सध्याच्या घडीला जेव्हा जेव्हा चित्रपटसृष्टीशी संबंधित क्षेत्रावर किंवा चित्रपटसृष्टीमध्ये कोणतं संकट कोसळलं असेल तर त्यांच्यासाठी एक हक्काची मदत करणारी व्यक्ती बोलीवूडमध्ये बसली आहे. ती व्यक्ती अर्थातच सलमान खान. यापूर्वीदेखील अनेकदा सलमानने अनेकांना मदत केली आहे. आत्ताचच ताज उदाहरण घ्यायचं झालं तर प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझा याला हृदयविकाराचा झटका आला होता. सलमानला ही बाब कळताच तो लगेच रेमोच्या मदतीला धावून आला. रेमोच्या या आजारपणात त्याची आर्थिक बाजू संभाळण्यासाठी सलमानने खूप मदत केली. आणि रेमोदेखील आतापर्यंत त्याचे आभार मानतच आहे. आता याच सलमान खानकडे सर्व चित्रपटप्रदर्शक मदत मागण्यासाठी आले आहेत. नेमकं काय प्रकरण आहे एकदा पाहुयात.
सलमान खान त्या बॉलिवूड कलाकारांपैकी एक आहे ज्यांचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सहजपणे १०० कोटींचा आकडा पार करतो. त्याचा आतापर्यंतचा इतिहास पाहता, देशभरातील अनेक प्रदर्शक संघटनांनी सलमनाला एक पत्र लिहिलं आहे. ईद -२०२१ च्या निमित्ताने सलमानने आपला आगामी ‘राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करावा, असे आवाहन प्रदर्शकांनी केले आहे. प्रदर्शकांचा असा विश्वास आहे की ‘राधे’ प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये खेचून आणू शकेल आणि त्यांना आर्थिक संकटातून मुक्त होण्यास मदत होईल.
प्रदर्शकांनी पत्रात लिहिले की, “तुम्हाला माहिती आहेच की २०२० हा देशातील कोट्यावधी लोकांसाठी तसेच भारतीय चित्रपट प्रदर्शक क्षेत्रातील लोकांसाठी खूप कठीण काळ ठरला आहे. गेल्या दहा महिन्यांत शेकडो सिंगल स्क्रीन / स्वतंत्र चित्रपटगृह कायमची बंद झाली आहेत. यामुळे लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तेथे कर्मचारी होते. चित्रपटगृहांसाठी चित्रपटदेखील तितकेच गरजेचे आहेत, जितके मोटारींसाठी इंधन गरजेचे आहे. प्रेक्षकांना आवडणाऱ्या कंटेंट शिवाय सिंगल स्क्रीन चित्रपटगृह चालणे अशक्य आहे. गेल्या दशकासाठी चित्रपटांनी प्रेक्षकांना सिंगल स्क्रीनकडे आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ”
प्रदर्शकांनी या पत्रात पुढे लिहिलं आहे की, “आपला चित्रपट ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा स्वतंत्र चित्रपटगृह पुनरुज्जीवित करण्यास सक्षम असलेल्या काही चित्रपटांपैकी एक आहे. मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित झालेला असा चित्रपट केवळ अर्थसहाय्य आणि मदत करीत नाही त्याऐवजी असा चित्रपट मालक आणि कर्मचार्यांना भविष्याबद्दल आशेचा किरण देखील दाखवतो. २०२१ च्या ईदच्या दिवशी हा चित्रपट देशभरातील सर्व थिएटरमध्ये रिलीज करण्याचे आम्ही आपणास आवाहन करतो. कारण आम्ही प्रदर्शक आहोत आणि बर्याच आपल्या लक्षावधी चाहत्यांसाठी ज्यांची आम्ही चित्रपटगृहात परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, यापेक्षा चांगली कल्पना काहीही असू शकत नाही.”
सिनेमॅटोग्राफ एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ गुजरात, भारतीय सिने प्रदर्शक संघटना उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड, एचपीसी (प्रदर्शक), महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानची सेंट्रल सर्किट सिने असोसिएशन, बिहार-झारखंड मोशन पिक्चर्स असोसिएशन, राजस्थान मधील चित्रपट प्रदर्शक संघ, ईस्ट इंडिया मोशन पिक्चर्स असोसिएशन ऑफ वेस्ट बंगाल अँड त्रिपुरा, सर्व आसाम सिनेमा हॉल मालक संघटना, छत्तीसगड प्रदर्शक फोरम, तेलंगाना फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स मोशन पिक्चर्स असोसिएशन, दिल्ली-एनसीआर- मराठवाडा चित्रपट सभागृह असोसिएशन, बिहार सिनेमा प्रदर्शक संघ, चित्रपट प्रदर्शक मंच विदर्भ, उत्तरांचल सिनेमा असोसिएशन डेहराडून, चेन्नई सिनेगुल्पीथ थिएटर मालक संघ, ग्रेटर हैदराबाद एक्झाबिटर असोसिएशन, तामिळनाडू थिएटर आणि मल्टिप्लेक्स असोसिएशन इत्यादी देशभरातील संघटनांनी सलमानला देण्यात आलेल्या पत्रावर सह्या केल्या आहेत.










