Monday, July 1, 2024

आठवण ‘लक्ष्या’ची : सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या लक्ष्याची ‘ही’ संघर्षमय कुटुंबकहाणी एकदा वाचायलाच हवी

लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चाहतावर्ग भलामोठा आहे. त्यांनी केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा सादर केल्या आहेत. आज शरीराने जरी ते आपल्यात नसले, तरीही ते दररोज त्याच्या सिनेमांमधून आपल्याला भेटत असतात, आपल्याला हसवत असतात. आज (२६ ऑक्टोबर) त्यांच्या जन्मदिनी त्याची कुटुंबकहाणी एकदा आपण वाचायलाच हवी.

तुम्हाला हमाल दे धमाल सिनेमा आठवतोय. त्यातलं सुप्रसिद्ध गाणं देखील आठवतच असेल. ‘मी आलो… मी पाहिलं… मी लढलो… मी जिंकून घेतलं सारं’ गाण्याच्या या ओळींप्रमाणेच लक्ष्याचं आयुष्य देखील होतं. (special story and family information of late actor laxmikant berde)

लक्ष्याच्या सिनेसृष्टीतील गोष्टींबाबत आपण आज बोलणार नाही आहोत. जवळ जवळ सगळ्यांनाच ते तोंडपाठ झालं आहे. एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून तर ते प्रसिद्ध होतेच, परंतु आपल्या सर्वांचा लाडका लक्ष्या हा माणूस म्हणून देखील खूप ख्यातनाम होता. म्हणूनच आज आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल आणि सुरुवातीच्या संघर्षाबद्दल जाणून घेणार आहोत.

आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूयात! १९५४ ला मुंबईत लक्ष्याचा जन्म झाला. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा काळ होता, त्यामुळे त्यांचं बालपण कसं गेलं असेल, याचा आपण विचार करूच शकता. जसजसा हा मुलगा मोठा होऊ लागला, त्याला नाटकाची आवड निर्माण झाली. ही आपली हौस ते गणेशोत्सवात होणाऱ्या नाटकांमध्ये भाग घेऊन भागवू लागले.

गिरणगावात जन्मलेल्या लक्षासाठी साहित्य संघ काही दूर नव्हतं. साहित्य संघात हा नाटकवेडा नाटकं पाहायला जाऊ लागला. परंतु रोज रोज नाटकासाठी पैसे येणार कुठून? घराची परिस्थिती हलाखीची… मग आपल्या लक्ष्यानं एक शक्कल लढवली. साहित्य संघात पडदा देण्याची नोकरी मिळवली. जेणेकरून विंगेतून का होईना नाटकं पाहता येतील.

यानंतर अशाच एका नाटकात काम करताना त्यांची ओळख ही अभिनेत्री रुही बेर्डे(पहिली पत्नी) यांच्याशी झाली. रुही त्यावेळी नाटकाचे दौरे महाराष्ट्र भर करत होत्या. सोबतच रूही यांनी बॉलिवूडमध्ये १९७३ सालीच ‘आ गले लग जा’ या सिनेमातून पदार्पण केलं होतं.

सन १९८३साली त्यांनी जॅकी श्रॉफ यांच्यासोबत हिरो या सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतू, लक्ष्याचं मात्र प्रायोगिक नाटकांमधून तसंच व्यावसायिक नाटकांमधून, एकांकिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका करणं सुरूच होतं.

याच काळात रुही आणि लक्ष्याची एक नाटकात ओळख झाली. त्या नाटकाचे बरेचसे दौरे त्यांनी एकत्र केले आणि कधी हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, हे त्यांना देखील कळालं नाही. ते नाटक खूप चाललं. त्यानंतर टूर टूर हे तर तुफान सुरूच होतं. अशात १९८५ साली रुही आणि लक्ष्या यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, सर्वसंमतीने लग्न केलं.

लग्नानंतर लक्ष्मीकांत यांना रुपेरी पडद्यावरचा पहिलाच मोठा ब्रेक हा ‘लेक चालली सासरला’ या सिनेमातुन मिळाला. आणि मग लागोपाठ त्यांचे एकावर एक हिट सिनेमे येऊ लागले.

यानंतर त्यांचे ‘धूमधडाका’, ‘दे दणादण’ सिनेमे हिट गेले. याकाळात त्यांचं नाव हे महाराष्ट्रात पसरू लागलं होतं. त्यांना करियर मध्ये पुढे जाता यावं, यासाठी रुही यांनी स्वतःच्या करियर वर पाणी सोडलं. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असायच्या. मात्र, रुही बेर्डे यांचे १९९८ साली दुःखद निधन झालं आणि लक्ष्या एकटा पडला.

लक्ष्या एक दोस्त म्हणून कायम खरा होता. याची प्रचिती दिग्दर्शक, अभिनेते महेश कोठारे यांना एकदा नव्हे तर दोनदा आली. पहिल्यांदा हे दोघेही एका नाटकाच्या प्रयोगाला भेटले होते. म्हणजे झालं असं, महेश कोठारे यांच्या आई वडिलांचं नाटक होतं ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि त्याच नाटकात लक्ष्मीकांत यांनी एक लहानशी भूमिका साकारत होता.

महेश कोठारे यांनी जेव्हा तो संपूर्ण प्रयोग पाहिला आणि ते लक्ष्मीकांत यांच्या अक्षरशः प्रेमातच पडले. त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते. परंतु खिशात असलेल्या १ रुपया देऊन त्यांनी लक्ष्याला ‘धुमधडाका’ या सिनेमासाठी साइन केलं होतं. यावर त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. या प्रसंगाने हे दोन मित्र जे एकत्र आले ते लक्ष्याच्या जाण्यापर्यंत एकत्रच होते. ती मैत्री अबाधित होती.

दुसरा किस्सा असा की, महेश कोठारे यांच्या एक सिनेमाचं शूटिंग कोल्हापुरात सुरू होतं. एक दिवस अचानक तिथे लाईट्स गेल्या. लाईट्स नाहीत म्हणून सगळे क्रिकेट खेळत होते, परंतु महेश कोठारे मात्र चिंतेत होते. लक्ष्मीकांत यांनी जाऊन त्यांना विचारलं, तेव्हा कळालं की लक्ष्मीकांत यांची दुसऱ्या दिवशी राजश्री सोबत मिटींग होती आणि तिथे ‘मैने प्यार किया’चं शूट सुरू होणार होतं.

त्यांचा ‘मैने प्यार किया’ हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. त्यामुळे आपल्यामुळे त्यांची ही हिंदीतली संधी जाते की काय, असा प्रश्न त्यांना पडला होता. पण अशा वेळी लक्ष्मीकांत यांनी राजश्री प्रोडक्शनमध्ये फोन लावून तारीख पुढे ढकलायला सांगितली आणि महेश कोठारेंना दिलासा दिला, यावेळी आपल्याला दोघांच्याही घट्ट मैत्रीचं दर्शन होतं.

रुही यांच्या निधनांनंतर लक्ष्मीकांत यांनी त्याची सहकलाकार प्रिया अरुण यांच्याशी १९९८ साली दुसरा विवाह केला. लक्ष्मीकांत आणि प्रिया यांचा हा संसार अगदी सुखाचा चालला होता. त्यांना अभिनय आणि स्वानंदी अशी दोन मुलं देखील झाली.

सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक २००४ साली लक्ष्मीकांत यांना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासलं आणि या आजारातून ते काही सावरू शकलेच नाहीत. यातून दिनांक १६ डिसेंबर २००४ साली वयाच्या अवघ्या पन्नाशीत लक्ष्मीकांत आपल्या सगळ्यांना सोडून गेले.

आयुष्यभर लक्ष्मीकांत यांनी महाराष्ट्राला पोट धरून हसवलं, परंतु ते ज्या वेळी गेला त्यावेळी महाराष्ट्राच्या प्रत्येक सिनेप्रेमीच्या डोळ्यांमध्ये अश्रू देऊन गेले. ‘चिमणी पाखरं’ हा सिनेमा लक्ष्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सिनेमा ठरला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये एंट्री, जगाला हसणाऱ्या लक्ष्या मामांनी लग्नानंतर काही दिवसातच घेतला जगाचा निरोप

-‘या’ मराठी चित्रपटांना तोड नाही! लक्ष्याचे ‘हे’ पाच अफलातून चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

-‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील ‘शंतनू’ लक्ष्याआधीच जग सोडून गेला, चित्रपती व्ही शांताराम होते त्याचे आजोबा

हे देखील वाचा