बॉलिवूडची ‘चांदनी’ म्हणजेच अभिनेत्री ‘श्रीदेवी’. तिने आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले. त्याचबरोबर तब्बल ३०० सिनेमांमध्ये काम करत आपली विशेष ओळख निर्माण केली. ३ वर्षांपूर्वी २४ फेब्रुवारीला तिने या जगाचा निरोप घेत, सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. तिचा दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. तिच्या आयुष्यातील अनेक भन्नाट किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. आज तेच किस्से आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…
तब्बल १०३ डिग्री ताप असताना केली चालबाजच्या एका गाण्याची शूटिंग
आपले काम चोखपणे पार पाडण्याच्या बाबतीत श्रीदेवी नेहमीच इतर अभिनेत्रींच्या तुलनेत पुढे राहिली आहे. तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता, तेव्हा ती लंडनमध्ये शूटिंग करत होती. तिला आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच ती भारतात परतली होती. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर ती लगेच आपल्या शूटिंगसाठी लंडनला परतली होती. याव्यतिरिक्त ‘चालबाज’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तिला तब्बल १०३ डिग्री ताप होता. परंतु तिने थोडीही विश्रांती घेतली नाही आणि पूर्ण उत्साहाने एका गाण्याची शूटिंग केली होती.
आईने केली १० लाख रुपयांची मागणी, बोनी कपूर यांनी ११ लाख देत श्रीदेवीला केले साईन
श्रीदेवीला बोनी कपूर यांनी ७० च्या दशकात एका सिनेमात पाहिले होते. यावेळी पहिल्या नजरेतच बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात पडले होते. त्यांची कहाणी ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमापासून सुरू झाली होती. श्रीदेवीने स्क्रिप्ट ऐकण्यासाठीच बोनी यांना १० दिवस वाट पाहायला भाग पाडले होते. तिला या चित्रपटासाठी साईन करण्यासाठी तिच्या आईने १० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी बोनी यांनी तब्बल ११ लाख रुपये देत श्रीदेवीला आपल्या सिनेमात घेतले होते.
ज्युरासिक पार्कसाठी स्पीलबर्गला दिला नकार
प्रसिद्ध दिग्दर्शक स्पीलबर्ग यांनी श्रीदेवीला एका भूमिकेसाठी निवडले होते. परंतु श्रीदेवीने त्यांना थेट नकार कळवला होता. श्रीदेवीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज तुम्ही यातून घेऊ शकता की, तिने हॉलिवूडचा प्रसिद्ध सिनेमा ‘ज्युरासिक पार्क’ची ऑफर नाकारली होती. श्रीदेवीला भारतीय सिनेमावर खूप प्रेम होते. यानंतर तिला हॉलिवूडमधून अनेक ऑफर आल्या. परंतु तिने यामध्ये काम करण्यास कोणताही रस दाखवला नाही.
एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री जयललितासोबत केले काम
सन १९६७ मध्ये आलेलया तमिळ ‘थुनाईवन’ सिनेमामध्ये श्रीदेवी लॉर्ड मुरुगाची भूमिका साकारली होती. त्यावेळी ती अवघ्या ४ वर्षांची होती. या चित्रपटात तिने ६०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जयललितासोबत काम केले होते. श्रीदेवीने सन १९७५ मध्ये ‘जूली’ या आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटात काम केले होते. यामध्येही ती बालकलाकार म्हणून दिसली होती. त्यानंतर तिने सन १९७९ मध्ये ‘सोलवा सावन’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती.
२ तास एकाच खोलीत बंद होत्या जया प्रदा आणि श्रीदेवी, पण चर्चा झालीच नाही
श्रीदेवीची सर्वाधिक स्पर्धा ही अभिनेत्री जया प्रदासोबत असायची. दोघीही एकमेकांना पसंत करत नव्हत्या. त्यामुळे ते एकमेकांशी बोलत नसायच्या. एकदा त्यांचे पॅचअप करण्याच्या हेतूने सुपरस्टार राजेश खन्ना आणि जितेंद्र यांनी त्या दोघींनाही २ तास एकाच खोलीत कोंडले होते. जेव्हा दरवाजा उघडला, तेव्हा समजले की, त्या दोघीही वेगवेगळ्या कोपऱ्यात बसल्या होत्या. एकाच खोलीत असूनही दोघींनी बोलायचं तर सोडाच, एकमेकींकडे पाहिलंही नव्हतं.
महाकालची भक्त होती, सकाळ-संध्याकाळ करायची पूजा
श्रीदेवीची महाकाल मंदिर आणि मीनाक्षी मंदिरावर खूप श्रद्धा होती. आऊटडोर शूटिंग सोडून ती प्रत्येक दिवशी पूजा करायची. श्रीदेवी जेव्हाही मध्यप्रदेशला जायची, तेव्हा ती उज्जैनला जात असायची. ती महाकालची भक्त होती आणि सकाळ- संध्याकाळ पूजा करत असायची. आपल्या फीटनेससाठी ती वर्कआऊट आणि योगाही करायची. यासोबतच ती ज्या शहरात जायची, तिथे हेअरस्पा नक्की करायची.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अस्सल मराठमोळ्या पद्धतीने झालं होतं अजय-काजोलचं लग्न, अशी सुरु झाली होती दोघांची लव्हस्टोरी