दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांनी सर्वांनाच चकित केले आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून पुष्पाने आधीच बाजी मारली आहे. सर्वप्रथम तामीळ भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मागणीमुळे अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला देशभर जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला. आता या चित्रपटाची ख्याती सर्वदूर पसरली असून चित्रपटातील एक गाणे चक्क इंग्रजी भाषेतही तयार करण्यात आले आहे.
‘पुष्पा’ चित्रपटाची कथा आणि गाण्याने सर्वांनाच अक्षरशः वेड लावले आहे. या चित्रपटातील प्रत्येक गाणे जोरदार लोकप्रिय ठरत आहे. यामधील श्रीवल्ली गाण्याने तर सर्वांनाच प्रेमात पाडले आहे. गाण्याचे अनेक भाषांतील नवनवीन व्हर्जन सध्या पाहायला मिळत आहेत. या गाण्याच्या मराठी व्हर्जनचे खुद्द या चित्रपटाच्या निर्मात्यांनी कौतुक केले होते. आता याच श्रीवल्ली गाण्याचे इंग्रजी व्हर्जन समोर आले आहे. जे सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
‘श्रीवल्ली’ गाण्याचे इंग्रजी व्हर्जन प्रसिद्ध डच गायिका एमा हीस्टर्सने गायले आहे. एमा ही प्रसिद्ध इंग्रजी गायिका असून ती सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिचे यूट्यूबवर तब्बल 5.1 दशलक्ष चाहते आहेत. तिने यूट्यूबवर पोस्ट केलेल्या ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या इंग्रजी व्हर्जनला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला असून आत्तापर्यंत या व्हिडिओला 13 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे या गाण्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चित्रपटातील प्रत्येक गाणे आणि डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेक परदेशी कलाकार सुद्धा या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत.
तत्पूर्वी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाने ‘बाहुबली’ चित्रपटालासुद्धा कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. या चित्रपटातील प्रत्येक गाण्याने तरुणाईला वेड लावले आहे. चित्रपटातील ‘उ अंटावा’ गाण्यानेसुद्धा जोरदार धुमाकूळ घातला होता. अनेक परदेशी कलाकार आणि खेळाडू सुद्धा या गाण्यावर थिरकताना दिसले आहेत. आता या चित्रपटाची चक्क इंग्रजी गाणी समोर आल्याने चित्रपटाची लोकप्रियता आणखीन वाढली आहे.
हेही वाचा :