Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या अलका याज्ञीक यांचा मोठा चाहता होता ओसामा बिन लादेन

डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या अलका याज्ञीक यांचा मोठा चाहता होता ओसामा बिन लादेन

बॉलिवूडमधील गाण्यांना आपल्या सुमधुर आवाजाने एका उंचीवर नेणाऱ्या गायिका म्हणजेच ‘अलका याज्ञिक.’ अलका यांनी जवळपास ४ दशकं आपल्या आवाजाने बॉलिवूडमध्ये राज्य केले. जवळपास सर्वच अभिनेत्रींसाठी गाणी गाणाऱ्या अलका यांनी त्यांच्या सुरेल आवाजाने संपूर्ण जगात ओळख मिळवली. अतिशय गोड, निरागस आणि सुरेल आवाज असणाऱ्या अलका यांनी हिंदीसोबतच इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली. अलका यांनी जेव्हा गाणी गायला सुरुवात केली, तेव्हा इंडस्ट्रीमध्ये लता मंगेशकर, आशा भोसले या दोन मोठ्या नावांनी सर्वांनाच त्यांच्या आवाजाची मोहिनी घातली होती. मात्र, तरीही अलका यांनी त्यांची एक वेगळी आणि अढळ ओळख तयार केली. प्रत्येक मोठ्या संगीतकार गीतकारासोबत काम केलेल्या अलका आज त्यांचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांचा सुरेल प्रवास.

‘अलका याज्ञिक’ यांचा जन्म २० मार्च १९६६ ला कोलकातामध्ये एका गुजराती कुटुंबात झाला. अलका यांच्या आई गायिका होत्या. त्यांच्या आईकडूनच त्यांना गाण्याचा वारसा मिळाला, वयाच्या सहाव्या वर्षांपासून अलका यांनी कोलकात्याच्या आकाशवाणीवर गायनाला सुरुवात केली. वयाच्या १० व्या वर्षी त्यांची आई त्यांना बालगायिका होण्यासाठी मुंबईला घेऊन आल्या. मात्र, अलका यांचा आवाज परिपक्व होईपर्यँत थांबण्याचा सल्ला त्यांना अनेकांनी दिला.

अलका यांच्यासाठी त्यांच्या आईने लिहिले राजकपूर यांना पत्र
पण अलका यांच्या आईंनी तरीही प्रयत्न सोडले नाही. त्यांनी राजकपूर यांना पत्र लिहून अलका यांच्याबद्दल सर्व सांगितले. राजकपूर त्यांच्या पत्राने आणि त्यांच्या कौशल्याने प्रभावित झाले. त्यांनी अलका यांना प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत यांना भेटायला सांगितले. लक्ष्मीकांत यांची भेट झाल्यावर त्यांनी अलका यांना दोन पर्याय दिले. एक डबिंग आर्टिस्ट होण्याचा आणि एक गायिका होण्याचा. अलका यांच्या आईंनी दुसरा पर्याय निवडला. मात्र, वयाच्या १४ वर्षापर्यंत अलका यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केले.

या गाण्यासाठी मिळाला पहिला फिल्मफेअर पुरस्कार
त्यानंतर १४ व्या वर्षी अलका यांनी ‘पायल की झंकार’ या सिनेमातील ‘थिरकत अंग लचक झुकी’ हे गाणे पहिल्यांदा गायले. त्यानंतर त्यांनी १९८१ साली आलेला चित्रपट ‘लावारिस’ मधील ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणे गायले आणि अलका यांच्या करियरला एक वळण मिळाले. मात्र, अलका यांना खरी ओळख मिळाली ती १९८८ साली आलेल्या ‘तेजाब’ सिनेमातील ‘एक, दोन, तीन’ या गाण्याने. या गाण्याने त्यांना एका रात्रीत स्टार केले. या गाण्यासाठी त्यांना त्यांचा पहिला फिल्मफेअर लोकप्रिय गायिका हा पुरस्कार देखील मिळाला. मग अलका यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

हिंदीसोबतच २० भाषांमध्ये गायली हजारो गाणी
अलका यांनी करियरमध्ये हिंदीसोबतच आसामी, गुजराती, मल्याळम, मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगु, कन्नड, पंजाबी अशा जवळपास २० भाषांमध्ये हजारो गाणी गायली. त्यांना त्यांच्या गाण्यांसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यात फिल्मफेअर, राष्ट्रीय पुरस्कारांसोबतच अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. विशेषबाब म्हणजे अलका यांना ३६ वेळा फिल्मफेअर पुरस्करांसाठी नामांकन मिळाले आहे.

ओसामा बिन लादेनही होता चाहता
अलका यांचे जगभरात करोडो चाहते आहेत. मात्र, त्यांच्या एका चाहत्यांबद्दल जास्त कोणाला माहित नसेल. हा चाहता म्हणजे, जगातला सर्वात मोठा आतंकवादी ओसामा बिन लादेन. आश्चर्य वाटले ना? हो ओसामा बिन लादेनही अल्काजींच्या आवाजाचा आणि गाण्यांचा कायल होता. ज्यावेळी अमेरिकी सैन्याने ओसामाला त्याच्या पाकिस्तानमधील घरात घुसून मारले, तेव्हा त्याच्या घराची झाडाझडती घेतल्यावर अमेरिकी सैन्याला त्याच्या घरात अलका यांच्या गाण्यांच्या भरपूर कॅसेट्स मिळाल्या होत्या.

आमिर खानला काढले होते घराबाहेर
अलका यांच्या बाबतीत अजून एक किस्सा खूपच प्रसिद्ध आहे आणि तो म्हणजे त्यांनी चक्क आमिर खानला खोलीबाहेर काढले होते. अलका यांनी स्वतः त्यांच्या या प्रसंगाबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “मी कयामत से कयामत तक या सिनेमातील ‘गजब का है दिन’ या गाण्याचे रेकॉर्डिंग करत होते. त्यावेळी मी खूपच नर्व्हस होते. शिवाय रेकॉर्डिंग रूममध्ये अनेक जण बसले होते. त्या रूममध्ये एक हँडसम आणि स्मार्ट मुलगा सुद्धा बसला होता. कधीतर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि माझा गाण्याचा सराव करत राहिले. पण गाणे रेकॉर्ड करण्याची वेळ आली, तेव्हा मला जाणवले की कोणीतरी माझ्याकडे सारखे बघत आहे. तेव्हा तो स्मार्ट मुलगा माझ्याकडे बघत होता, पण त्याच्या बघण्यामुळे मी जास्तच अवघडली जात होती. त्यामुळे काही वेळाने मी त्याला त्या रूम बाहेर जायला सांगितले. तो सुद्धा काहीही न बोलता तिथून निघून गेला.”

पुढे त्या म्हणाल्या, “गाण्याचे रेकॉर्डिंग छान झाल्यानंतर मी सुटकेचा निश्वास सोडला, तेव्हा या चित्रपटाचे दिग्दर्शक मन्सूर खान यांनी मला या सिनेमातील अभिनेत्याशी माझी ओळख करून दिली. त्यावेळी मला समजले की, मी ज्याला बाहेर काढले तोच या चित्रपटाचा मुख्य नायक आहे. त्यानंतर आजपर्यंत आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा आमिर मला त्या गोष्टीची आठवण करून देतो आणि आम्ही दोघेही त्यावर जोरजोरात हसतो.”

अलका यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी १९८९ साली, शिलाँगचे उद्योगपती नीरज कपूर यांच्याशी लग्न केले. मात्र, लग्नानंतरही अलका आणि नीरज हे २७ वर्ष एकमेकांपासून लांब राहिले. कारण, अलका यांचे पती नीरज कपूर हे शिलाँगला एक व्यवसाय करतात. त्यांचा सगळा व्यवसाय तिथेच होता. अलका यांना त्यांच्या कामासाठी मुंबईत राहावे लागायचे. अलकासाठी मुंबईत येऊन नीरज कपूर यांनी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही. शेवटी अलका यांच्याच सांगण्यावरून ते परत शिलाँगला गेले आणि तिथंच व्यवसाय केला. अधूनमधून ते मुंबईत यायचे. अशा पद्धतीनं त्यांना २७ वर्षे एकमेकांसोबत लग्न होऊनही लाँग डिस्टन्स रिलेशिनशिपमध्ये राहावे लागले. अलका आणि नीरज यांना सायेशा नावाची एक मुलगी देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा