Friday, April 19, 2024

16 वर्ष व्यक्तिरेखा जगल्यानंतर जेव्हा अमोल कोल्हे यांना सांगितले गेले की तुमचा आवाज…

अमोल कोल्हे, अभिनेते किंवा राजकारणी नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे अशी एक ओळख पटकन डोक्यात येते. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून अक्षरशः जगली आहे. महाराज आणि अमोल कोल्हे हे जणू एक समीकरणच झाल्यासारखे वाटते. एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच ते एक हुशार राजकारणी देखील आहे. त्यांनी नेहमीच त्याच्या कामातून आणि अभिनयातून प्रेक्षकांना उत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे.

अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर देखील कमालीचे सक्रिय आहेत. ते सतत त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल विविध अपडेट लोकांना देत असतात. यासोबतच अमोल ते अन्मोल या यूट्यूब चॅनेलवर ते त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंग अनुभव फॅन्ससोबत शेअर करताना दिसतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ या चॅनेलवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये जेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी तुमचा आवाज योग्य नाही असे सांगण्यात आले होते, त्याबद्दल सांगितले आहे.

अमोल कोल्हे यांनी त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “मला २००७ मध्ये राजा शिवछत्रपती या मालिकेपासून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचे भाग्य लाभले. त्यानंतर मला अनेकदा नाटक, महानाट्य, चित्रपट किंवा मालिका या माध्यमातून ही भूमिका साकारण्याचे भाग्य लाभत गेले. मात्र काही दिवसांपूर्वी मला एक फोन आला. दुर्गदुर्गेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली राजधानी किल्ले रायगड जो प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान आहे आणि त्याचा अभिमानही आहे. त्या किल्ले रायगडावर एक लाईट अँड साऊंड शो होणार होता. त्या शो मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी त्यांना माझा आवाज आवाज वापरायचा होता. त्यांनी मला हे शक्य आहे का? असे विचारले.

मी कोणतेही काम हे शिवरायांचे काम असते असेच समजून करतो. त्यामुळे वेळेचे बंधन किंवा मानधनाची अट अशा कोणत्याही अडचणी त्यात येत नाही. मी त्यांना लगेचच कोणती तारीख हवी असे विचारले. सोबतच मानधनाच्या बाबतीत ते मला पाकिटात जे काही देतील ते मला मान्य असल्याचे देखील मी त्यांना सांगितले. मी या शोसाठी खूप उत्सुक होतो. एका लाईट अँड साऊंड शो मध्ये माझा आवाज लागणार ही बाब कोणत्याही शिवभक्तासाठी ही भाग्याचीच.

मात्र त्यांनी मला दोन दिवसांनी फोन केला आणि सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी तुमचा आवाज योग्य वाटत नाही. मुळात नाकारणे अजिबातच चुकीचे नाही.मात्र मागील १६ वर्ष मी एखादी व्यक्तिरेखा करतोय आणि अचानक मला समजते की त्या व्यक्तिरेखेसाठी माझा आवाज योग्य नाही. तेव्हा मला निराश नाही तर आश्चर्य वाटले. मात्र पुढच्याच क्षणी मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. कदाचित कुठेतरी हा सरकारी साक्षात्कार आहे का?”

अमोल कोल्हे यांचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत असून, त्यावर आता नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान अभिनयासोबतच राजकारणात सक्रिय असणाऱ्या अमोल यांनी ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत महाराजांची भूमिका साकारली आणि ते तुफान प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले. पुढे त्यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका केली होती.

 

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक

ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…

हे देखील वाचा