Sunday, February 23, 2025
Home मराठी फर्माइश! स्पृहा जोशीने ऐकवली वडील आणि मुलीच्या प्रेमळ नात्यावर भाष्य करणारी ‘माझी कन्या’ ही करून कविता

फर्माइश! स्पृहा जोशीने ऐकवली वडील आणि मुलीच्या प्रेमळ नात्यावर भाष्य करणारी ‘माझी कन्या’ ही करून कविता

पुन्हा एकदा स्पृहा जोशी घेऊन आली तिचा नवीन एक विडिओ. आता सर्वांनाच माहित आहे की, स्पृहा मधल्या काही काळापासून तिच्या यूट्यूब चॅनेलवर सक्रिय झाली आहे. सतत ती तिचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून फॅनच्या संपर्कात राहत असते. या चॅनेलच्या माध्यमातून स्पृहा तिच्या चाहत्यांच्या कवितेसंदर्भातल्या फर्माईशी पूर्ण करते. त्यांना तिच्या गोड आवाजात कविता ऐकवत असते. स्पृहाने पुन्हा एकदा तिचा एक फर्माइशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने प्रेक्षकांच्या फर्माइशींची ‘माझी कन्या’ ही अतिशय आशयसंपन्न कविता सर्वांना ऐकवली. कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते) यांची ही कविता वडील आणि मुलीच्या प्रेमळ नात्यावर भाष्य करते.

‘माझी कन्या’ ही एक करुण कविता आहे. एका बाबांची आणि त्यांच्या लाडक्या लेकीची कविता असणाऱ्या या कवितेत बाबा मुलीची समजूत घालताना दिसतात. बेताची परिस्थिती असणाऱ्या अतिशय लहान आईविना असलेल्या मुलीला वेगवेगळ्या उपमा देत समजून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात. लहान मुलगी असलेल्या या मुलीची समजून कशी घालावी हा नक्कीच त्या बाबांना पडलेला प्रश्न कवितेतून जाणवतो. ही कविता खूपच मोठी असल्याने स्पृहाने कवितेचे एडिटेड व्हर्जन सर्वाना ऐकवले.

गाइ पाण्यावर काय म्हणुनि आल्या?
कां ग गंगायमुनाहि या मिळाल्या?
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला
कोण माझ्या बोललें गोरटीला?

उष्ण वारे वाहती नासिकांत,
गुलाबाला सुकविती काश्मिरांत,
नंदनांतिल हलविती वल्लरींला,
कोण माझ्या बोललें छबेलीला?

शुभ्र नक्षत्रें चंद्र चांदण्यांची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे! भूईवर पडे गडबडून,
कां ग आला उत्पात हा घडून?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलकी छिटें लेती.

तुला लंकेच्या पार्वती समान
पाहुनीयां, होवोनि साभिमान
काय त्यांतिल बोलली एक कोण
‘अहा! – आली ही पहा- भिकारीण!’

मुली असती शाळेंतल्या चटोर;
एकमेकींला बोलती कठोर;
काय बाई! चित्तांत धरायाचे
शहाण्यानें ते शब्द वेडप्यांचे?

रत्न सोनें मातींत जन्म घेतें,
राजराजेश्वर निज शिरीं धरी तें;
कमळ होतें पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायातें.

पंकसंपर्कें कमळ का भिकारी?
धूलिसंसर्गें रत्न का भिकारी?
सूत्रसंगें सुमहार का भिकारी?
कशी तूंही मग मजमुळें भिकारी!

बालसरिता विधु वल्लरी समान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारि-रत्नें नरवीर असमान्य
याच येती उदयास मुलातूंन.

भेट गंगायमुनांस होय जेथें
सरस्वतिही असणार सहज तेथें;
रूपसद्गुणसंगमी तुझ्या तैसें,
भाग्य निश्चित असणार तें अपैसें.

नेत्रगोलांतुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखीं करती;
पाच माणिक आणखीं हिरा मोतीं
गडे! नेत्रां तव लव न तुळों येती.

लाट उसळोनी जळी खळें व्हावें,
त्यांत चंद्राचे चांदणे पडावें ;
तसे गालीं हासतां तुझ्या व्हावें,
उचंबळुनी लावण्य वर वहावे!

गौर कृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोंवळ्या सम वयाच्या
सवें घेऊनि तनुवरी अद्भुताचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा!

काय येथें भूषणें भूषवावें,
विशिध वसनें वा अधिक शोभवावें?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थलीं कृत्रिमाची!

खरें सारें! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टिश्रृंगारें नित्य नटायाची.

त्याच हौसेंतुन जगद्रूप लेणें
प्राप्त झालें जीवास थोर पुण्यें;
विश्वभूषण सौंदर्य-लालसा ही
असे मूळांतचि, आज नवी नाहीं!

नारि मायेचें रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तूं!

तपःसिद्धीचा समय तपस्व्याचा,
भोग भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा स्वर्ग की कुणाचा
मुकुट किर्तीचा कुण्या गुणिजनाचा

यशःश्री वा ही कुणा महात्म्याची
धार कोण्या रणधीर कट्यारीची;
दिवसमासें घडवीतसे विधाता
तुला पाहुनि वाटतें असें चित्ता!

तुला घेइन पोलकें मखमलीचें,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचें,
हौस बाई! पुरवीन तुझी सारो
परी आवरि हा प्रलय महाभारी!

ढगें मळकट झांकोनि चंद्रिकेला,
तिच्या केलें उद्विग्न चांदण्याला;
हास्यलहरींनी फोडुनी कपाट
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट!

प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे
कोड किंचित् पुरवितां न ये त्यांचे;
तदा बापाचें हृदय कसें होतें,
नये वदतां, अनुभवी जाणतीं तें!

माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा!
प्राप्त होतां परि हे असे प्रसंग
हृदय होतें हदरोनिया दुभंग!

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनि आम्हांस करंट्यांना?
लांब त्यांच्या गावास जाउनीया
गूढ घेतों हें त्यांस पुसोनीयां!

” गांवि जातों” ऐकतां त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली!
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे “येतें मी” पोर अज्ञ वाचा!
– कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा