बॉलिवूडमध्ये सध्या अनेक नवी नाती जुळताना दिसत आहेत. अनेकांनी तर नुकतंच लग्नदेखील केलं तर काही जोडपी या वर्षी लग्न करण्याच्या तयारीत बसली आहेत. काही तर कोव्हीड वरील लस येण्याची वाट पाहत आहेत. ती एकदा आली की ही जोडपी लग्नाच्या तयारीला लागणार आहेत.
याउपर बॉलिवूडमध्ये काही होऊ घातलेली नाती सुद्धा हळू हळू जुळू पाहत आहेत. या जोड्या फिरायला एकत्र जात आहेत परंतु गुपचूप! तिथे गेल्यावरही स्वतंत्र फोटोशूट्स करत आहेत परंतु एकत्र नाही का तर त्यांना कदाचित त्यांचं हे नातं जगजाहीर करायचं नसेल. गेल्या काही लेखांमधून आपण अनन्या – ईशान, कियारा- सिद्धार्थ या जोड्यांबद्दल जाणून घेतलंच आहे परंतु आणखी एका जोडीचं नाव यात जोडावं लागेल ते म्हणजे कतरीना कैफ आणि विकी कौशल!
विकी आणि कतरीना हे गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चा आहेत. आजपर्यंत दोघांनीही कधीही खुलून या गोष्टीवर बोलणं केलेलं नाहीये. परंतु काही दिवसांपूर्वी एक गोष्ट अशी घडली की या दोघांच्याही संभावित नात्याबद्दलच्या बातम्या पुन्हा जोर धरू लागल्या. दोघांच्याही अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. खरं तर कतरीना आणि विकी कौशल हे दोघेही एकत्र नवं वर्ष साजरं करत असल्यावर शिक्कामोर्तब झालं. गेल्या काही दिवसांपासून कतरीना आणि विकी हे आपल्या भावंडांबरोबर नवं वर्ष साजरं करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
अशातच एक दिवस कतरीनाने तिच्या लहान बहिणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमधील आरशात विकी कौशल आणि कतरीनाचं प्रतिबिंब दिसत होतं. काही वेळाने ही बाब तिच्या लक्षात आल्यावर तिने लगेच हा फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलीट मारला. फोटो डिलीट मारला खरा पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही कारण तो फोटो त्या मधल्या वेळेत व्हायरल झाला होता. या घटनेमुळे विकी आणि कतरीनाच्या अफेअरच्या चर्चांना आणखीन बळ मिळालं आहे. असं असलं तरी अजूनही या दोघांनी या घटनेवर भाष्य केलेलं नाही.
विकीला काही काळापूर्वी माध्यमांनी त्याच्या आणि कतरीनाच्या नात्याबद्दल विचारलं असता विकीने यावर बोलण्यासाठी नकार दिला होता. त्याने स्पष्ट शब्दात माध्यमांना स्वतःच्या वैयक्तिक बाबी सार्वजनिक करायला आवडत नसल्याचं सांगितलं होतं. कतरीना देखील यावर काहीही भाष्य करायला तयार नाही. त्यामुळे जोपर्यंत हे दोघेही अधिकृतरित्या काहीही सांगत नाहीत तोपर्यंत या दोघांसदर्भात विविध चर्चांना उधाण येत राहणार हे नक्की!










