‘केजीएफ’ फ्रँचायझीच्या प्रचंड यशानंतर कन्नड सुपरस्टार यश सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘टॉक्सिक🙁Toxic) अ फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ मुळे चर्चेत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यशचा गँगस्टर लूक चाहत्यांना भुरळ घालत असतानाच, टीझरमधील एका मिस्ट्री गर्लने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
टीझर रिलीज होताच काही तासांतच तो व्हायरल झाला आणि त्याहून जास्त चर्चा झाली ती यशसोबत इंटिमेट सीनमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीची. अखेर या मिस्ट्री गर्लची ओळख समोर आली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या अभिनेत्रीची ओळख जाहीर केली आहे. त्यांनी टीझरमधील एक स्टिल शेअर करत लिहिलं, “ही सुंदर अभिनेत्री बीट्रिज टौफेनबैक आहे.” यामुळे सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
टीझर आल्यानंतर अनेकांनी या अभिनेत्रीला हॉलीवूड एक्ट्रेस नताली बर्न असल्याचा अंदाज बांधला होता. सोशल मीडियावर तसे दावेही करण्यात आले. मात्र, दिग्दर्शिकेच्या पोस्टनंतर स्पष्ट झालं की ही अभिनेत्री नताली बर्न नसून बीट्रिज टौफेनबैक आहे.
बीट्रिज टौफेनबैक ही ब्राझिलियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ‘टॉक्सिक’च्या टीझरमुळे ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. 2014 साली तिने कॅरेक्टर मॉडेल टूरद्वारे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.
तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन रनवेवर काम केलं असून, अभिनयासोबतच तिला गायनाचीही आवड आहे. विशेष म्हणजे बीट्रिजला अनेक भाषा अवगत आहेत.
टीझरची सुरुवात एका शांत स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराने होते. पुढे यशच्या ‘राया’ या पात्राचा आणि बीट्रिजच्या पात्राचा एक इंटिमेट सीन दाखवण्यात आला आहे. त्यांच्या मागे बॉम्ब असतानाही दोघेही शांत दिसतात. त्यानंतर अचानक गोळीबार, धुरळा आणि पडणाऱ्या लाशांमध्ये राया हातात टॉमी गन आणि सिगार घेऊन पुढे जाताना दिसतो. यशच्या ‘टॉक्सिक’ने टीझरमधूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असून, आता या चित्रपटाची रिलीजची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
पोस्टपार्टममध्ये परिणीती चोपडाने सांगितलं शांत राहण्याचं रहस्य, हनुमान चालीसा झाली आधार










