Saturday, April 20, 2024

बड्डे विशेष: ‘मेहुणे, मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणे’ म्हणत सिनेसृष्टीत आपले पाय घट्ट रोवणाऱ्या अभिनेता जितेंद्र जोशीचा प्रवास

मराठी चित्रपटसृष्टीतील बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे जितेंद्र जोशी. जितूने त्याच्या जिवंत आणि दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले. आज जितू त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. जितूने त्याच्या संवेदनशील अभिनयाची चुणूक नाटकं, चित्रपट, मालिका, वेबसिरीज यांमधून दाखवली. काव्यवेडा जितू, वाचनवेडा जितू आणि फिकीर जितू सर्वानाच माहित आहे. जितूने त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीत प्रचंड संघर्ष करून यश मिळवले. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याची ही कारकीर्द.

२७ जानेवारीला जितेंद्राचा पुण्यात जन्म झाला. मूळचा मारवाडी असणारा जितू अस्स्खलित मराठी बोलतो आणि तितक्याच ताकदीने तो मराठी सिनेसृष्टीत वावरतो देखील. जितू लहानपणापासूनच शाळेतल्या लहान मोठ्या नाटकात काम करत होता. शाळेत असताना त्याला हरिसिंग गुलाबसिंग परदेशी नावाच्या सरांमुळे मला नाटकाची गोडी लावली. सोबतच तो मामाच्या इलेक्ट्रिकच्या दुकानात काम करायचा. तो दुपारच्या वेळेत मामाचे दुकान बंद करून नाटकं पाहायला जायचा. टेपऱ्या म्हणून देखील त्याने काम केले होते

९७ साली जितेंद्र मुंबईत आला. मुंबईत आल्यावर त्याला अशोक शिंदेनी खूप मदत केली. हळूहळू त्याला नाटकांमध्ये लहान सहान भूमिका केल्या. त्याला कधीही अनेक तास मालिकांमध्ये काम करणे जमले नाही. म्हणून त्याने त्याचे संपूर्ण लक्ष नाटकावर केंद्रित केले. ‘कमी तिथे आम्ही’ या तत्वावर त्याने काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू तो अभिनयातच रुळला.

जितेंद्रने गीतकार, सूत्रसंचालक म्हणून देखील खूप काम केले. त्याने ‘प्राण जाये पर शान ना जाये’ सिनेमातून हिंदी चित्रपटात काम केले. ‘गोलमाल’ सिनेमातून त्याने मराठी चित्रपटात पदार्पण केले. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला. त्याने नायकासोबतच खलनायकी भूमिका देखील लीलया केल्या. जितूने मराठी सोबतच अनेक हिंदी सिनेमात सहायक भूमिका देखील उत्तमरीत्या साकारत हिंदीमध्ये त्याची दखल घ्यायला भाग पडले. जितूने हिंदीमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केले. त्याला या क्षेत्रात सर्वात जास्त ओळख आणि प्रसिद्धी मिळाली ती नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ मधल्या काटेकर या पोलीस भूमिकेने. त्यानानंतर तो ‘बेताल’ या सिरीजमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसला.

‘मु. पो. बोंबिलवाडी’ या लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या नाटकातून जितेंद्र शकुंतला जोशी यांचा कलासृष्टीतील प्रवास सुरू झाला. ‘हम तो तेरे आशिक है’, ‘नकळत सारे घडले’, ‘प्रेम नाम है मेरा’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘दोन स्पेशल’ या व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका साकारल्या.  सोबतच त्याने हाय काय नाय काय, तुकाराम, व्हेंटिलेटर, पोस्टर बॉइज, पोस्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, कुटुंब, दुनियादारी, माउली, शाळा आदी सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या.

जितेंद्रने त्याच्या अभिनय कौशल्याची कमाल सर्वच माध्यमातून नेहमीच दाखवली. आता जितू लवकरच एक निर्माता म्हणून सर्वांसमोर येणार आहे. जितुचा ‘गोदावरी’ नावाचा सिनेमा येत्या १ मे ला प्रदर्शित होत आहे. त्याला त्याच्या या नव्या इनिंगसाठी आणि वाढदिवसासाठी खूप शुभेच्छा.

हे देखील वाचा