Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘अनंत युगाच्या स्त्री जन्मातील अंधाराला प्रकाशमय करणारी क्रांतीज्योत’; सावित्रीमाईंची लूक पाहाच

आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देत, समाजाचा रोष पत्करून फक्त महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर या चित्रपटातील सावित्रीमाईंच्या भूमिकेतील राजश्री देशपांडे यांचे पोस्टर म्हणजेच फर्स्ट लूक प्रकाशित करण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हे पोस्टर प्रकाशित करण्यात आले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे म. फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावित्रीमाईंच्या या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. पुण्यातील फुले वाड्यात हा कार्यक्रम संपन्न झाला. ‘‘युगानु युगाच्या स्त्री जन्मातील अंधाराला प्रकाशमय करणारी क्रांतीज्योत, सावित्रीमाईची गोष्ट!!’’ सांगणाऱ्या सावित्रीमाईंच्या समोर कंदिलाच्या प्रकाशात पाटी पेन्सिल आहे आणि त्यावर अक्षरे टिपलेली आहेत. शांत, प्रेमळ आणि समजूतदारपणाच्या छटा त्यांच्या चेहऱ्यावर अगदी बोलक्या दिसत आहेत जणू स्त्रियांच्या प्रगत, शिक्षीत आणि नवजीवनाची दिशा आखत आहेत! आडवं कुंकू हे सावित्रीमाईंची ओळख सांगतं. राजश्री देशपांडे यांच्या या पर्फेक्ट लूकमुळे सावित्रीमाई याचि देही, याचि डोळा आपल्याला समोर दिसतात. यापूर्वी म. ज्योतिराव फुले यांचे पोस्टर लॉन्च झाले होते, अभिनेते संदिप कुलकर्णी म. फुलेंची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या लूकचीही जोरदार चर्चा झाली होती. तर, अभिनेत्री राजश्री देशपांडे यांना यापूर्वी उत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर ओटीटीचा उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कार्यक्रमात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या (Satyashodhak)  टीमचे कौतुक केले. येणाऱ्या नवीन पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचा इतिहास पोहचणार आहे, त्यामुळे सर्वांनी चित्रपट बघावा व इतरांना दाखवावा, असे सर्वांना आवाहन केले आणि टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर, मा. खा. समीर भुजबळ, समता पुरस्कार विजेते सन्माननीय पत्रकार संजय आवटे, पुणे समता परिषदेचे प्रितेश गवळी, सन्माननीय रवी सोनवणे हे मान्यवर उपस्थित होते.

समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित , संकल्पना – राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत. शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती मध्ये निखिल पडघन, देवानंद मोहोड, मंगला वानखडे आणि निता गवई याचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट 5 जानेवारी, 2024 रोजी प्रदर्शित होईल. (Actress Rajshree Deshpande will play the role of Savitrimai in the movie Satyashodhak)

आधिक वाचा-
बॉबी देओलने तोडले ‘अ‍ॅनिमल’मधील कमी सीन्सवर मौन; म्हणाला, ‘माझ्याकडे जास्त सीन असते पण…’
‘जलसा’च्या बाहेर चाहत्यांची गर्दी पाहून बिग बी झाले भावूक, पोस्ट शेअर करून व्यक्त केल्या भावना

हे देखील वाचा