बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने सन २००२ मध्ये राम गोपाल वर्मा दिग्दर्शित सुपरहिट ‘कंपनी’ चित्रपटातून पदार्पण केले होते. याव्यतिरिक्त सन २००७ साली प्रदर्शित झालेला ‘शूटआऊट ऍट लोखंडवाला’ हा देखील त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटात त्याने डोळस नावाचे निगेटिव्ह पात्र साकारले होते, ज्याची आजही आठवण काढली जाते. या चित्रपटात विवेकने पहिल्यांदाच संजू बाबा म्हणजेच संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली होती. हा त्याच्यासाठी खूपच खास क्षण होता. खरं तर संजूमुळेच विवेक आपल्या शाळेतील दिवसात मुलींसमोर हिरो बनला होता. हाच किस्सा आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…
माध्यमांतील वृत्तांनुसार, विवेकने नुकतेच एका मुलाखतीत हा किस्सा शेअर केला. त्याने सांगितले की, तो अजमेरच्या प्रसिद्ध मायो कॉलेजच्या बोर्डिंग शाळेत शिकत होता. एकदा विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय जयपूरमध्ये कोणत्यातरी चित्रपटाची शूटिंग करत होते, तेव्हा त्यांनी विवेकला भेटण्याची योजना आखली आणि थेट त्याच्या शाळेवर पोहोचले.
विवेक म्हणतो की, “मला आठवते, जेव्हा मी मायो कॉलेजच्या बोर्डिंग शाळेत शिकायचो. माझे वडील जयपूरवरून कोणत्यातरी चित्रपटाच्या शूटिंगसाठी आले होते आणि त्यांनी मला सरप्राईझ देण्याचा निर्णय घेतला. ते अचानक शालेत आले. आपल्या वडिलांना अचानक शाळेत पाहून मीदेखील आश्चर्यचकित झालो.”
“यादरम्यान मी पाहून चकित झालो की, इतक्या लांब केसांमध्ये संजय दत्तही गाडीतून बाहेर निघाला होतै. तो वडिलांसोबत शूटिंग करत होता, त्यामुळे त्यानेही वडिलांसोबत इथे येण्याचा निर्णय घेतला होता. त्यादरम्यान तो खूपच प्रसिद्ध होता. मला आठवते की, मी या क्षणाचा खूप चांगला वापर केला. मी त्याला रस्त्याच्या पलीकडे केवळ १० मिनिटांसाठी मायो मुलींच्या शाळेत येण्याची विनंती केली. हे खूपच शानदार होते,” असे विवेक संजय दत्तबद्दल बोलताना म्हणाला.
“जेव्हा तो माझ्यासोबत गेला आणि गेट उघडले, तेव्हा हे पाहून शिपायाचे तोंड उघडेच राहिले. मुली तर अगदी वेड्यासारख्या करत होत्या. त्यावेळी मला राजासारखे वाटत होते. यानंतर खरे स्टार तर निघून गेले. मात्र, मी शाळेतील छोटा स्टार झालो. इतकेच नव्हे, तर एकदा मी शाळेतून गुपचूप बाहेर पडून संजय दत्तचा चित्रपट पाहायला गेलो होतो आणि नंतर फसलो होतो,” असेही आपल्या शाळेतील किस्सा सांगताना त्याने म्हटले.
विवेक ओबेरॉयच्या पहिल्या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली होती. त्याच्या यादगार चित्रपटांमध्ये ‘साथिया’, ‘मस्ती’, ‘ओमकारा’ यांचा समावेश आहे. तरीही चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकांना खूप नावाजले गेले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…