आवाजच्या दुनियेतील बेताज बादशहा म्हणून ओळखले जाणारे ‘मोहम्मद रफी‘ यांचा आज वाढदिवस. 1950 ते 1980 हा काळ संगीतक्षेत्रावर रफी यांनी अक्षरशः राज्य केले. रोमँटिक गाणी, देशभक्तीपर गीते, दर्द असणारी गाणी, गझल, कव्वाली आदी अनेक प्रकारची गाणी रफी यांनी अगदी लीलया गायली. हिंदी, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगू भाषांमध्ये रफी यांनी जवळपास 28000 गाणी रेकॉर्ड केली.
24 डिसेंबर 1924 ला अमृतसर जवळील कोटला सुलतान सिंग या गावात रफी यांचा जन्म झाला. हाजी अली मोहंमद यांच्या सहा अपत्यांपैकी रफी हे त्यांचे दुसरे अपत्य होते. एका फकिराच्या गाण्याने प्रभावित होऊन रफी यांनी गाणे गायला सुरुवात केली. रफी यांनी उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टू आणि फिरोज निजामी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.
1944 साली रफी यांनी मुंबई गाठत चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळावी म्हणून अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या भेटी घेतल्या. त्यातच जी. एम. दुर्रानी यांनी रफी यांना त्यांच्या ‘गाव की गोरी’ चित्रपटात गाण्याची संधी दिली, “आज दिल हो काबू में तो दिलदार की ऐसी तैसी …,” असे त्या गाण्याचे बोल होते. या गाण्यानंतर त्यांची गाडी सुसाट धावायला सुरुवात झाली. नौशाद अली, ओ. पी. नय्यर, शंकर जयकिशन, एस.डी. बर्मन आणि रोशन,रवी, मदन मोहन,लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी आनंदजीं आदी महान संगीतकारांसोबत रफी यांनी काम केले.
असे सांगितले जाते की, रफी हज यात्रा करून आल्यानंतर त्यांना अनेक मौलवींनी चित्रपटांमध्ये गाणे गाण्यासाठी मज्जाव केला. हज यात्रा करून आल्यानंतर गाणे वाजवणे बंद केले पाहिजे, असे त्यांना सांगण्यात आले. रफी खूप साधे असल्याने ते कोणाच्याही बोलण्यावर पटकन विश्वास ठेवायचे. त्यामुळे रफींनी काही काळ गायनातून संन्यास घेतला होता. त्यावेळी रफी हे यशाच्या सर्वोच्च शिखरावर होते. रफी यांच्या अशा निर्णयामुळे बॉलिवूडमध्ये मोठा भूकंप झाला. रफी आता गाणे गाणार नाही ही कल्पनाच कोणाच्या पचनी पडत नव्हती.
रफींना अनेकांनी हरप्रकारे समजावले मात्र काही काळाने त्यांना स्वतःलाच ही जाणीव झाली की, चित्रपटांमध्ये गाणे हे चुकीचे नाही. मग रफी यांनी पुन्हा गाण्यास सुरुवात केली. त्यानंतर 7 वर्ष त्यांनी चित्रपटात गाणी गायली.
रफी यांना त्यांच्या सुरेल आवाजासाठी 6 वेळा फिल्मफेयर, एक राष्ट्रीय आणि पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 31 जुलै 1980 साली सर्वांच्या हृदयाचा ठाव घेणारा हा आवाज कायमचाच बंद झाला.
रफी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत गाणे गायले. मृत्यूच्या काही तास आधी रफी हे एक गाणे रेकॉर्ड करून आले होते.(birth anniversary of indian singer mohammad rafi)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
पहिलेच गाणे हिट झाल्यानंतर आले होते थेट पंतप्रधानांच्या घरून बोलावणे, वाचा मोहम्मद रफींबद्दलचे रंजक किस्से
लता दीदी अन् मोहम्मद रफींमध्ये असे काय झाले होते की, तब्बल 4 वर्षे गायले नव्हते एकत्र गाणे