Thursday, October 16, 2025
Home मराठी ख्यातनाम नाट्यगायक हरपला! ज्येष्ठ गायक आणि अभिनेते पंडित रामदास कामत यांचे वृध्दापकाळाने निधन

ख्यातनाम नाट्यगायक हरपला! ज्येष्ठ गायक आणि अभिनेते पंडित रामदास कामत यांचे वृध्दापकाळाने निधन

उत्तम गायक आणि नाटकाच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार म्हणून ओळखले जाणारे अभिनेते पंडित रामदास कामत (Pandit Ramdas Kamat) यांचे वयाच्या समस्येमुळे निधन झाले आहे. पंडित रामदास कामत यांनी शनिवारी (८ जानेवारी) रात्री ९.४५ वाजता विलेपार्ले येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या कारकीर्दीत उत्तम गाणी आणि अभिनय करून चाहत्यांची मने जिंकली. ते आज जरी आपल्या सर्वांना सोडून गेले असले, तरी ते कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

पंडित रामदास कामत यांचे वय ९० वर्ष इतके होते. ते गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे मुलगा डॉ. कौस्तुभ कामात त्यांची सून डॉ. संध्या कामत आणि नातू अनिकेत हे सर्वजण आहेत. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील पारसीवाडा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

पंडित रामदास कामत हे मूळचे गोव्याचे असून, त्यांनी लहानपणीपासून वडिल बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले. पंडित रामदास कामत यांनी नाट्यसंगीताचेही शिक्षण घेतले. त्यावेळी त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरच प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या निदर्शनाखाली घेतले होते. त्याचबरोबर त्यांनी यशवंत देवा यांच्याकडून भावगीत देखील शिकले होते.

पंडित रामदास कामत यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर धि गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकाने त्यांच्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरूवात केली होती.

त्यानंतर त्यांनी ‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत मदनाची मंजिरी’, ‘संगीत एकच प्याला’, ‘संगीत मंदारमाला’, ‘संगीत होनाजी बाळा’ अशा अनेक संगीत नाटकांमधून काम केले होते.

पंडित रामदास कामत यांच्या गाण्यांबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी आपल्या आवाजाने रसिकांना अगदी वेड लावले होते. त्यांनी ‘गुंतता ह्रदय हे’, ‘नको विसरू संकेत मीलनाचा’, ‘तम निराशेचा सरला’ सारखी त्यांनी अनेक नाट्यपदे गाजली. त्यांनी गायलेली ‘जन विजन झाले’, ‘अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे’, ‘श्रीरंगा कमला कांता’, ‘पूर्वेच्या देवा तुझे’ अशी अनेक गाणी गायली आहेत. जी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा