बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता अमीर खान याच्या दुसऱ्या लग्नाची ऍनिव्हर्सरी सोमवारी २८ डिसेंबरला आहे. होय! आमिर खान याची दोन लग्न झाली आहेत. सध्या तो त्याची ऍनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह जुनागढ येथे गेला आहे. त्याच्या दुसऱ्या लग्नाची कथा खूपच रंजक आहे. चला तर मग पाहुयात!
आपल्याकडे लगान पाहिला नाही अशी कोणतीही व्यक्ती सापडणार नाही. लगान या सिनेमाचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. आजही आपण जेव्हा केव्हा लगान पाहतो तेव्हा त्याच उत्साहाने पाहतो. एकंदरीत लगान हा सिनेमा जितक्या आपल्या लक्षात राहतो तितकाच त्या चित्रपटात काम केलेला आमिर देखील. कारण याच सिनेमापासून त्याच्या आयुष्यातील एक नव्या पर्वाला सुरुवात झाली होती. या सिनेमाच्या निमित्ताने आमीरचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू झालं होतं. त्याची पहिली पत्नी रीना दत्ता हे प्रोडक्शनचं काम पाहत होती. परंतु या दोघांचं वैयक्तिक आयुष्य मात्र पूर्वीसारखं सुरळीत सुरू नव्हतं. आणि नेमक्या याच नाजूक समयी आमिरच्या आयुष्यात एका तरुणीची एन्ट्री झाली, जिची त्याला सोबत झाली. त्या तरुणीचं नाव होतं किरण राव!
आजच्या घडीला किरण राव बॉलिवूडमधील पटकथा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. तिचा जन्म तेलंगणात झाला. लगान या चित्रपटात किरणने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना सहाय्य केले. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हा किरण रावचा पहिलाच चित्रपट होता. लगान चित्रपटात मुख्य भूमिका आमिर खान साकारत होता. लगानच्या चित्रीकरणादरम्यान आमिरची पहिली पत्नी रीना आणि त्याच्या नात्यात अंतर वाढत चाललं होतं. आमिरच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच उलथापालथ होत होती. याच दरम्यान, त्याला किरण रावचा आधार मिळाला. चित्रपटाच्या सेटवर आमीरने किरणकडून तिच्या कानातली बाळी मागितली होती आणि तिने ती दिली देखील होती तेव्हापासून या दोघांच्याही प्रेमकथेला सुरूवात झाली होती.
पुढे काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्येच आमिरने रिनाला घटस्फोट दिला होता. २८ डिसेंबर २००५ ला आमिर खान आणि किरण राव हे विवाहबंधनात अडकले. आजही हे दोघे सुखी सांसारिक आयुष्य जगत आहेत. आमिर खान याला तीन अपत्ये आहेत. इरा आणि जुनैद हे रीना दत्ता हिच्यापासून झाले आहेत. तर आमिर आणि किरण राव यांना आझाद हा मुलगा आहे. किरणचे रीना दत्ताशी चांगले संबंध आहेत. या दोघींनाही बर्याच वेळा इव्हेंटमध्ये एकत्र पाहिलं गेलं आहे. इतकच नाही तर आमिर-रीनाची मुलगी इरासोबतही किरणचे चांगले संबंध आहेत.
किरण रीना दत्ताबद्दल सांगते की ती चित्रपटाच्या सेटवर येते. ती देखील तिची काही मतं चित्रपटाबद्दल देत असते आणि आम्ही सुद्धा तिच्या मतांचा आदर करत चित्रपटात तसे बदल करत असतो. फार कमी लोकांना ठाऊक आहे की किरण राव ही अभिनेत्री आदिती राव हैदरीची चुलत बहीण आहे.
काय मग कशी वाटली आमिर खान आणि किरण राव यांनी लव्ह स्टोरी? या दोघांनाही लग्नाच्या १५व्या वाढदिवसाच्या दैनिक बोंबाबोंबतर्फे हार्दिक शुभेच्छा!