आजच्या घडीला बॉक्स ऑफिसवर मोठे स्टार्स, प्रचंड बजेट आणि जोरदार प्रमोशन असलेल्या चित्रपटांचे वर्चस्व दिसून येते. शेकडो कोटींची कमाई आणि मोठा गाजावाजा यामुळे अशाच चित्रपटांची चर्चा होते. अशा वातावरणात कमी बजेटच्या आणि साध्या कथानकाच्या चित्रपटांना टिकून राहणे कठीण मानले जाते. मात्र नुकतेच बॉक्स ऑफिसवर घडलेले चित्र याला अपवाद ठरले आहे. अत्यंत मर्यादित प्रसिद्धीसह प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटाने कोणताही गोंगाट न करता प्रेक्षकांचा विश्वास जिंकत मोठ्या चित्रपटांनाही नफ्याच्या बाबतीत मागे टाकले आहे.
या चित्रपटाच्या यशामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सकारात्मक ‘वर्ड ऑफ माउथ’. ना सुपरस्टार, ना मोठे प्रमोशन, तरीही प्रेक्षक आवर्जून हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचत राहिले. १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे (Hemant Dhome)यांनी केले आहे. सुरुवातीच्या दिवसांत फारशी चर्चा नसली तरी हळूहळू चित्रपटाची लोकप्रियता वाढत गेली आणि तो नववर्षातील सर्वात मोठा सरप्राइज हिट ठरला.
साधी पण प्रभावी कथा, मजबूत व्यक्तिरेखा आणि हृदयाला भिडणाऱ्या भावना हे या चित्रपटाचे मोठे बलस्थान ठरले. मराठी चित्रपट असूनही त्याने संपूर्ण देशभरात आपली ओळख निर्माण केली. या चित्रपटाचे नाव आहे ‘क्रांतिज्योति विद्यालय मराठी माध्यम’. हा एक भावनिक सामाजिक विषयावर आधारित चित्रपट असून मराठी सिनेमातील संवेदनशीलता आणि साधेपणाचे सुंदर दर्शन घडवतो.
कथेचा केंद्रबिंदू आहे एक जुनी मराठी माध्यमाची शाळा, जी इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शाळेचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येऊन ती वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. मैत्री, जुन्या आठवणी, हलकीफुलकी विनोदाची फोडणी आणि भावनिक प्रसंग यांचा सुंदर समतोल चित्रपटात पाहायला मिळतो.
या चित्रपटात कोणताही मोठा सुपरस्टार नाही, तरीही बॉक्स ऑफिसवर त्याने दमदार कामगिरी केली आहे. सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, कादंबरी कदम आणि हरीश दुधाडे यांसारख्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने कथेला अधिक प्रभावी बनवले आहे.
ट्रेड तज्ज्ञांच्या मते, ‘क्रांतिज्योति विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाचा एकूण बजेट केवळ २ कोटी रुपये होता. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ६.१४ कोटींची कमाई केली, तर दुसऱ्या वीकेंडला आणखी ५.११ कोटींची भर घालत अवघ्या ११ दिवसांत एकूण कलेक्शन ११.२५ कोटींवर पोहोचले.
नफ्याच्या बाबतीत या चित्रपटाने इतिहास रचला आहे. सुमारे ९.२५ कोटींच्या नेट प्रॉफिटसह तब्बल ४६२.५ टक्के रिटर्न देत या मराठी चित्रपटाने अनेक मेगाबजेट चित्रपटांनाही मागे टाकले आहे. नफ्याच्या टक्केवारीत रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ आणि प्रभासचा ‘द राजा साब’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांनाही हा सिनेमा मागे टाकतो.
कमी बजेट, कोणताही स्टारडम नसतानाही ‘क्रांतिज्योति विद्यालय मराठी माध्यम’ हा २०२६ मधील आतापर्यंतचा सर्वाधिक नफा कमावणारा चित्रपट ठरला आहे. IMDb वर ९.५ रेटिंग मिळालेला हा चित्रपट पुन्हा एकदा सिद्ध करतो की, सच्ची कथा आणि भावनिक जोड हेच सिनेमाचे खरे सामर्थ्य आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










