तेलगू चित्रपटसृष्टीचा अक्षय कुमार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रवी तेजा आज त्यांचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. २६ जानेवारी १९६८ ला आंध्रप्रदेशमधील जगमपेट्टा येथे रवी यांचा जन्म झाला.
तेलगू चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार रवी तेजा यांचे पूर्ण नाव रविशंकर राजू भूपतिराजू. रवी हे त्यांच्या ऍक्शन कॉमेडी चित्रपटांसाठी जास्त ओळखले जातात. आजच्या घडीला तेलगू इंडस्ट्रीमधले सर्वात जास्त फी आकारणारे कलाकार म्हणून रवी तेजा प्रसिद्ध आहे.

रवी यांनी १९९० साली आलेल्या कर्तव्यम सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी सहायक भूमिका निभावली होती. मात्र या भूमिकेतून त्यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर काही सिनेमात त्यांनी सहायक भूमिकाच निभावल्या मात्र, १९९९ साली आलेल्या ‘नी कोसम’ चित्रपटातून त्यांनी पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकले. शिवाय त्यांनी काही सिनेमांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले.
‘नी कोसम’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना नंदी पुरस्काराने गौरवण्यात आले. जरी रवी तेजा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जास्त सक्रिय असले तरी त्यांचा अभिनय हिंदी प्रेक्षकांना देखील तितकाच आवडतो.
रवी यांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, आणि पुढे ते साऊथ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार बनले. त्यांचे सिनेमे चित्रपटगृहांमध्ये चालतातच पण टीव्हीवर देखील त्याच्या चित्रपटांना भरपूर पाहिले जाते.

रवी यांनी २०१२ साली फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवले. फोर्ब्सने तयार केलेल्या त्या यादीत १०० असे कलाकार होते, ज्यांचे वार्षिक उत्पन्न १५.५० करोडच्या पुढे असेल. त्या यादीत रवी यांना ५० वे स्थान मिळाले होते.
रवी यांनी ‘ल्यूनेर’ या फुटवेयर कंपनीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात ब्रँड एंबेसडर होते. रवी तेजा यांच्या अभिनयात आणि ऍक्शन सीनमध्ये अक्षय कुमारची झलक स्पष्ट दिसून येते. शिवाय रवी आणि अक्षय यांची स्टाईल देखी बऱ्यापैकी सारखी असल्याने त्यांना तेलगू सिनेमासृष्टीचा अक्षय कुमार म्हटले जाते.

यासर्व गोष्टींसोबतच रवी तेजा यांचे नाव काही विवादांमध्ये देखील अडकले गेले. २०१७ सालच्या एका महिन्यात हार्ड ड्रग्स सेवनाच्या संशयावरून एक्साइज एंड प्रोहिबिशन डिपार्टमेंटने चित्रपट सृष्टीच्या १२ कलाकरांना समन्स जरी केला होता. त्यात रवी तेजा यांचे देखील नाव होते.
रवी यांच्या वैयक्तिक आयुष्यावर नजर टाकली तर त्यांनी २६ मे २००२ साली कल्याणी यांच्यासोबत लग्न केले. त्यांना एक महाधन नावाचा मुलगा तर मोक्षदा नावाची मुलगी आहे.










