फरहान अख्तर हा केवळ एक प्रसिद्ध अभिनेता नाही तर एक प्रतिभावान दिग्दर्शक सुद्धा आहे. त्याने बरेचसे क्लासिक बॉलिवूड चित्रपट बनवले आहेत. आज जरी तो सर्वात यशस्वी अभिनेता-दिग्दर्शकांपैकी एक मानला जात असला तरी, एक काळ असा होता जेव्हा त्याच्या जीवनात कोणतेही ध्येय नव्हते आणि त्याचा असा विश्वास होता की एक मुलगा म्हणून त्याने आपल्या आईची निराशा केली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फरहान अख्तरने त्याच्या आयुष्यातील तो वाईट काळ आठवला जेव्हा तो ध्येयहीन होता आणि मद्यपान करू लागला होता.
फरहान अख्तर म्हणाला, “एक काळ असा होता जेव्हा मी खरोखरच ध्येयहीन होतो. मला माहित होते की मला लोकांचे मनोरंजन करायचे आहे, पण याबाबत काय करावे आणि ते कसे करावे हे मला कळत नव्हते. मी अभ्यासातही फारसा चांगला नव्हतो.”
तो पुढे म्हणाला, “मी कॉमर्ससाठी बॅचलर प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्याची चूक केली, ज्यामध्ये मला अजिबात रस नव्हता. पण, माझे सर्व मित्र जात होते म्हणून मला वाटले की चला जाऊया. आणि एका वर्षाच्या आत, मला वाटले की हे माझ्यासाठी नाही. मी जाणे बंद केले आणि थोडासा त्रास झाला. मी सतत तणावग्रस्त असायचो.”
आपल्या आईच्या संघर्षाची आठवण करून देताना फरहान म्हणाला, “ आई एकटी होती, झोया आणि माझी काळजी घेत होती. ती काम करत होती. म्हणून, मला वाटते की त्या वेळी तिला एक गोष्ट सर्वात महत्त्वाची होती, ती म्हणजे तीच्या मुलांपैकी एकजन यशस्वी होण्याची. मी पीत होतो आणि अजूनही बरेच काही करत होतो.”
फरहानला तो क्षण आठवला जेव्हा त्याच्या आईने त्याला जवळजवळ सोडूनच दिले होते आणि त्याने वडील जावेद अख्तर यांच्यासोबत राहा असे सुचवले होते. “त्या क्षणी जेव्हा मी त्या गोष्टींचा तीच्यावर होणारा परिणाम पाहिला आणि एक दिवस ती म्हणाली, ‘ऐक, मी तुझ्याबरोबर माझे सर्वोत्तम प्रयत्न केले. पण, मी आता काही करू शकत नाही. कदाचित तू तुझ्या वडिलांकडे जाऊन काही काळ राहायला हवं. मुलगा म्हणून मला त्यावेळी नापास झाल्यासारखे वाटले. मला त्यावेळी पहिल्यांदाच इतके वाईट वाटले होते. मी तेव्हा ठरवलं की आईच्या वाट्याला या गोष्टी आल्या नाही पाहिजेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
सिंगल की कमिटेडच्या प्रश्नावर अरबाझने दिलं उत्तर, ऐकून सगळ्यांनाच बसला धक्का…