Friday, October 18, 2024
Home बॉलीवूड महान गायक किशोर कुमार यांच्या मध्यप्रदेशातील बंगल्याचे होणार संग्रहालयात रुपांतर; प्रशासनाने केली तयारी सुरू

महान गायक किशोर कुमार यांच्या मध्यप्रदेशातील बंगल्याचे होणार संग्रहालयात रुपांतर; प्रशासनाने केली तयारी सुरू

आपल्या देशात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या. साधू संतांपासून ते अगदी स्वातंत्रवीर, क्रांतिकारक, नेते, कलाकारांपर्यंत. आपापल्या क्षेत्रात दिग्गज असणाऱ्या व्यक्तींचा इतिहास आपल्याला इकडून तिकडून समजतच असतो. मात्र, त्यांना अधिक जाणून घेण्यासाठी, त्यांचा सहवास समजून घेण्यासाठी आपण नुसती माहिती न ऐकता त्यांनी जिथे त्यांचे आयुष्य व्यतीत केले अशा ठिकाणांना भेटी देणे आवश्यक असते. मात्र, आपल्या देशात दिग्गज लोकांच्या ज्या काही खुणा राहिल्या आहेत, त्या खुणा जपण्यासाठी खूप कमी प्रयत्न होताना दिसतात.

काही महिन्यांपूर्वी राज कपूर आणि आणि दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित घरांना संग्रहालयात बदलण्यात येणार असल्याची बातमी आली होती. आता या यादीत महान गायक किशोर कुमार यांच्या घराचाही समावेश केला जाणार आहे. महान लोकांच्या आठवणी आणि त्यांच्या कारकिर्दीची माहिती देणारे हे संग्रहालय म्हणजे देशाची संपत्तीच आहे.

मध्यप्रदेशमधील खांडवा येथे असलेल्या किशोर कुमार यांच्या बंगल्याचे रूपांतर आता एका मोठ्या संग्रहालयात होणार आहे. सरकारने आणि प्रशासनाने हे संग्रहालय बनवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवातसुद्धा केली आहे. खांडवा येथी जिल्हाधिकारी अनय द्विवेदी यांनी पब्लिक ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश काढले असून, या ट्रस्टमध्ये किशोर कुमार यांच्या परिवाराला सामील करून घेतले जाणार आहे.

एसडीएम ममता खेडे यांनी या बंगल्याचे निरीक्षण केले असून, जिल्हाधिकारी अनय द्विवेदी यांनी किशोर सांस्कृतिक प्रेरणा मंचाच्या सदस्यांसोबत बैठक केली. हे तयार होणारे संग्रहालय लोकांच्या मदतीने बनणार असल्याचे समजत आहे. जिल्हाधिकारी अनय द्विवेदी यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, संग्रहालय बनवण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक विभागाला पाठवण्यात आला आहे. यादरम्यान किशोर कुमार यांचा भाचा असलेल्या अर्जुन कुमारला भेटून त्याला या उपक्रमासंबंधी तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

या संग्रहालयामुळे आजच्या आणि उद्याच्या किंबहुना येणाऱ्या अनेक पिढ्यांना किशोर कुमारांसारख्या महान गायकाबद्दल माहिती मिळणार आहे. किशोर कुमार यांनी ‘रूप तेरा मस्ताना’, ‘तेरे बिना जिंदगी से’, ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘चिंगारी कोई भडके’, ‘मेरे सपनो की राणी’, ‘एक अजनबी हसीना से’, ‘भीगी भीगी रातों में’ यांसारखी सुपरहिट गाणी गायली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा