Saturday, July 6, 2024

रितेश आणि जिनिलियाच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण, सोशल मीडियावर रोमॅंटिक पोस्ट शेअर करत दिल्या एकमेकांना शुभेच्छा

बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणजे रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh). या दोघांच्या जोडीची चर्चा नेहमीच इंडस्ट्रीमध्ये, सोशल मीडियावर, फॅन्समध्ये होताना दिसते. प्रत्येकालाच या जोडीबद्दल एक विशेष प्रेम आणि आकर्षण असल्याचे दिसून येते. आज (३ फेब्रुवारी) रितेश आणि जिनिलिया त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा करत आहे. २०१२ साली या दोघांनी लग्न केले आणि आज त्यांच्या लग्नाला दहा वर्ष ( genelia deshmukh and ritesh deshmukh wedding anniversary) पूर्ण होत असून ते अकराव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने जिनिलियाने आणि रितेशने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जिनिलियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर लिहिले, “१० वर्षे हा नक्कीच एक मैलाचा दगड आहे आणि मला ओळखत असताना. आज आपण दोघंच शहरापासून लांब, सेलिब्रेशन, डान्स, जेवण आणि मिठी मारत असलो असतो. मात्र कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि आपल्याला चांगले काम करायचे आहे. मला जाणवले की, सेलिब्रेशन करण्याचा खरा अर्थ नक्की काय आहे. तू पहिल्यांदाच दिग्दर्शन करत असून मी त्याचा एक भाग आहेस. मी १० वर्षांनंतर अभिनय करत आहे आणि तू त्याचा एक भाग आहेस. आपण एकत्र करत असलेल्या या गोष्टीत घाम गाळून, रक्त आणि जीव ओतून काम करत आहोत हा उत्सव नसून दुसरे काय आहे?” यासोबतच जिनिलियाने त्यांच्या दोघांचे काही व्हिडिओ एकत्र कोलाज करत त्याचा एक सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे, या व्हिडिओमध्ये हे दोघं सगळ्यांमध्ये असूनही वेगळे ठरताना दिसत आहे. तर व्हिडिओच्या शेवटी जिनिलियाने ‘वेड’ असे देखील लिहिले आहे. जिनिलियाचा हा आगामी पहिला मराठी चित्रपट देखील आहे.

तर दुसरीकडे रितेशने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक रोमॅंटिक पोस्ट शेअर केली असून, सोबतच त्या दोघांचे काही ब्लॅक अँड व्हाईट रोमॅंटिक फोटो देखील त्याने पोस्ट केले आहेत. रितेशने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “तुझ्यासोबत असणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आनंद, सुख, संघर्ष या सर्व वेळी आपण एकमेकांचा हात घट्ट धरून सोबत चाललो. तु माझ्यासोबत असल्यावर मला वाटते की मी काहीही करू शकतो. माझी साथ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद… लग्नाच्या १० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको..!I love you” या दोघांच्या पोस्टवर त्यांच्या फॅन्ससोबतच बॉलिवूडमधील कलाकार देखील त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहे.

जिनिलिया आणि रितेशने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याच चित्रपटाच्या सेटवर रितेश आणि जिनिलियाची ओळख झाली होती. जिनिलियाला आधीपासूनच रितेश एका मंत्र्याचा मुलगा म्हणून ओळख होती. त्यामुळे ती त्याच्यापासून लांबच राहायची. तिला असे वाटायचे की, त्याला खूपच गर्व असेल, आणि तो खूप भाव खात असेल असं तिला वाटायचे. म्हणूनच तिनेच आधीपासूनच भाव खायला सुरुवात केली आणि रितेशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. रितेशला जिनिलियाचे हे वागणे आवडले नाही. मात्र शुटींग दरम्यान तिला जाणवले की, राजकारणी कुटुंबातील असला तरीही तो फारच मनमिळावू आणि सगळ्यांशी प्रेमाणे वागणारा आहे.

शुटींग दरम्यान त्यांची ओळख वाढू लागली आणि त्यांची छान मैत्री झाली. १५-१६ वर्षीय जिनिलिया आणि २४ वर्षीय रितेश एकमेकांशी तिच्या अभ्यासाविषयी गप्पा मारायचे. चित्रपटाचे शुटींग संपल्यानंतर मात्र रितेश जिनिलियाला फार मिस करत होता. मात्र एका मुलीला लगेच फोन करणे त्याला योग्य वाटत नव्हते. अशीच भावना जिनिलियाची होती. पुढे त्यांनी ‘मस्ती’ या चित्रपटात एकत्र काम केले. त्यानंतर त्यांच नाते सुरू झाले. पण त्यांनी कोणालाही याचा थांगपत्ता लागू दिला नाही. १० वर्षे एकमेकांशी मैत्री, प्रेम आणि डेट केल्यानंतर त्यांनी ३ फेब्रुवारी २०१२ ला लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलं आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा