Tuesday, July 1, 2025
Home कॅलेंडर शाहरूख आणि सलमान जिवाभावाचे मित्र, मात्र ‘या’ अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या बर्थडे पार्टीत झाला राडा!!

शाहरूख आणि सलमान जिवाभावाचे मित्र, मात्र ‘या’ अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या बर्थडे पार्टीत झाला राडा!!

सलमान आणि शाहरुख बॉलिवूडचे हे दोन खान सध्या बॉलिवूड वर राज्य करतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे दोघेही किती घनिष्ठ मित्र आहेत हेही आपल्याला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतू, मधल्या काही काळात या दोघांमधील कडाक्याचं भांडणही तितकंच गाजलं होतं.

सन २००८ मध्ये दोघांमध्ये आलेला हा दुरावा कमी व्हायला २०१४ साल उजाडावं लागले. यामधल्या काळात या दोघांनीही एकत्र येण्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांनी दुधाची तहान ताकावर भागवत, करण-अर्जुन हा सिनेमा कितीदा पाहिला असेल, हे त्यांनाच ठाऊक!

एका बर्थडे पार्टीमध्ये हे दोन्ही जिवाभावाचे मित्र वेगळे झाले होते. अशी ही बर्थडे पार्टी होती तरी कुणाची? आज या लेखातून जाणून घेऊयात.

कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये बॉलिवूडचे हे दोन महारथी जेव्हा एकमेकांशी भिडले तेव्हा बी टाऊनमध्ये भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शाहरुख आणि सलमानच्या या वादावर बर्‍याच जणांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला पण कुणालाही यात यश आलं नाही. कतरिनाच्या वाढदिवशी जे घडलं ते बरीच वर्षे दोघांच्याही मनात जळत असलेल्या आगीचा भडका होता.

वास्तविक, ही संपूर्ण बाब २००२ साली जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या राय यांच्यात झालेल्या ब्रेकमुळे सुरू झाली. एके दिवशी सलमान ‘चलते चलते’ चित्रपटाच्या सेटवर आला आणि भावाने राडाच घातला. कारण काय तर सिनेमात मुख्य भूमिका ऐश्वर्या साकारणार होती.

आपला घनिष्ठ मित्र हिच्यासोबत काम कसं करतो याचा त्याला राग आला होता. शाहरुखने सलमानला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण सलमान हट्टालाच पेटलेला. या गोष्टीचं शाहरुखला खूप वाईट वाटलं. सलमानच्या समाधानासाठी म्हणा, मैत्री टिकवण्यासाठी म्हणा त्याने ऐश्वर्याला चित्रपटातून काढून राणी मुखर्जीला कास्ट केलं. शाहरूखने हा कठोर निर्णय घेतला खरा परंतू त्यांच्या मनात ही बाब पुढची बरीच वर्षे सलत होती.

SK & SK
SK SK

या घटनेनंतर सलमान आणि शाहरुखमध्ये मतभेद वाढले. त्यानंतर १६ जुलै २००८ रोजी कतरिना कैफच्या वाढदिवशी सलमान आणि शाहरुख पुन्हा एकमेकांसमोर आले. दोघांनीही एकमेकांची मजा घेण्यास सुरूवात केली पण नंतर प्रकरण अधिकच वाढले आणि त्याचं रूपांतर भयंकर वादात झालं.

यानंतर दोघांनीही एकमेकांशी कायमस्वरूपी बोलण बंद केलं. त्यावेळी एका मुलाखतीत सलमानने सांगितलं होतं की, शाहरुखने माझ्याबद्दल जे सांगितलय ते मला आवडलेलं नाही. तरिही, तो माझ्या कुटुंबाचा आणि मी त्याच्या कुटुंबाचा आदर करतो. याउपर आम्ही एकमेकांकडे पाहतही नाही.

शाहरुख आणि सलमान यांच्यातील हा वाद अखेरीस सलमानची बहीण अर्पिता खानच्या लग्नात संपुष्टात आला. शाहरुखने अर्पिताच्या संगीत मैफिलीला हजेरी लावली आणि रिसेप्शनमध्ये त्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात तो घरच्या वऱ्हाडाप्रमाणे नाचला सुद्धा! परंतु काही अडचणींमुळे शाहरुख अर्पिताच्या लग्नाला मात्र उपस्थित राहू शकला नव्हता.

यानंतर २००२च्या सलमानविरोधात सुरू असलेल्या हिट अँड रन केसचा निकाल २०१५ मध्ये जेव्हा लागणार होता त्यावेळी सलमानला कोठडीत जावं लागणार, अशा चर्चा सर्वत्र सुरू होत्या. परंतु सलमानला आधार देण्यासाठी निकालाच्या आदल्या रात्री शाहरुखने त्याच्या या जिवलग मित्राची भेट घेतली आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.

दुसऱ्या दिवशी या केसमधून सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. अर्पिताच्या लग्नानंतर शाहरुखने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सलमानने आणि मी दुःखद क्षणांपेक्षा आनंदाचे क्षण जास्त एकत्र घालवले आहे. एक गोष्ट मी नक्किच नमूद करू इच्छितो की, आम्ही नेहमीच चांगल्या आणि वाईट क्षणांमध्ये एकमेकांच्या सोबत राहिलो आहोत आणि कायम राहू!

अशापद्धतीने हे दोघेही एकत्र आले आणि यानंतर दोघांनीही एकेमकांच्या सिनेमांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. शाहरुख ने सलमानच्या ट्युबलाईट या सिनेमात एका जादूगाराची तर सलमान ने शाहरुखच्या झिरो सिनेमामध्ये स्वतःचीच भूमिका साकारली होती.

हे देखील वाचा