भारतीय सिनेमाचे ‘पहिले सुपरस्टार’ म्हणून दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांनी ओळखले जाते. त्यांनी आपल्या हटके अभिनयाने लाखो- कोट्यवधी चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या चित्रपटासाठी चाहते वेडे असायचे. इतकेच नव्हे, तर मुली त्यांच्या नावाचे सिंदूर लावायच्या, तर मुले त्यांच्यासारखी हेअर स्टाईल करायचे. त्यांनी बॉलिवूडमध्ये सलग १५ सुपरहिट चित्रपट दिले होते. त्यांचा हा विक्रम आजपर्यंत कोणताही अभिनेता मोडू शकला नाही. त्यांच्या आयुष्यात अनेक चांगले- वाईट किस्से घडले. त्यातीलच एक किस्सा खूप प्रसिद्ध झाला होता, जेव्हा बॉलिवूडच्या एका दिग्गजाने अभिनेता राजेश खन्ना यांनी जोरदार कानशिलात लगावली होती. राजेश खन्ना यांना एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याने चापट मारणे, ही खूप मोठी गोष्ट होती. ही घटना त्यादरम्यान खूपच चर्चेत होती.
राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांना चापट मारणारा तो अभिनेता इतर कोणी नाही, तर महमूद हे होते. शनिवारी (दि. २३ जुलै) महमूद यांची पुण्यतिथी असते. त्यानिमित्ताने जाणून घेऊया हा किस्सा. चित्रपटात अभिनय करण्यासोबतच ते एक दिग्दर्शक म्हणूनही काम करत होते. त्यांनी सन १९७९ मध्ये ‘जनता हवालदार’ हा चित्रपट राजेश खन्ना यांच्यासोबत साईन केला होता. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी ‘ड्रीम गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी मुख्य अभिनेत्री होत्या.
या चित्रपटाची शूटिंग महमूद आपल्या फार्म हाऊसमध्ये करत होते. एके दिवशी महमूद यांच्या मुलाची भेट राजेश खन्ना यांच्यासोबत झाली आणि ते त्यांना ‘हॅलो’ म्हणून निघून गेले. त्यादरम्यान राजेश खन्ना मोठे सुपरस्टार होते. त्यांनी आपल्यासाठी लोकांना वेडे होताना पाहिले होते. अशामध्ये महमूद यांच्या मुलाने फक्त ‘हॅलो’ म्हणून जाणे हे त्यांना आवडले नाही.
मग काय राजेश खन्नाही या गोष्टीवरून नाराज झाले आणि सेटवर उशीरा जाऊ लागले. ते नेहमीच चित्रपटांच्या सेटवर उशीराच जात असायचे. मात्र, त्यांच्यामुळे महमूद यांना चित्रपटाचे शूटिंग करण्यात खूपच अडचण येऊ लागली होती. राजेश खन्ना यांच्यासाठी महमूद यांना तासंतास वाट पाहावी लागायची. कदाचित महमूद यांनीही राजेश खन्ना यांना धडा शिकवण्याचे मनाशी ठरवले असावे.
अशाच एका दिवशी महमूद आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकले नाही. जेव्हा राजेश खन्ना सेटवर उशीरा पोहोचले, तेव्हा त्यांनी राजेश खन्ना यांना जोरात चापट मारली.
महमूद यांनी म्हटले की, “तुम्ही सुपरस्टार असाल तुमच्या घरात. मी चित्रपटासाठी तुम्हाला संपूर्ण पैसे दिले आहेत आणि चित्रपट तुम्हाला पूर्ण करावाच लागेल.” त्या एका चापटीने राजेश खन्ना यांनी काही वेळासाठी त्यांच्या स्टारडम विसरावा लागला होता. यानंतर मात्र ते शूटिंगसाठी सेटवर वेळेवर हजेरी लावू लागले.