Friday, February 20, 2026
Home कॅलेंडर ‘माझ्या अंत्यविधीसाठी कोणत्याही पंडिताला बोलवू नका’, दिग्गज अभिनेत्याने मरण्यापुर्वी व्यक्त केली होती इच्छा

‘माझ्या अंत्यविधीसाठी कोणत्याही पंडिताला बोलवू नका’, दिग्गज अभिनेत्याने मरण्यापुर्वी व्यक्त केली होती इच्छा

हिंदी सिनेजगतात अभिनेते व लेखक बलराज साहनी यांची आजही ओळख एक दिग्गज व्यक्तीमत्त्व म्हणूनच आहे. अत्यंत प्रतिभावान व प्रतिभाशाली कलाकारांमध्ये त्यांचे नाव आजही घेतले जाते. त्यांनी फिल्मी कारकिर्दीत अनेक सिनेमांत काम केले परंतू त्यांच्या भूमिका या खऱ्या अर्थाने सामान्य माणासचे दु:ख व समस्या मांडणाऱ्याच राहिल्या. ते त्यांच्या वास्तविक जीवनातही अभ्यासू आणि प्रामाणिक व्यक्ती होते. त्यांनी निभावलेल्या पात्राकडे जर बारकाईने पाहिले तर चटकन लक्षात येते की, ते जगातील कोणत्याही सामान्य माणसाची व्यक्तिरेखा पडद्यावर उत्तम साकारू शकतात.

बलराज साहनी यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी होते. बलराज साहनी यांचा जन्म १ मे १९१३ रोजी पाकिस्तानमध्ये झाला होता. त्यांनी लाहोर विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर ते आपल्या कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्यासाठी रावळपिंडीला गेले. १९३८मध्ये त्यांनी महात्मा गांधींबरोबरही काम केले होते.

बलराज साहनी यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक छंदही जोपासले होते. त्यांना पाण्याची खूप आवड होती. जेव्हा पाण्यात पोहण्याची किंवा बर्फाच्या पाण्याने आंघोळ करायची संधी मिळायची, तेव्हा ते खुप खुश व्हायचे. बलराज यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

१९४६ साली ‘इप्टा’ मध्ये ‘इंसाफ’ नाटकात काम करण्याची प्रथम संधी त्यांना मिळाली. यासह, बलराज साहनी यांना ख्वाजा अहमद अब्बास दिग्दर्शित ‘धरती के लाल’ चित्रपटात अभिनेता म्हणून काम करण्याची संधीही मिळाली. बलराज साहनी संपूर्ण मार्क्सवादी होते. ते या विचारसरणीचे इतके अनुसरण करायचे की, शेवटच्या क्षणी ते म्हणाले, “जेव्हा मी या जगाला निरोप देईल, तेव्हा कोणत्याही पंडिताला बोलवू नका. कोणतेही मंत्र उच्चारण होणार नाही. जेव्हा माझी अंतिम यात्रा काढली जाईल, तेव्हा माझ्या शरीरावर लाल रंगाचा झेंडा असावा.” १३ एप्रिल १९७३ रोजी त्यांनी मुंबई शहरातच अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्यावर लिहिलेले ‘द नॉन कन्फर्मिस्टः मेमरीज ऑफ माय फादर बलराज साहनी’ हे पुस्तक खुप काही सांगुन जाते.

हे देखील वाचा