रशिया आणि युक्रेनमधील युद्ध तीव्र होत आहे. या युद्धाचा फटका निष्पाप लोकांवर पडत आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या या युद्धाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता अभिनेत्री प्रियांका चोप्राला युक्रेनवासीयांचे दुःख पाहवत नाहीये. तिने याबद्दल सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे त्या भागात दहशतीचे वातावरण तर आहेच पण त्यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. दरम्यान, प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये युद्धाच्या स्थितीत लोकांचे हाल, त्यांची मानसिक स्थिती आणि दहशत स्पष्टपणे दिसत आहे. प्रियांकाने या व्हिडिओसोबत एक लांबलचक कॅप्शनही शेअर केले आहे.
प्रियांकाने लिहिले की, “या युद्धक्षेत्रात निष्पाप जीव जगत आहेत. ते तुमच्या आणि माझ्यासारखेच आहेत.” तिने तिच्या बायोमध्ये एक लिंक देखील शेअर केली आहे. ज्याद्वारे युक्रेनच्या लोकांना युनिसेफच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाऊ शकते.
प्रियांका चोप्राच्या लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्टची खूप चर्चा होत आहे. या पोस्टद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रशियन हल्ल्यानंतर युक्रेनच्या लोकांची चिंता आणि त्रास दिसून येत आहे. युक्रेनमध्ये रशियन हल्ला टाळण्यासाठी भूमिगत स्टेशन भुयारी मार्गाचे बंकरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या स्टेशन भुयारी मार्गात शेकडो सामान्य नागरिक दिसतात. या लोकांच्या चेहऱ्यावर भीती आणि दहशतीची छाया स्पष्टपणे दिसून येते. काही लोकांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत, तर अनेकजण एकमेकांचा हात धरून सांत्वन करताना दिसत आहेत. या लोकांमध्ये अनेक निष्पाप मुलांचाही समावेश आहे.
प्रियांकाने लिहिले की, “युक्रेनमधील परिस्थिती भयावह आहे. हा एक परिणामकारक क्षण आहे, ज्याचे परिणाम येणाऱ्या काळात उमटतील.” या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल अनेकजण प्रियांकाचे आभार मानत आहेत. युद्ध थांबवून मानवता वाचवली पाहिजे, असे लोक म्हणत आहे.
प्रियांका चोप्राने डिसेंबर २०१८ मध्ये निक जोनाससोबत लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाला आता तीन वर्षे झाली आहेत आणि दोघेही लॉस एंजेलिसमध्ये त्यांच्या पॉश निवासस्थानी राहतात. प्रियांका चोप्रा अमेरिकेतही तिच्या इंस्टाग्रामवर भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे पालन करताना दिसते. त्याचबरोबर प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास २१ जानेवारी रोजी सरोगसीद्वारे पालक बनले आहेत. प्रियांका सध्या तिच्या मातृत्वाचा पुरेपूर आनंद घेत आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर प्रियांका ॲमेझॉन प्राइमच्या ‘सिटाडेल’ या सीरिजसाठी शूटिंग करत आहे. ही अभिनेत्री ‘द मॅट्रिक्स ४’मध्ये दिसली होती आणि ‘टेक्स्ट फॉर यू’मध्येही ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा –
- ‘वरन भात लोन्चा…’ सिनेमा प्रकरणी महेश मांजरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
- शाहिद कपूरची बहीण सना अडकणार विवाहबंधनात, वडील पंकज कपूर यांनी दिली माहिती
- मिस्टर परफेक्शनिस्टने ‘झुंड’ चित्रपटातील कामाबद्दल केले आकाश ठोसरचे भरभरून कौतुक, व्हिडिओ झाला व्हायरल