Monday, January 19, 2026
Home कॅलेंडर रेडिओवरील पहिले गाणे ऐकून वडिलांकडून ‘अशी’ मिळाली होती दाद, लता दीदींनी सांगितली आठवण

रेडिओवरील पहिले गाणे ऐकून वडिलांकडून ‘अशी’ मिळाली होती दाद, लता दीदींनी सांगितली आठवण

गानसम्राज्ञी लता मंगेशकर ह्या आज कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नसल्या तरी त्या सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असतात. त्या त्यांच्या ट्विटर वरून अनेक शुभेच्छा देताना दिसत असतात. सोबतच अनेक किस्से, आठवणी सुद्धा त्या नेहमी सांगत असतात. नुकतीच लता दीदींनी त्यांच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण घटना सगळ्यांसोबत शेयर केली आहे.

लता दीदींनी ट्विट करत सांगितले की १६ डिसेंबर १९४१ साली म्हणजेच जवळपास ७९ वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा रेडिओवर गाणे गायले होते. ही आठवण सांगताना लता दीदींनी लिहले की, “आजच्या दिवशी म्हणजे १६ डिसेंबर १९४१ साली मी माझ्या कारकिर्दीतील पहिलं गाणं रेडिओवर गायलं होतं. या घटनेला आज तब्बल ७९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यावेळी मी रेडिओवर दोन न्याट्यगीत गायले होते. माझ्या वडिलांनी जेव्हा माझा आवाज रेडिओवर ऐकला तेव्हा ते खूप खुष झाले, आणि ही आनंदाची बातमी त्यांनी लगेचच माझ्या आईला सांगितली. माझे कौतुक करत ते माझ्या आईला म्हणाले की, आता मला कुठल्याच गोष्टीची चिंता नाही.”

२८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदोर मध्ये जन्मलेल्या लता दीदी आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये सर्वात मोठ्या. लता दीदींनी गाण्याचे शिक्षण त्यांच्या वडिलांकडे म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडे घेतले. लता दीदी १३ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर दीदींनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली. त्यांना त्यांच्या वडिलांचे जवळचे असणारे आणि नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी दीदींच्या परिवाराची काळजी घेत, लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून काम देण्यास सुरुवात केली. त्यानंतर दीदींनी कधीच मागे वळून पहिले नाही. त्यांच्या जीवनात अनेक उतार चढाव आले मात्र त्या धीराने सर्वाला सामोऱ्या गेल्या.

लता दीदींनीआजवर २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. लता दीदींना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारच्या सर्वोच्च अशा ‘भारतरत्न’ पुरस्काराने २००१ मध्ये गौरविण्यात आले. त्या पहिल्या महिला ठरल्या ज्यांना भारतरत्न प्रदान झाला. लता दीदींनी १९७४ ते १९९१ या काळात सर्वात जास्त रेकॉर्डिंग्स केल्यामुळे त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदवण्यात आले. त्यांना २००७ मध्ये फ्रांसचा ‘सिविलियन अवॉर्ड लीजन ऑफ ऑनर’ हा पुरस्कार देखील प्रदान झाला.

हे देखील वाचा