‘हिरो नंबर वन’, ‘पार्टनर’, ‘कुली नंबर वन’, ‘जोडी नंबर वन’, ‘शोला और शबनम’, अशा चित्रपटांची नावं घेतली की, समोर दिसतो तो गोविंदा. आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने आपली ओळख बनवलेल्या गोविंदाने अभिनयाचे कौशल्य तर सर्वांना दाखवलेच, पण त्याच्या वाट्याला सर्वाधिक कौतुक आलं ते त्याच्या डान्स स्टाईलमुळे. त्याने रोमँटिक, ऍक्शन, कॉमेडी अशा सगळ्याच प्रकारात आपली छाप पाडली. म्हणूनच तो बॉलिवूडचा हिरो नंबर वन बनला. गोविंदासाठी फिल्मी करियर तसं नवीन नव्हतंच कधी, पण तरी त्याच्या कुटुंबातील तो अभिनय क्षेत्रात सर्वाधिक यशस्वी झालेला व्यक्ती. असे असले तरी गोविंदाच्या कुटुंबातील तीन पिढ्या मनोरंजन क्षेत्राशी निगडीत आहेत बरं का. आता ते कसं तेच जाणून घेऊ.
गोविंदाचं पूर्ण नाव गोविंदा अरुण अहुजा (Govinda Arun Ahuja). अरुण अहुजा हे लाहोरमध्ये असताना दिग्दर्शक मेहबूब खान यांनी त्यांच्यातील टॅलेंट ओळखले आणि त्यांना अभिनय क्षेत्रात आणलं. खरं तर अरुण अहूजा यांचं नाव होतं गुलशन सिंग अहूजा, पण त्यांना अरुण अहुजा म्हणूनच ओळखलं जातं. त्यांनी 40आणि 50 च्या दशकात जवळपास 30च्या आसपास चित्रपटांत काम केलेलं आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही होते. त्यांनी ‘औरत’ या चित्रपटातही काम केलं. हा औरत चित्रपट फारसा चालला नसला तरी, त्याचा रिमेक आलेल्या ‘मदर इंडिया’ने मात्र भारतीय चित्रपट इतिहासात मानाचे स्थान मिळवले. अरुण यांनी सवेरा या चित्रपटात काम केलेल्या निर्माला देवी यांच्यासह लग्न केले. निर्मला देवी या देखील अभिनेत्री आणि गायिका होत्या. पुढे त्यांना तीन मुली आणि दोन मुल अशी एकूण 5 मुलं झाली. यातील गोविंदा सर्वात लहान. अरुण यांनी पुढे प्रोड्यूसर होण्याचा निर्णय घेतला, पण त्यात त्यांना अपयश आलं आणि त्यांना विरारमध्ये येऊन राहायला लागलं. मात्र, निर्मला देवी यांनी त्यांच्या कामाने कुटुंबाचे पालनपोषण होईल याची काळजी घेतली. अरुण आलेल्या अपयशाने खचले होते.
पुढे अरुण आणि निर्मला देवी यांचा मुलगा गोविंदाने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी निर्मला देवी यांना वाटायचे की, गोविंदानेही नोकरीच करावी, पण गोविंदाने अभिनय क्षेत्रातच आपले हात आजमवले. गोविंदाचा मोठा भाऊ किर्ती कुमार यांनीही काही चित्रपटात काम केले, पण त्यांना फार यश मिळाले नाही. पुढे त्यांनी दिग्दर्शन आणि गायनही केले. त्याचवेळी गोविंदाने मात्र आपल्या अभिनयाची छाप पाडण्यास सुरूवात केली होती. त्याचे 80-90 च्या दशकातील चित्रपटांनी धुमाकूळ घातला. इतकंच नाही 200 नंतर केलेले चित्रपटही त्याने गाजवले. त्याचमुळे तो एक मोठा अभिनेता म्हणून ओळखला जातो. जवळपास 160 हून अधिक चित्रपटात काम केलेल्या गोविंदाला अनेक पुरस्कारही मिळाले. केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर एक चांगला विनोदी अभिनेता म्हणूनही त्याचा गौरव अनेकदा करण्यात आला. त्याने काही रिऍलिटी शोमध्ये जजचेही काम केले.
View this post on Instagram
गोविंदाने सुनिता अहुजाबरोबर 1987 साली लग्न केले होते. त्यांना दोन मुलं आहेत. मुलीचं नाव टीना अहुजा असून मुलाचं नाव यशवर्धन अहुजा आहे. टीनाने सेकंड हँड हसबंड या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलेलं आहे.
याशिवाय गोविंदाचे अन्य नातेवाईकही मनोरंजन क्षेत्राशी जोडलेले आहेत. गोविंदाला तीन बहिणी असून तिघीही कोणत्या ना कोणत्या माध्यमांतून मनोरंजन क्षेत्राशी जोडलेल्या आहेत. त्याची बहीण कामिनी खन्ना या लेखक, गायिका आणि संगीत दिग्दर्शक आहे. तसेच, त्यांना रागिनी खन्ना आणि अमित खन्ना ही मुलं असून हे दोघेही मनोरंजन क्षेत्रात आहेत. रागिनीने बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे, तर गोविंदाची दुसरी बहीण पुष्पा आनंद यांचा मुलगा विनय आनंदही अभिनेता आहे. तिसरी बहीण पद्मा शर्मा असून त्यांचा मुलगा कृष्णा अभिषेक टेलिव्हिज इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चेहरा आहे. त्याची पत्नी काश्मिरा शाह देखील अभिनेत्री आहे. तसेच, पद्मा शर्मा यांची मुलगी आरती सिंग देखील अभिनेत्री आहे.
अशा पद्धतीने गोविंदाच्या कुटुंबातील जवळपास तीन पिढ्या मनोरंजन क्षेत्रात आहेत.
हेही वाचा-
–‘छोटो मियाँ बडे मियाँ’च्या वेळी अमिताभ बच्चनला खूप घाबरला होता गोविंदा, कारण जाणून व्हाल थक्क
–चाळीत राहणाऱ्या लहान मुलापासून ते बॉलिवूडचा सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास, पहा गोविंदाची अनोखी कहोनी