Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तुझ्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा…’, सुबोध भावेने झुंडसाठी दिल्या नागराज मंजुळे यांना अनोख्या शुभेच्छा

नागराज मंजुळे मराठी चित्रपटसृष्टीला नेहमीच अशक्य वाटणारे चित्रपटांच्या कमाईचे १०० कोटी रुपयांचे स्वप्न सत्यात उतरवणारे अतिशय विलक्षण आणि अवलिया दिग्दर्शक. एकाच साच्यात राहून विचार करणाऱ्या मराठी सिनेसृष्टीला प्रवाहापलिकडे जाऊन विचार करायला लावणाऱ्या नागराज मंजुळे यांनी नेहमीच त्यांच्या चित्रपटांमधून त्यांच्यातल्या उत्तम दिग्दर्शकाचे आणि हटके विचारांचे दर्शन लोकांना घडवले. अगदी फॅन्ड्रीपासून ते सैराट, नाळपर्यंत सर्वच चित्रपटांमधून त्यांनी त्यांचे नावीन्य राखले. नागराज यांच्या पहिल्याच फॅन्ड्री सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि नागराज मंजुळे हे नाव प्रकाशझोतात आले. सैराट सिनेमांनंतर तर नागराज यांचे नाव संपूर्ण देशात किंबहुना जगात ओळखले जाऊ लागले. आता तर ‘झुंड’ सिनेमाच्या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी मोठी उडी घेत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

नागराज मंजुळे यांना त्यांच्या या नव्या पदार्पणासाठी आणि नव्या सुरुवातीला त्यांच्या मराठीमधील मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार, दिग्दर्शक मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मराठीमधील आघाडीचा आणि प्रतिभासंपन्न असा अभिनेता असलेल्या सुबोध भावेने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नागराज यांना त्यांच्या या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोधने त्याच्या पोस्टमध्ये चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले, “‘नागराज तुझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा उद्या तू गाठतोयस,आमच्या पिढीचा तू एक महत्त्वाचा दिग्दर्शक आहेस आणि तुझ्या प्रत्येक चित्रपटाची उत्सुकता नेहमीच असते. ४ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या “झुंड” या तुझ्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा.”

मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या व्यक्तीचे स्वप्न असते की, आयुष्यात एकदा तरी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायचे. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या पहिल्याच हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या या ‘झुंड’ सिनेमाची वाट सर्वच लोकं मागील अनेक महिन्यांपासून बघत होते. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे सतत सिनेमाचे प्रदर्शन लांबत होते. या सिनेमाचा ट्रेलरच इतकाच पावरफुल होता की त्यावरूनच हा सिनेमा जबरदस्त असणारा याचा अंदाज सर्वांना आला.

या सिनेमाचे कौतुक तर बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील गाजलेले कलाकार देखील करताना थकत नाही. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने सिनेमा पाहिल्यावर म्हटले की, “चित्रपटात आपल्या देशातल्या तरुणांची सळसळती, जादुई, चमकदार, तेजस्वी ऊर्जा सुंदरपणे टिपलेली आहे. बच्चन साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत उत्तम चित्रपट केले आहेत; पण हा त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. हॅट्स ऑफ टू नागराज, हा चित्रपट शेवटी त्याचा आहे! इतका सुंदर चित्रपट केल्याबद्दल मी नागराज, भूषण, मिस्टर बच्चन, द झुंड आणि संपूर्ण टीमचे आभार मानतो. जेव्हा मी ‘झुंड’सारखे चित्रपट पाहतो, तेव्हा मला मी भारतीय चित्रपट उद्योगजगताचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो.”

तर दाक्षिण्यात सुपरस्टार असणाऱ्या धनुषने सांगितले की, “कुठून सुरुवात करू ते समजत नाही. अप्रतिम चित्रपट बनवला आहे. नागराज मंजुळे यांचा आवाज चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजेच, दुर्लक्ष करता येणार नाही असं त्याचं काम आहे.” दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा