केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही, तर जगभरात आपल्या दमदार आणि जिवंत अभिनयाने सुपरस्टार यशने आपले नाव कमावले आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले, पण ‘केजीएफ: चॅप्टर १’ या चित्रपटाने त्याला यशाच्या शिखरावर नेले. एवढा पैसा, नाव आणि प्रसिद्धी कमावणाऱ्या यशचे वडील बस ड्रायव्हर आहेत हे तुम्हाला माहितीये का? एवढेच नाही, तर यशचे खरे नाव ‘यश’ नाही हे देखील अनेकांना माहीत नसेल. होय, यशचे खरे नाव काही वेगळेच आहे. यश शनिवारी (८ जानेवारी) त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग त्याच्या वाढदिवशी त्याच्या आयुष्याशी निगडित असे काही किस्से जाणून घेऊया, जे तुम्ही क्वचितच ऐकले किंवा वाचले असतील.
यशचे खरे नाव
यशचा जन्म ८ जानेवारी, १९८६ रोजी कर्नाटक येथे झाला होता. त्याचे खरे नाव नवीन कुमार गौडा (Naveen Kumar Gowda) आहे. त्याला यश (Yash) या स्टेज नावाने ओळखले जाते आणि त्याने अनेक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो कन्नड चित्रपट इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. चाहते त्याला प्रेमाने ‘रॉकिंग स्टार’ म्हणतात.
यशने अशोक कश्यप दिग्दर्शित ‘नंदा गोकुला’ या टेलिव्हिजन मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यशने २००८ मध्ये ‘मोग्गीना मनसु’ या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर तो ‘राजधानी’, ‘ड्रामा’, ‘गुगली’, ‘राजा हुली’, ‘मिस्टर अँड मिसेस रामाचारी’, ‘मास्टरपीस’ आणि ‘केजीएफ: चॅप्टर १’ यासह अनेक चित्रपटांमध्ये दिसला. ‘केजीएफ: चॅप्टर १’ चित्रपटाने जगभरात २५० कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यश हा एक प्रसिद्ध चेहरा बनला. यशचा पुढचा चित्रपट ‘केजीएफ: चॅप्टर २’ यावर्षी प्रदर्शित होणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
यशचे वडील आहेत बस ड्रायव्हर
करोडोंची कमाई करणाऱ्या यशचे वडील अरुण कुमार बीएमटीसी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. असे म्हटले जाते की, यशच्या वडिलांना त्यांचे काम आवडते. म्हणूनच ते सुपरस्टारचे वडील असूनही पूर्ण समर्पणाने आपले काम करतात.
यशने म्हैसूरमध्ये घालवले बालपण
यशची आई पुष्पा गृहिणी आहेत. त्याला एक बहीण देखील आहे, तिचे नाव नंदिनी आहे. यशने त्याचे बालपण म्हैसूरमध्ये घालवले आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनय शिकण्यासाठी तो नाटक मंडळात सामील झाला. यानंतर यशने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. परंतु २००८ मध्ये त्याला पहिला चित्रपट मिळाला. ज्यामध्ये त्याची सहकलाकार राधिका पंडित होती, जी आज त्याची पत्नी आणि दोन मुलांची आई आहे.
गुपचूप केला साखरपुडा
यशने त्याची सह-अभिनेत्री राधिका पंडितशी लग्न केले. माध्यमांतील वृत्तानुसार, राधिका आणि यश एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. दोघांची पहिली भेट ही ‘मिस्टर आणि मिसेस रामाचारी’च्या सेटवर झाली होती. दोघांचा साखरपुडा हा १२ ऑगस्ट, २०१६ रोजी गोव्यात गुपचूप उरकण्यात आला होता. त्यानंतर ९ डिसेंबर, २०१६ रोजी त्यांनी बंगळुरूमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. इतकंच नाही तर यशने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी संपूर्ण कर्नाटकाला आमंत्रित केलं होतं. दोघांना दोन मुले आहेत.
आलिशान बंगला
यश सुमारे ५० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. यशचा बंगळुरूमध्ये सुमारे चार कोटी रुपयांचा आलिशान बंगलाही आहे. यशने गेल्या वर्षीच दुसरे घर घेतले होते.
सामाजिक कार्यातही लावतो हातभार
यश सामाजिक कार्यासाठीही ओळखला जातो. २०१७ मध्ये त्याने यशोमार्ग फाऊंडेशन सुरू केले. या फाऊंडेशनने कोप्पल जिल्ह्यात ४ कोटी रुपये खर्चून एक तलाव बांधले आहे, ज्यातून लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळते.
हेही नक्की वाचा-
- ‘आझाद हिंद सेने’त सामील होऊन अभिनेत्री नंदा यांना करायची होती देशसेवा, पण नशिबाने धरली वेगळीच वाट
- अभिनेत्री सागरिका घाटगेचे रणबीर कपूरबद्दल ‘ते’ वक्तव्य ऐकून सरकली होती पती झहीर खानच्याही पायाखालची जमीन
- Supriya@61: शाहिद कपूरची सावत्र आई असलेल्या सुप्रिया पाठक यांचा ‘हंसा पारेख’ होण्याचा थक्क करणारा प्रवास
हेही पाहा-