सध्या हिंदी सिनेसृष्टीमध्ये बायोपिकचा सिझन सुरु आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्ग्ज लोकांवर बॉलिवूडमध्ये चित्रपट बनत आहे. मागील काळात ‘मेरी कॉम’ पासून ते अगदी ‘महेंद्रसिंग धोनी’ पर्यंत अनेक महान लोकांवर आजपर्यंत चित्रपट तयार झाले आहेत. बायोपिक चित्रपटांमधून त्या विशिष्ट्य व्यक्तीचा त्याच्या क्षेत्राला प्रवास दाखवला जातो. येत्या काही काळातही आपल्याला अनेक बायोपिक पाहायला मिळणार आहे. त्यातलीच एक बायोपिक म्हणजे, ‘गंगुबाई काठियावाडी’.
संजय लीला भन्साळी लवकरच हा सिनेमा आपल्यासाठी घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या घोषणेआधी खूप कमी लोकांना ‘गंगुबाई काठियावाडी’ या व्यक्तिरेखेबद्दल माहित असेल. मात्र चित्रपटाच्या घोषणेनंतर ‘गंगुबाई काठियावाडी’ हा शब्द अचानक खूप प्रसिद्ध झाला. भन्साळी यांनी आलिया भट्टला घेऊन या सिनेमाची घोषणा जानेवारी २०२० मध्ये केली. हा सिनेमा हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला मुंबईत सुरुवात झाला आहे. भन्साळी यांचा सिनेमा आणि वाद नाही असे फार कमी वेळा होते. नुकतेच गंगुबाई यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाबद्दल आक्षेप घेत संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन कैदी यांच्या विरोधात सिविल कोर्टात गुन्हा दाखल केला आहे. आता हा गुन्हा चित्रपटासाठी निश्चितच डोकेदुखी ठरू शकतो. कोर्टाने संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट, हुसेन कैदी यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ७ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. अजूनपर्यंत चित्रपटाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती आली नाहीये. पण या केसमुळे चित्रपटाच्या शूटिंगवर आणि प्रदर्शनावर याचा नक्कीच परिणाम होईल.
संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटाची कथा ६० च्या दशकातील असल्यामुळे तसा सेट तयार करायला भंसाळी यांनी खूप काम केले. अनेक आर्किटेक्ट आणि सेट डिझायनर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मुंबईत सेट तयार केला आहे. हा सेट तयार करायला सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च आला आहे असे सांगितले जात आहे.
‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकानुसार ‘गंगा हरजीवन दास’ म्हणजेच गंगूबाई, गुजरातमधील कठियावाड येथील राहणाऱ्या होत्या. त्यामुळेच त्यांना गंगूबाई काठियावाडी या नावाने ओळखलं जाऊ लागलं. गंगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियातले एक मोठे नाव होते. गंगुबाई यांना त्यांच्या पतीने केवळ ५०० रुपयांत विकले होते. त्यानंतर त्या वेश्या व्यवसायात गुंतल्या. करीम लालाच्या गँगमधील एकाने गंगुबाईंवर बलात्कार केला. त्याचा न्याय मागण्यासाठी गंगूबाई करीमला भेटल्या आणि त्याला राखी बांधून स्वतःचा भाऊ बनवलं. गंगुबाई कुख्यात गुंड करीम लालाची बहीण म्हटल्यावर त्याचं कामाठीपुरामध्ये वजन वाढलं. असं सांगितले जाते की, गंगूबाई कोणत्याही मुलीला तिच्या इच्छेविरूद्ध कोठ्यावर काम करायला घ्यायच्या नाही. गंगुबाई यांनी कामाठीपुरामध्ये अनेक मुलींच्या उन्नतीसाठी काम केले.
गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया व्यतिरिक्त इम्रान हाश्मी आणि पाहुणा कलाकार म्हणून अजय देवगण दिसणार आहे. अजय देवगण या सिनेमात आलियाच्या गुरूची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात आली आहे.