Friday, July 5, 2024

विनोद मेहरांचा एक पॉईंट हुकला अन् राजेश खन्ना बनले सुपरस्टार; सलग १५ सिनेमे दिले सुपरहिट

“कोणीही त्या व्यक्तीला लक्षात ठेवत नाही, जो सेकंड येतो. फक्त त्याच व्यक्तीला हे लक्षात राहतं की, तो सेकंड आला होता.” हे प्रसिद्ध वाक्य म्हणलं होतं अमेरिकेचा कार रेसर रॉबर्ट विल्यम ‘बॉबी’ने. पण ‘बॉबी’च्या या कोटला सतराशे साठ अपवाद आहेत. तुम्हीही या गोष्टीशी असहमत असाल. पण एक अभिनेता होता, ज्याने हा कोट जर ऐकला असता, तर तोही नक्कीच म्हणाला असता, ‘क्या कह दिया है, तुमने ओ जानम.’ आपण बोलत आहोत अभिनेते विनोद मेहरा यांच्याबद्दल. हिंदी सिनेसृष्टीतील असे ‘सेकंड लीड अभिनेते’ जे त्यांच्या आयुष्यात असंख्यवेळा सेकंड, थर्ड आणि फोर्थ आले. मग जर विनोद मेहरा सेकंड आले होते, तर फर्स्ट येणारा अभिनेता कोण होता? जाणून घेऊया या लेखातून…

पंजाबच्या अमृतसरमध्ये १३ फेब्रुवारी, १९४५ रोजी जन्मलेले विनोद मेहरा हे सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवणारे आपल्या कुटुंबातील दुसरे व्यक्ती होते. त्यांच्या आधी त्यांची बहीण शारदा मेहराने सिनेमात एन्ट्री केली होती. किती गजब योगायोग आहे बघा. एक बालकलाकार म्हणून विनोद मेहरांनी १९५७ साली काम केलेल्या दुसऱ्या सिनेमाचं नावही ‘शारदा’च होतं. पण झालं असं की, हा सिनेमा आधी रिलीझ झाला होता. त्यानंतर जाऊन तो सिनेमा रिलीझ झाला, जो त्यांनी सर्वात आधी साईन केला होता. १९५८ साली आलेल्या त्या सिनेमाचं नाव होतं. ‘रागिनी.’ त्यामुळे अनेक ठिकाणी तुम्ही वाचलं असेल की ‘रागिनी’ हाच विनोद मेहरा यांचा पहिला सिनेमा होता.

चला तर पुन्हा वळूया विनोद मेहरांच्या स्टोरीकडे. काही सिनेमांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारल्यानंतर जवळपास ११ वर्षांपर्यंत ते रुपेरी पडद्यावरून गायब झाले होते. यादरम्यान त्यांनी एका कंपनीचे मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह म्हणून काम केलं होतं. त्यांची अभिनय करण्याची कोणतीही योजना नव्हती. पण त्यांना जर प्रसिद्ध दिग्दर्शक रूप के. शोरे यांनी ‘गेलॉर्ड्स’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये पाहिलं नसतं, तर ते पुन्हा कधीच अभिनयात परतले नसते.

सन १९७१ मध्ये त्यांचा पहिला सिनेमा आला. ‘एक थी रीटा.’ या सिनेमात त्यांच्या अपोझिट होती अभिनेत्री तनुजा. तनुजा म्हणजे अभिनेत्री काजोलची आई बरं का. दिग्दर्शक शोरे यांचा हा सिनेमा त्यांच्याच १९४५ सालच्या ‘एक थी लडकी’ सिनेमाचा रिमेक होता. ‘एक थी लडकी’ सिनेमा सुपरहिट ठरला होता, पण शोरे दिग्दर्शक म्हणून पुन्हा ते यश मिळवण्यात अपयशी ठरले. असं असलं, तरीही विनोद मेहरांना काम मिळणं सुरूच राहिलं.

त्याचवर्षी आणखी एक सिनेमा आला ‘लाल पत्थर.’ हा सिनेमा हिट तर झाला, पण या सिनेमाने विनोद मेहरांचे करिअर टाईपकास्टसारखं केलं होतं. म्हणजेच एकाच पठडीतील सिनेमे ते करायचे. त्यांना ‘सेकंड लीड अभिनेत्या’च्या भूमिका दिल्या जाऊ लागल्या. कारण या सिनेमात मुख्य भूमिकेत राजकुमार, हेमा मालिनी आणि राखी होते. अशाप्रकारे ते भारतीय सिनेसृष्टीतले पहिले दीपक तिजोरी बनले होते. आता तुम्ही म्हणाल दीपक तिजोरी कसे काय? तर दीपिक तिजोरी हेदेखील अनेक प्रसिद्ध सिनेमात अभिनेत्याच्या मित्राच्या सेकंड लीड रोलमध्ये दिसायचे. तुम्हाला आता आयडिया आलीच असेल.?

सन १९६० आणि १९७१च्या दशकात म्हणजेच बालकलाकार म्हणून विनोद मेहरा यांचा शेवटचा सिनेमा होता ‘अंगुलीमाल’. तर मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा पहिला सिनेमा होता ‘एक थी रीटा.’ या दोन्ही सिनेमांमध्ये असं काहीतरी झालं की, ज्याने विनोद मेहरा यांच्या आयुष्यावर खूपच प्रभाव टाकला.

किस्सा आहे १९६५ सालचा. युनायटेड प्रोड्यूसर आणि फिल्मफेअरने मिळून एका टॅलेंट सर्च प्रोग्रामचे आयोजन केलं होतं. ऑल इंडिया लेव्हलच्या या टॅलेंट हंट प्रोग्राममध्ये एकूण १० हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. या टॅलेंट हंट प्रोग्रामचे जज होते बिमल रॉय, बी.आर. चोप्रा, नासिर हुसैन, जीपी सिप्पी, ओम प्रकाश मेहरा आणि शक्ती सामंत. यांसारखे त्याकाळचे दिग्गज दिग्दर्शक. हा इव्हेंट किती मोठा होता, याचा अंदाज याच गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की, या टॅलेंट हंटमध्ये कोणीही जिकलं, तर त्याला या सर्व दिग्दर्शकांच्या एक-एक सिनेमाव्यतिरिक्त १२ सिनेमांचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार होतं.

शेवटच्या राऊंडमध्ये रिलेक्ट झाले फक्त ८ लोक. या ८ लोकांमध्ये होते सुभाष देसाई, धीरज कुमार, राजेश खन्ना आणि विनोद मेहरा यांसारखे लोक. या कलाकारांनी पुढं जाऊन सिनेइंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

ज्यावेळी या स्पर्धेचा अंतिम निकाल आला, तेव्हा समजलं की, विनोद मेहरा केवळ एका पॉईंटने राजेश खन्ना यांच्याकडून हारले होते. गौतम चिंतामणि आपल्या ‘डार्क स्टार- द लोनलीनेस ऑफ बिइंग राजेश खन्ना’ या पुस्तकात लिहितात की, “आता फक्त दोन अतिरिक्त गुणांनी या आकर्षक सौम्य अभिनेत्याचे नशीब कसे बदलले असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. जसे राजेश खन्ना यांनी त्यांची प्रतिमा निर्माण केली होती, तसं या अभिनेत्याला जमलं नव्हतं.”

तर राजेश खन्नाच होते फर्स्ट येणारे अभिनेते. ज्यांनी विनोद मेहरांसोबत इतर ९९९९ लोकांमधून पहिला नंबर पटकावला होता. रंजक माहिती अशी की, राजेश खन्नांनी १९६९ ते १९७१ या दरम्यान सलग १५ सुपरहिट सिनेमे दिले. त्यामुळे ते भारतीय सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार बनले होते. राजेश खन्ना हे १९६९ ते १९७६ या ७ वर्षात एकटे सुपरस्टार होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘कट कट कट’, म्हटले तरीही किस करायचे थांबले नाहीत ‘हे’ कलाकार; दीपवीर तर सुसाट सुटलेले
गल्ली ते दिल्लीपर्यंत गाजणाऱ्या गंगूबाईने थेट पंतप्रधान नेहरूंनाच केले होते लग्नासाठी प्रपोज, पुढे जे घडलं…
राज कपूरांनी संधी देऊनही मागच्या दारातून हेमा मालिनीने ठोकली होती धूम! तरीही सिनेमा ठरला सुपरहिट

हे देखील वाचा