Sunday, January 26, 2025
Home कॅलेंडर ‘आझाद हिंद सेने’त सामील होऊन अभिनेत्री नंदा यांना करायची होती देशसेवा, पण नशिबाने धरली वेगळीच वाट

‘आझाद हिंद सेने’त सामील होऊन अभिनेत्री नंदा यांना करायची होती देशसेवा, पण नशिबाने धरली वेगळीच वाट

सिनेमाच्या पडद्यावर आपल्या मनमोहक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी दिग्गज अभिनेत्री म्हणजे नंदा होय. नंदा या ६० आणि ७०च्या दशकातील अतिशय सुंदर आणि उत्तम नायिकांपैकी एक होत्या. नंदा जेव्हा बॉलिवूडमध्ये काम करू लागल्या, तेव्हा त्यांची प्रतिमा ‘छोटी बहीण’ अशी झाली होती. कारण त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती. त्यादरम्यान त्यांनी मुख्य अभिनेत्याच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांचे पूर्ण नाव नंदा कर्नाटकी असे होते. नंदा यांची शनिवारी (८ जानेवारी) ८३वी जयंती आहे. चला तर मग त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर नंदा होत्या खूप प्रभावित
नंदा यांचा जन्म ८ जानेवारी, १९३९ रोजी कोल्हापूर येथे झाला होता. नंदा यांच्या घरात फिल्मी वातावरण होते. त्यांचे वडील मास्टर विनायक हे मराठी रंगभूमीचे प्रसिद्ध विनोदकार होते. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केली होती. नंदा यांच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांनी अभिनेत्री व्हावे, पण असे असूनही नंदा यांना अभिनयात फारसा रस नव्हता. थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर नंदा खूप प्रभावित होत्या. त्यांच्याप्रमाणेच त्यांनाही सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, “मला लहानपणापासून आझाद हिंद फौजेत सामील व्हायचे होते आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचे होते.” पण, नशिबाने त्यांना कोल्हापुरातून मायानगरीत आणले. नंदा यांनी ७० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मनोज कुमार यांचा १९७२ मध्ये आलेला ‘शोर’ हा चित्रपट नंदा यांचा शेवटचा हिट ठरला. या चित्रपटात त्यांनी मनोज कुमार यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. जी आपल्या मुलाला ट्रेनमधून वाचवताना आपला जीव गमावते. या चित्रपटातील त्यांच्या छोट्याशा भूमिकेतून नंदा यांनी सिने प्रेक्षकांना भुरळ घातली.

आईच्या सांगण्यावरून नंदांनी कापले होते केस
नंदा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ती तिच्या अभ्यासात व्यस्त होती, तेव्हा तिची आई तिच्याकडे आली आणि म्हणाली, ‘तुला केस कापावे लागतील, कारण तुझ्या वडिलांची इच्छा आहे की तू त्यांच्या चित्रपटात मुलाची भूमिका करावी.’ हे ऐकून नंदा यांना खूप राग आला. सुरुवातीला त्यांना तिचे केस कापण्यास स्पष्टपणे नकार दिला, परंतु तिच्या आईच्या समजूतीने तिने त्यास होकार दिला.

चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान नंदा यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. तसेच त्याचा चित्रपटही अपूर्ण राहिला. हळूहळू कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली. त्यांच्या घरची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, त्यांना त्यांचा बंगला आणि गाडी विकावी लागली होती.

वाढत्या वयाबरोबर चित्रपटांमध्ये काम करणे झाले कमी
‘शोर’ या चित्रपटात काम केल्यानंतर नंदा यांनी वाढत्या वयामुळे चित्रपटात काम करणे बंद केले. या काळात त्यांच्याकडे ‘परिणीता’, ‘प्रायश्चित’, ‘कौन कातिल’, ‘असलियत’ आणि ‘नया नशा’ सारखे चित्रपट आले. मात्र, हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले नाहीत. चित्रपटांचे सततचे अपयश पाहून नंदा यांनी चित्रपटसृष्टी सोडली.

नंदा यांनी १९८१ मध्ये पुन्हा बॉलिवूडमध्ये केले कमबॅक
नंदा यांनी १९८१ मध्ये ‘आहिस्ता आहिस्ता’ चित्रपटातून चरित्र अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत परतल्या. या चित्रपटानंतर त्यांनी राज कपूर यांच्या ‘प्रेम रोग’ आणि ‘मजदूर’ या चित्रपटांमध्ये काम केले. या तिन्ही चित्रपटांमध्ये नंदा यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांच्या आईची भूमिका साकारली होती.

कधीही मिळाला नाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार
नंदा यांनी त्यांच्या चार दशकांच्या सिने कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. परंतु कोणत्याही चित्रपटात त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला नाही. १९६० मध्ये ‘आंचल’साठी त्यांना सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता. ‘भाभी’ (१९५७), ‘आहिस्ता आहिस्ता’ (१९८१) आणि ‘प्रेम रोग’ (१९८२) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि ‘इत्तेफाक’ १९६९ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले होते. २५ मार्च, २०१४ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी नंदा यांचे निधन झाले.

हेही नक्की वाचा-

हेही पाहा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा