यांना समजले की, गाडीत मीना कुमारी आहेत. त्यावेळी त्यांची जेवणापासून ते झोपण्यापर्यंतची सोय करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी डाकूच्या सरदाराने मीना कुमारी यांना आपल्या हातावर चाकूने ऑटोग्राफ मागितला होता, जो मीना कुमारी यांनी दिला. त्यानंतर समजले की, तो प्रसिद्ध गुंड अमृत लाल होता.

meena-kumari
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/
धर्मेंद्र यांच्यावर झाले होते प्रेम

असे म्हटले जाते की, कमाल अमरोही यांच्यापासून दूर झाल्यानंतर मीना कुमारी धर्मेंद्र यांच्या जवळ आल्या होत्या. त्यावेळी मीना कुमारी या कारकीर्दीच्या शिखरावर होत्या, तर धर्मेंद्र हे बॉलिवूडमध्ये संघर्ष करत होते. तरीही असे म्हटले जाते की, मीना कुमारी धर्मेंद्र यांच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या, तर धर्मेंद्र यांना त्यांचा वेडेपणा सहन झाला नाही आणि ते त्यांच्यापासून दूर झाले.

मीना कुमार धर्मेंद्र यांच्यावर खूप प्रेम करायच्या. धर्मेंद्र  त्यांचा अति पझेसिव्हपणा सहन करू शकले नाहीत. असे म्हटले जाते की, धर्मेंद्र यांनी एकदा मीना कुमारी यांना चापट मारली होती. तरीही, हे किती खरे आहे याबाबत काही माहिती नाही. परंतु असेही म्हटले जाते की, धर्मेंद्र यांच्या दूर जाण्यानंतर मीना कुमारी यांना दारूचे व्यसन लागले होते.अखेरच्या श्वासापर्यंत प्रेमासाठी आसुसलेल्या मीना कुमारी ३१ मार्च, १९७२ ला मीना कुमारी यांनी या जगाचा निरोप घेतला.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक

ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…

 

हे देखील वाचा