Friday, August 8, 2025
Home कॅलेंडर ‘यामुळे’ जरा थकवा आलाय! अभिनेते खासदार अमोल कोल्हे जाणार एकांतवासात, पोस्ट करुन सांगितले कारण

‘यामुळे’ जरा थकवा आलाय! अभिनेते खासदार अमोल कोल्हे जाणार एकांतवासात, पोस्ट करुन सांगितले कारण

राजकीय आणि सामाजिक आयुष्यात वावरत असताना एखाद्या नेतृत्वाला अनेकदा थकवा येतो, ताणतणाव येतो. त्यामुळे अनेक राजकीय नेते वर्षातून एक दोनदा तरी हमखास सुट्ट्यांवर जात असतात. कलाकार मंडळीही सततच्या शूटींग आणि सरावांमुळे थकतात. त्यामुळे तेही अनेकदा ताजेतवाने होण्यासाठी दूरदेशी गेलेलो आपण पाहतो. मात्र, सामाजिक जीवनात एक नेतृत्व आणि कलाकार म्हणून जर कोणी जगत असेल, तर अशा व्यक्तीला तारेवरची किती कसरत करावी लागत असावी याचा आपण अंदाजही लावू शकत नाही.

खासदार आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे हे यांपैकीच एक. मागील अनेक वर्षांपासून ते अभिनय आणि राजकारण यात गुरफटलेले सर्वजण पाहत आहेत. अशातच दिवसरात्र व्यस्त असलेले अमोल कोल्हे हे थकले असल्यास नवल नको. नुकतंच अभिनेते अमोल कोल्हेंनी स्वतः एक पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकांऊटवर लिहित या गोष्टीचा खुलासा केला आहे. तसेच त्यांनी या पोस्टमध्ये आपण एकांतवासात जात असल्याचेही सांगितले आहे. नेमकी काय आहे त्यांची ही पोस्ट, ते आपण पाहूयात.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या व्यक्तीरेखा साकारल्याने अमोल कोल्हे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. याचाच परिपाक म्हणून पुढे ते त्यांच्या जन्मभूूमीतून राजकीय नेतृत्व म्हणूनही उदयास आले. आणि आज ते खासदार पदी कार्यरत आहेत. एकाच वेळी अभिनेता आणि राजनेता म्हणूत ते वावरत असल्याने त्यांच्या आयुष्यात ताणतणाव येणे साहजिकच आहे. याच गोष्टींबाबत डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले आहे.

यात अमोल कोल्हेंनी म्हटले आहे की, “सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन!
घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा!
त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने!!
टीप:- फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही”
अमोल कोल्हे यांच्या या निर्णयाचे त्यांच्या चाहत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनीही स्वागत केले आहे. तसेच त्यांना या काळात विश्रांतीचाही सल्ला अनेकांनी दिल्याचे दिसत आहे. मात्र, त्यांच्या पोस्टकडे पाहता त्यांना त्यांच्या कोणत्या निर्णयांचा विचार आणि फेरविचार करावा वाटत असेल याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

अभिनेते अमोल कोल्हे या सर्व परिस्थितीतून लवकरच सावरुन पुन्हा एकदा त्यांच्या कला विश्वात आणि राजकीय आयुष्यात परततील याबाबत खात्री आहे. मात्र, शिवविचारांनी प्रेरित अभिनेत्याला ताण, थकवा यावा आणि त्यांनी त्यांच्या लाडक्या कार्यक्षेत्रापासून काहीकाळ का असेना स्वतःला तो़डावे, ही गोष्ट अनेकांना आश्चर्य करायला लावणारी आहे.

अधिक वाचा –

‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणार मीराचा भाऊ? तिची अवस्था पाहून इतर स्पर्धकही भावुक

जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल

जरा इकडे पाहा! भूमी पेडणेकरने फ्लॉन्ट केला आपल्या पाठीवरील तीळ; लेहंगा- चोलीतील लूकने चाहत्यांना भुरळ

हे देखील वाचा