Monday, June 17, 2024

आमिर खान ते आलिया भट्ट, एका चित्रपटाने ‘या’ कलाकारांना बनवले स्टार

रोल, कॅमेरा, ऍक्शन हे शब्द ऐकले की काहींच्या डोळ्यासमोर उभं राहातं सिनेमात काम करण्याचं स्वप्न. या स्वप्नापायी रोज अनेक जण स्वप्नांची नगरी मुंबई गाठतात. काम मिळवण्यासाठी संघर्ष करतात. असेल त्या आणि मिळेल त्या परिस्थितीत राहातात. का तर अभिनयाचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. त्यात अभिनय क्षेत्र म्हणजे बेभरवशाचं. त्यामुळे काहींना काम मिळतं, तर काहींना मिळत नाही. बरं काम मिळालं तरी यश मिळेलच याची शाश्वतीही नाही. बरं अगदीच प्रत्येकालाच खूप संघर्ष करावा लागतो असंही नाही, कारण काही मोजक्या लोकांचे मात्र नशीब पालटते त्यांना असं काही काम मिळून जातं की ते एका रात्रीत स्टार होऊन जातात. आणि एकदा लोकांना ते भावले की त्यांची फॅन फॉलोविंगही वाढायला सुरुवात होते… त्यातच असं म्हणूच शकतो की बॉलिवूड आणि स्टारडम हातात हात घालूनच चालतात. त्यामुळे एखादं चांगलं कामही एखाद्या साध्या ऍक्टरला स्टार करून जातं… तर मंडळी थोडक्यात तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आज कशावर बोलणार आहे, तर विषय आहे एका रात्रीत स्टार झालेले बॉलिवूड कलाकार. 

महिमा चौधरी- या यादीतील पहिले नाव म्हणजे महिमा चौधरी. अनेकांसाठी हे नाव नवं असू शकतं पण 1997-2000 च्या दरम्यान हे नाव प्रचंड गाजलं होतं. महिमाने परदेस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. तिच्यासह त्या चित्रपटात शाहरुख खान होता. या चित्रपटाने महिमाला एका रात्रीत ओळख मिळवून दिली होती. या चित्रपटानंतर तिने आणखी काही चित्रपटांमध्ये काम केले, पण एका रस्ता अपघातामुळे तिच्या करियरला ब्रेक लागला. सध्या ती ब्रेस्ट कँसरला हरवण्याच्या प्रयत्नात आहे.

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिर खानचाही या यादीत समावेश आहे. त्याने कयामत से कयामत तक या चित्रपटात पहिल्यांदाच प्रमुख भूमिका निभावली होती. हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. त्यामुळे अमीरला एका रात्रीतच मोठी प्रसिद्धी मिळाली आणि त्याचा एक वेगळा चाहतावर्गही तयार झाला. त्या चित्रपटातील पापा केहते है बडा नाम करेगा हे गाणं तर आजही तेवढंच प्रसिद्ध आहे. या चित्रपटात काम केल्यानंतर मात्र अमिरने यशाचा धरलेला हात परत नंतर सोडलाच नाही.

दिव्या भारती, हे नाव घेतलं तरी अनेकांना आठवतो, तो तिचा अकाली मृत्यू. केवळ १९ व्या वर्षी ५ व्या मजल्यावरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झालेला. पण त्याआधी तिने काही हिट चित्रपटांमध्ये कामं केली होती. तिने दिवाना या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला. त्याने तिला चांगली ओळख मिळवून दिली होती. तिच्या सौंदर्याने अनेक युवकानांही भूरळ घातलेली. पण काही चांगल्या चित्रपटांमध्ये कामं केल्यानंतर अचानक ती सर्वांना सोडून गेली.

आपल्या डान्स, स्टंड आणि अभिनयाबरोबरच आपल्या लूकने अनेकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. कहो ना प्यार है हा त्याचा प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट. हा चित्रपट चांगलाच हिट झाला होता. त्यामुळे या चित्रपटाने हृतिक बरोबरच अमिषा पटेललाही मोठी ओळख निर्माण करून दिली आणि बॉलिवूडला नवे स्टारही मिळाले.

कबूतर जा जा हे गाणं आठवतंय का? आठवत असेल तर त्यातील हिरोईनही आठवत असेल. तिचं नाव भाग्यश्री. मैने प्यार किया या चित्रपटाने तिला थोड्याच काळात मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. या चित्रपटानंतर तिच्याकडे उगवती स्टार म्हणून पाहिलं जात होतं. पण नंतर ती फार चित्रपटात दिसली नाही.

आत्ताच्या घडीला आवडती हिरोईन कोण असं विचारलं तर अनेक जण एक नाव नक्की घेतील, ते म्हणजे दिपीका पदुकोण. जवळपास गेल्या दीड दशकापासून तिचं नाव बॉलिवूडमध्ये गाजतय. आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत तिने काम केलंय. पण दिपीकाला पहिली प्रसिद्धी मिळाली ती ओम शांती ओम या चित्रपटातून. शाहरुख खानबरोबर दिपीका त्या चित्रपटात झळकली होती. त्या चित्रपटानंतर तिच्या अभिनय कौशल्यामुळे तिला अनेक चित्रपट मिळत गेले. आज ती सर्वाधिक चाहतावर्ग असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

1990 मध्ये आलेल्या आशिकी चित्रपट आजही अनेकांना आठवत असेल, इतका हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाने राहुल रॉय आणि अनू अगरवाल यांना एका रात्रीत स्टार केले होते.

स्टुडंट ऑफ द ईयर या २०१२ मध्ये आलेल्या चित्रपटाने बॉलिवूडला ३ स्टार दिले. ते म्हणजे आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा. या तिघांनीही या चित्रपटातून पदार्पण करताना आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यामुळे पुढेही त्यांना चित्रपटांच्या ऑफर येत गेल्या. आलिया तर सध्याच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा