मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनयासोबतच निर्मित क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येणार आहेत. यासाठी तिने बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवाला एंटरटेनमेंटसोबत हातमिळवणी केली आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेंनमेंट, जोफिएल एंटरप्राईज प्रस्तुत, वर्धा नाडियाडवाला, सह्याद्री फिल्म्स यांच्या नेतृत्वाखाली हे चित्रपट प्रदर्शित होणार असून या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत एक परिवर्तन घडवून आणण्याचा हा प्रयत्न असणार आहे.
मराठी चित्रपटातील काही निकष बाजूला ठेवून, मराठी कथानकाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे. या भागीदारीचा मुख्य हेतू म्हणजे पडद्यावर आपल्या भव्य संस्कृतीचे आणि ऐतिहासिक साहित्याचे प्रतिबिंब दाखवणे हा आहे. हृदयाचा ठाव घेणाऱ्या कथा, श्वास रोखून ठेवणारी दृश्ये आणि इतरांपेक्षा वेगळा आशय दाखवण्यासाठी ही टीम सज्ज झाली असून प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव या चित्रपटांच्या माध्यमातून मिळणार आहे, हे नक्की!
आपला आनंद व्यक्त करताना निर्मात्या वर्धा नाडियाडवाला म्हणतात, ” मराठी चित्रपटांसाठी सह्याद्री फिल्मसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे या भूमीशी, संस्कृतीशी आणि भाषेशी विशेष नाते आहे. हे आमचे घर आहे. त्यामुळे हे चित्रपट माझ्यासाठी खूप खास असतील. यात आम्हाला तेजस्विनीची साथ लाभली आहे. तेजस्विनी एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तिचा दृष्टिकोन खूपच वेगळा असणार, याची आम्हाला जाणीव असून मराठी चित्रपटाबद्दलच्या अंतर्दृष्टीवर आमचा विश्वास आहे. म्हणूनच तिच्या सहकार्याने प्रभावी कथा सादर करण्याचे उद्दिष्ट आहे. तेजस्विनीसोबत आम्ही आमच्या या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत. तिच्यासोबत आम्ही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि यासाठी आम्हाला प्रेक्षकांचे प्रेम आणि सहकार्य गरजेचे आहे.”
या भागीदारीबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ” ही भागीदारी खरोखरच अपवादात्मक आहे. माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी हा एक सन्मान आहे. ऐतिहासिकदृष्ट्या मराठी चित्रपट हे प्रतिभावान कलाकार आणि निर्मितीसाठी ओळखले जातात. ज्यांनी आजवर प्रेक्षकांना अनेक अविस्मरणीय आशय दिले आहेत. परंतु मराठी चित्रपटांमध्ये भव्यतेचा आणि वितरणाचा अभाव अनेकदा दिसतो. आता प्रतिष्ठित निर्माते साजिद नाडियाडवाला आणि वर्धा नाडियाडवाला यांच्यासोबत एकत्र येऊन आम्ही हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही भागीदारी ‘गेम चेन्जर’ ठरणारी असेल. जी प्रेक्षकांना मोठ्या सिनेमॅटिक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी एक विशाल कॅनव्हास देईल. या सहकार्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि आमची ही असाधारण कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी आम्हीही खूप उत्सुक आहोत. ”
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
राम चरणावर कमेंट करून शाहरुख बनला चर्चेचा विषय, किंग खानच्या समर्थनार्थ चाहत्यांनी घेतली वादात उडी
‘दृश्यम’ चित्रपटावरून मोहनलाल आणि अजय देवगणच्या चाहत्यांमध्ये वाद, दिग्दर्शकाने दिली ही प्रतिक्रिया