Wednesday, March 12, 2025
Home अन्य पत्नीचे दागिणे गहाण ठेवून दादासाहेबांनी बनवला होता पहिला चित्रपट, पुढे जाऊन बनले ‘फादर ऑफ इंडियन सिनेमा’

पत्नीचे दागिणे गहाण ठेवून दादासाहेबांनी बनवला होता पहिला चित्रपट, पुढे जाऊन बनले ‘फादर ऑफ इंडियन सिनेमा’

सन 1910 मध्ये मुंबईत ‘द लाइफ ऑफ क्राइस्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या दरम्यान, चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांमधील एक व्यक्ती असा होता, ज्याला आपल्या जीवनाचे ध्येय मिळाले होते आणि त्याने स्वतः चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. ही व्यक्ती इतर कोणी नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) होते. त्यांचे खरे नाव धुंडिराज गोविंद फाळके आहे. दादासाहेब फाळके यांची आज १५२ वी जयंती आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल, 1870 रोजी झाला होता. ते केवळ दिग्दर्शकच नव्हते, तर एक सुप्रसिद्ध निर्माते आणि स्क्रीन लेखक देखील होते. 19 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी 95 चित्रपट आणि 27 लघु चित्रपट केले.

लहानपणापासूनच दादासाहेबांना कलेची आवड होती आणि या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याची त्यांना इच्छा होती. यासाठी सन 1885 मध्ये, जेजे कॉलेज ऑफ आर्टमध्ये ते सामील झाले. बडोद्याच्या प्रसिद्ध कलाभवन येथेही त्यांनी कला शिक्षण घेतले. यानंतर त्यांना नाटक कंपनीत चित्रकार म्हणून काम मिळाले. 1903 मध्ये त्यांनी पुरातत्व विभागात छायाचित्रकार म्हणून काम करण्यासही सुरुवात केली. (birth anniversary interesting facts about father of indian cinema dadasaheb phalke)

पण हळूहळू दादासाहेबांना फोटोग्राफीचा कंटाळा येऊ लागला आणि त्यांनी चित्रपटसृष्टीत आपली कारकीर्द बनवण्याचा निर्णय घेतला. स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मित्राकडून काही पैसे घेऊन, 1912 मध्ये लंडनला गेले. ते लंडनमध्ये जवळपास दोन आठवडे चित्रपटाच्या निर्मितीबद्दल शिकले आणि त्याच्याशी संबंधित उपकरणे खरेदी करून मुंबईला परतले. मुंबईत आल्यानंतर दादासाहेबांनी ‘फाळके फिल्म कंपनी’ सुरू केली आणि याच बॅनरखाली ‘राजा हरिश्चंद्र’ नावाचा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांना जवळजवळ सहा महिने लागले होते.

चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दादासाहेब फाळके यांच्या पत्नीने त्यांना खूप सहकार्य केले. त्या चित्रपटात काम करणाऱ्या जवळपास 500 लोकांसाठी स्वयंपाक बनवत असत. चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 15,000 रुपये लागले होते, जी त्या काळात मोठी रक्कम असायची. यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिणेही गहाण ठेवले होते. याशिवाय स्वत: ची संपत्तीही गहाण ठेवली आणि कर्जही घेतले होते. शेवटी 3 मे, 1913 रोजी, मुंबई येथील कोरनेशन चित्रपटगृहात पहिल्यांदा या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. 40 मिनिटांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि तो सुपरहिट ठरला.

‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटाच्या अफाट यशानंतर दादासाहेब यांनी ‘मोहिनी भस्मासुर’ या चित्रपटाची निर्मिती केली. सिनेमा जगाच्या इतिहासात हा चित्रपट खूप महत्वाचा आहे, कारण दुर्गा गोखले आणि कमला गोखले या दोन स्त्रियांनी यात काम करून, पहिल्या महिला अभिनेत्री होण्याचा मान मिळवला होता. यानंतर ते थांबले नाहीत आणि एकामागून एक सुपरहिट चित्रपट बनवू लागले. दादासाहेबांचा शेवटचा मूकपट ‘सेतुबंधन’ होता. 16 फेब्रुवारी, 1944 रोजी दादासाहेबांनी या जगाला निरोप दिला. दादासाहेबांना पुढे ‘फादर ऑफ इंडियन सिनेमा’ म्हणजेच ‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

भारतीय चित्रपटसृष्टीत दादासाहेबांच्या ऐतिहासिक योगदानामुळे, त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 1969 मध्ये ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराची स्थापना केली. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय सिनेमाचा सर्वोच्च आणि प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. विशेष म्हणजे, देविका राणी चौधरी या पुरस्काराच्या प्रथम प्राप्तकर्ता होत्या. गेल्या वर्षी हा पुरस्कार अभिनेते अमिताभ बच्चन यांना देण्यात आला होता. यावर्षी हा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात आला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा