Thursday, July 16, 2026
Home मराठी समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक प्रवास..; ‘समर्थ’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक प्रवास..; ‘समर्थ’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आधुनिक जीवनातील धावपळ, कुटुंबातील मतभेद आणि अध्यात्मातून जीवनाला मिळणारी नवी दिशा यांची भावस्पर्शी झलक या टीझरमधून पाहायला मिळते.

टीझरमध्ये एका सामान्य कुटुंबाच्या आयुष्यात घडणारे अनपेक्षित वळण उलगडताना दिसते. एका बाजूला अध्यात्माकडे झुकणाऱ्या वडिलांचा प्रवास, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारसरणी असलेल्या मुलाचा त्याला असलेला विरोध—या दोन पिढ्यांतील संघर्ष अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. समर्थ रामदास स्वामींचे विचार हे केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित नसून, जीवन जगण्याची योग्य दिशा देणारे आहेत, हे टीझर सूचकपणे अधोरेखित करतो.

या विचारांचा या कुटुंबावर नेमका काय परिणाम होईल? वडील आणि मुलामधील दुरावा कमी होईल का? समर्थांच्या शिकवणीतून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना मिळणार आहेत.

दिग्दर्शक योगेश फुलफगर म्हणतात, “‘समर्थ’ हा चित्रपट आजच्या पिढीसमोर उभ्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे समर्थ रामदास स्वामींच्या विचारांतून शोधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधणारी ही कथा प्रत्येक कुटुंबाला स्वतःची वाटेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

निर्माते रविंद्र पाठक म्हणाले, “‘समर्थ’ हा चित्रपट म्हणजे दोन पिढ्यांमधील संवाद पुन्हा सुरू करण्याचा एक प्रयत्न आहे. अध्यात्म, नाती आणि जीवनमूल्ये यांचा सुंदर समतोल साधणारी ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक पिढीला स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडणारा हा चित्रपट ठरेल, असा मला विश्वास आहे.”

थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट १४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. समर्थ रामदास स्वामींच्या विचारसंपदेचा आधुनिक संदर्भात घेतलेला हा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करेल.

या चित्रपटात भूषण (bhushan) प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनिस, हार्दिक जोशी, ईशा केसकर, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, यतिन कार्येकर, दिशा परदेशी आणि निखिल राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाची निर्मिती रविंद्र पाठक यांनी केली असून अमोल भगत हे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत.

 

हेहि वाचा

‘हैवान’चा फर्स्ट लूक आउट, अक्षय कुमार आणि सैफ अली खानच्या खतरनाक लुकची होतीय चर्चा

हे देखील वाचा