स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी (६ फेब्रुवारी) रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. स्वर्गीय सुरेल असणारा आवाज कायमचाच बंद झाला. ‘भारतरत्न’ लताजींच्या निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. अजून कोणीही त्यांच्या निधनाच्या दुःखातून सावरू शकले नाही. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशातील विविध मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत त्यांना श्रद्धांजली वाहिली. फक्त मनोरंजनविश्वच नाही तर राजकीय, सामाजिक सर्वच क्षेत्रातील लोकांनी दीदी गेल्याचे दुःख व्यक्त केले. यात मराठी इंडस्ट्री कशी अपवाद ठरेल. मराठीमधील कलाकारांनी देखील लता मंगेशकर यांना आदरांजली वाहत सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी शेअर केल्या.
दीदींच्या अंत्यसंस्कारासाठी अगदी पंतप्रधान मोदींपासून, मुख्यमंत्री, इतर नेते ते बॉलिवूडमधील कलाकारांपर्यंत सर्वच क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. दीदींचा हिंदीपेक्षा अधिक जवळचा संबंध मराठीसोबत होता. त्यांच्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटांपासूनच झाली होती दीदींचा आणि मराठीचा खूपच जवळचा आणि घरचा संबंध होता. मात्र असे असुनही या अंत्यसंस्कारानंतर सोशल मीडियावर मराठी कलाकार का या अंत्यसंस्कारासाठी हजर नव्हते असे प्रश्न विचारले गेले. या सर्व प्रश्नांना मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या हेमांगी कवीने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून उत्तर दिले आहे.
हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून जाऊ दिले नाही. खूप विनंती केली. मला या गेटवरून त्या गेटवर जा म्हणत राहिले. शेवटी एका पीएसआय साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसा बसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप मी आणि अभिजीत केळकर चार वाजल्यापासून तिथे होतो. शेवटपर्यंत आम्हांला विनंती करूनही दर्शन मिळत नव्हते. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांना ही मागे हटकले जात होते, तिथे माझी काय गत! आम्ही तिथे कुणी सेलिब्रेटी म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो…” पुढे तिने कमेंटमध्ये लिहिले की, “आम्हांला ही सरकारी प्रोटोकॉल्स कळत होते. म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हांला सांगितले वेळ नाहीये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरशः भांडून आम्ही शेवटचे दर्शन घेतले! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आले नसावे.”
हेमांगी नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर तिचे ठाम मत व्यक्त करत असते. फक्त मनोरंजनविश्वच नाही तर इतर क्षेत्रातील गोष्टीवर देखील ती रोखठोक बोलताना दिसते.
हेही वाचा-
शाॅकिंग! प्रसिद्ध गायिकेचा रहस्यमय मृत्यू, घरातच आढळलाय मृतदेह
अभिनेत्यापुर्वी अभियंता होता आत्माराम भिडे; केवळ अभिनयासाठी सोडली मोठ्या पगाराची नोकरी